सुंदर तरल कथा...व्यक्तिचित्रण रेखीव...जणूकाही एखाद्या कलाकाराने आपल्या कुंचल्याने जिवंत केली असावीत अशी.
शकून-श्रद्धा सचिन राजेभोसले
“अक्षय तृतीयेचा मुहूर्त योग्य आहे...नविन कार्यरंभासाठी ...
हे ऐकून "आक्की" जोशी बुवांच्या पडवी वरून उठली...आल्या वाटेकडे वळाली...पण एवढ्यात एक गोड अपशकून झाला...बुवांची पाच सहा वर्षाची मुलगी सुमा कुठून तरी अंगणात आली, सर्वांग घामानं चिकट करुन अन् गालांची जास्वंदे करून आली होती,..तिच्या झग्यात पाडाच्या ब-याचशा कै-या होत्या अन् ते गाठोडे तिने पोटावर घट्ट सावरून धरले होते....आपल्याला झगा कशासाठी घातला आहे, हे त्या कै-यांच्या आनंदात ती पुर्णपणे विसरून गेली होती.
तिने ती स्वकष्टार्जित मिळकत बापाच्या पुढे ओतली अन् चिकाने भरलेले दोन्ही हात झग्याला पुसुन टाकले. आक्कीची पावले तिला पाहून तिथेच थबकली होती.
"आला का माझा बाबाss!!" म्हणून बुवांनी जेव्हा तिला पोटाशी धरली, तेव्हा आक्कीच्या ही उरात प्रेम दाटले. बुवांचे ते कन्यारत्न होते तसेच दृष्ट पडण्याजोगे.... आक्की तिच्या त्या पोवळ्यां सारख्या ओठांकडे अन् भिरभिरत्या डोळ्यांकडे पहातच राहिली...
"मला देशिल एक कैरी?"असे तिने कौतुकाने विचाराताच
"हो,ही घे."म्हणून सुमी पुढे आली.आक्कीने तिला धरून ठेवले. सुमा बुजरी तर नव्हतीच, शिवाय लोकांकडून कौतुक करून घेण्यात उपजत शहाणी होती.....आक्की तिला कुरवाळता कुरवाळता तिच्या केसांत बोटे खोवून म्हणाली
"हे काय सुमा!! वेणी का नाही घालून घेतलीस? किती जटा झाल्या आहेत बघ तुझ्या केसांत.... " “बाबांना वेणी घालता येतेच कुठं?"
"वेडे, बुवां वेणी घालतात होय? वेणी आईनं घालायची.."
"आई गेली वर!!रात्री चांदण्या उगवतात ना तिथं."
आक्कीला विस्मयाचा धक्का बसला, वांझ बाई म्हणून पडवीवरच बसायला सांगितलेल्या जोशी बुवांकडे तिने पाहिले तो त्यांनी दुसऱ्या बाजूला तोंड वळवले...
"जा तेलाची वाटी अन् फणी घेऊन ये. मी घालते तुझी वेणी.."
आक्कीने म्हटले.. अन् सुमाच्या लांबसडक केसांची छानशी वेणी पाठीवर करत तिच्या पाठीवरुन हात फिरवला. तेव्हा चटकन फिरून सुमाने आक्कीला वाकून नमस्कार केला ....
"हे काय?नमस्कार कशाला हवा?"
"आई सांगायची की,वेणी घालील तिला नमस्कार करावा."
तिचे ते उत्तर ऐकून आक्कीला राहवले नाही...तिने पटकन सुमीला जवळ ओढले आणि तिच्या तांबूस फुगीर गालाचा एक पापा घेतला....