काल पहिल्या भागाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात...धन्यवाद....आज दुसरा भाग...
त्ये – सुवर्णा पावडे
(भाग२)
कालदीन् आल्ती नं त्ये.
सुक्केलवानी दिसंत व्होती.
हाज्री घ्यायच्या टायमाला,तिनं हाज्री देली नं,तव्हा पाहलं मिन तिल्हं.
मपल्या डोयाशी डोये जरा लाजू लाजूंच भिडवले नं तिन्हं.
मिन् शिक्वायलं सुर्वात क्येली.
त्ये भायीर पाव्हू लागली नं.
दोन -चार टायमालं ,मिन्हं बिन दुरलक्श क्येलं.
पन ईच्यारूनंच टाकलं," ए मिना काय य बाहेर?सारखं सारखं बाहेर काय बघते य स?"
"म्याडम,तिचा भाऊ येल हय नं भायीर", बाजूची रूपी बोल्ली.
त्ये भायीर ग्येली.
धा मिन्ट झाले,तरीबिन त्ये कलास मदी न्ही आली नं.
मंग प्रेड संपला.
मी बिन भायीर आली.
त्ये उजयेल दिस्ली नं,माय!
त्या खोप्पड गालाहीवर,कयी खुलेल दिस्ली.
तिचा भाऊ तिचा हात दरून हुबा व्होता.
का धोगाईमदी शरेत लागेल वाटंत व्होती,का आजुन सुक्केल कोन हून दाखवतं!
त्ये मह्याजवय आली.
मल्हं बोल्ली," म्याडम,भाऊ घ्यायलं येल हय,जाऊ का?"
"आता?शाळा सोडून?"मी.
त्ये बोल्ली," म्याडम,महा मामा बिन येल हय. महा बाप बोल्ला कचोर्याहीची गाडी लावतो. त्यो तरास नी द्येनार मह्या मायले. तं मामा बोल्ला का या डावले र्हाऊ द्येतो. मही माय येल हय.जाऊ द्या नं".
मंग मी बिन "जा" म्हनलं.
त्ये पायालं पंख लावून ऊडताना दिस्ली.