खूप सुंदर कथा आहे...तरल आहे...व्यामिश्र आहे...
युरेका – भाग्यश्री भोसेकर बिडकर
"मनापासून थँक्स, गेली 24 वर्ष कसलीही तक्रार न करता साथ दिलीस. कधीच असं उघडपणे व्यक्त झालो नाही पण आज फक्त मनातल्या मनात थँक्स नाही म्हणणार......"
नवरा बोलत राहिला आणि ती डोळे विस्फारून नवऱ्याच्या या नवीन रुपाकडे पहात राहिली...
दोन तपांचा संसार, अनोळखी पायवाटेवरून चालताना नात्याची तयार झालेली घट्ट विण.. आठवायचं म्हंटल तरी सुरुवात कुठून नि कशी करावी...एक थंड झुळूक शरीराला स्पर्शून गेली तसं तिला आठवलं हिवाळ्यात झाला होता बघण्याचा कार्यक्रम..पहिल्याच भेटीत आपल्या आवडीनिवडी फार भिन्न आहेत आणि आपल्या स्वभावात कसलीच समानता नाही एवढंच समजलं होतं...
यथासांग लग्न पार पडलं. नवीन आयुष्य सूरू करताना आलेलं दडपण, पण
'आपण एकमेकांच्या साथीने सगळं निभावून नेऊ'
असा मूकपणे एकमेकांना दिलेला विश्वास, नात्याचा पाया जोखणाऱ्या मार्गात आलेल्या अनेक कठीण परीक्षा त्यातून तावून सुलाखून पार पडलेलं त्यांचं एकमेकांवरच प्रेम, कधी अपमानांचे कढ, कधी आनंदाची भरती, तर कधी अनावर झालेला आवेग, आठवणी कधी हव्याहव्याश्या तर कधी नकोश्या...कधी स्पर्शातून व्यक्त झालेलं प्रेम तर कधी फक्त नजरेनेच दिलासा देणं....
त्या दोघांना नात्यातील राजकारण कधीच जमलं नाही...खुपश्या आनंदाच्या, दुःखाच्या प्रसंगात त्यांनी एकमेकांच्या नजरेतील 'बिटविन द लाईन्स' वाचून वाटचाल केली..कधी तो शाई व्हायचा तर ती टिपकागद, कधी ती झिम्माड पाऊस तर तो पावसाची आतुरतेने वाट पाहणारा चातक, कधी तो सोसाट्याचा वारा ती वटवृक्ष, कधी ती अल्लड, अवखळ नदी आणि तो धीरगंभीर समुद्र...सहजीवन सहजीवन म्हणजे तरी काय? तर चांगलं वाईट, भलं बुर, गुणदोष ह्या सगळ्यापलीकडे पोचून एकमेकांत विरघळून जाणं बऱ्याचदा स्वतःच अस्तित्व विसरून तर कधी कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान ठेवूनहि....
तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या... आज मनमोकळं व्यक्त होण्याचं तिचं डिपार्टमेंट नवऱ्याने लिलया सांभाळलं होतं. तिच्या शब्दांना त्याच्या शब्दांनी निःशब्द केलं होतं. माणसाला शब्दातून आपल्या भावना उघडउघडपणे व्यक्त करण्याची देणगी लाभलेली आहे आणि याचा युरेका युरेका शोध नवऱ्याला लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसादिवशी लागण हे तिच्या दृष्टीने एखाद्या गिफ्ट पेक्षा कमी नवहतं.