संजन मोरे...नावात काय आहे म्हणतात...त्याच्या नावातच कथा आहे....गोष्ट आहे...व्वा! अनुभूतीचा बादशहा आहे संजन.
पाला-संजन मोरे
सगळं आवरून घेतलं. नवरा कामावर गेला. सासरा शेतात. चार घास पोटात ढकलून सासू बाजल्यावर पडली. केर वारे, धुणीभांडी सगळं झालं होतं. चूल अजून मंद गरम होती. सगळं झाकपाक करून ती निघाली. दरवाजा ओढून घेतला. पायात चपला चढवल्या. दोरी घेतली. गोठ्यातली गाय तिच्याकडे बघून हंबरली.
झपाट्याने ती चालू लागली. गोरीपान, शेलाटी. डोईवर पदर, सात्विक चेहरा. रिकामटेकड्या नजरा तिच्या देहाला धडकून जात होत्या. उसासे, आधाशी डोळे. सगळ्यातून वाट काढत ती गावाबाहेर पडली. रानं शिवारं सुरू झाली. लांबूनच तिने आईच्या मंदिराला हात जोडले. आज एकटीच. येरव्ही कुणी नाही कुणी जोडीला असायचेच. एखादी परकरी पोर सुद्धा तिला सोबतीला चालायची. जीवाची उलघाल, मनाची तगमग, होणारा जाच. तिला कुणाकडे तरी मन मोकळं करू वाटायचं. पण सासूरवाशीण ती, कुणाकडे मन रितं करणार? रडायची सुद्धा चोरी. दाटून आलेले डोळ्यातले कढ आतल्या आतच जिरवावे लागत होते.
रानगट होता तो. बैलक्या. हातात कायम आसूड. निर्दयी. बैलाच्या पाठीवर आसूड ओढला की हत्तीवाणी बैल चराचरा वाकत. मुताची धार सोडत. ढोर मेहनत कशी करून घ्यावी हे याच्याकडून शिकावे. ही गरीब गाय त्याच्या दावणीला आलेली. दिवसभराचे काबाडकष्ट अन रात्रीचा त्याचा क्रूर रानगटपणा. ती गोठून जात होती. वठलेल्या झाडासारखी शूष्क, कोरडी होत होती. तिच्या आयुष्यात कायम उन्हाळी रखरखच. तिच्या देहाला चैत्राची पालवी फुटलीच नाही. गात्रे कधी मोहरलीच नाहीत. पाने, फुले, फळे तर लांबचीच गोष्ट. हा वांझोटा शाप घेवून ती मन मारत जगत आली. पण कालची रात्र जास्तच निर्दयी होती. त्याच्या क्रूर काम वासनेत आज सूडाची झाक होते. तिच्या वांझोट्या देहाचा चोळा मोळा करण्यात त्याला पाशवी समाधान मिळतं होते. त्याचे वांझोटे पौरूषत्व तिलाही डसत होते. त्याचा निरूपयोगीपणा हा तिच्यासाठी अभिशाप बनला होता …..
उसाचा मळा आला. सवयीने तिचे हात उसाचा कोवळा पाला काढू लागले. मग तिच्या लक्षात आले, ही दोरी म्हणजे निमीत्त. गोठ्यातली गाय, ती घेवून येणाऱ्या कोवळ्या पाल्याची वाट बघत राहिल. तिनेही वाट बघीतली होती. त्याचं एखादं धुसमुसळं बी तिच्या भूमीत रूजेल म्हणून. शेवटी तिही उपाशीच राहिली. गरीब गायीच्या काळजीच्या कणवेने तिचे मन भरून आले. दाट उसात आत आत घूसल्यावर विहीर लागते. पाण्याने डबडबलेली. असंख्य मळे फुलवणारी.
आज लोड शेडींग, त्यामुळे विहीर गच्च. दोन दिवस विहरीच्या तळाशी पडून राहू. तिसऱ्या दिवशी फुगून वर. आपल्या देहाच्या पाण्याने उसमळा फुलेल. केळीची बाग बहरेल. द्राक्षवेली जडावतील. बांधावरची झाडे फळाफुलांनी लगडतील. तीचा वांझोटेपणाचा शाप संपेल.
मुंडावळ्या बांधून पुन्हा तो रानगट मांडवात उभा राहील. गायीला चारा घालायला दूसरी गरीब गाय घरात येईल. दिवसभर काबाडकष्ट, सासूची सेवा करेल. रात्री देहाचं चिपाड होईपर्यंत त्याच्या चरकात पिचत राहिल, निमूटपणे. फळली, फूलली तर ठीक, नाहीतर, पायात चप्पल अन हातात दोरी घेवून ती आपल्या वाटेने बाहेर पडेल. फुलायला, फळायला, कूस उजवायला.
विहरीच्या काठावर प्लॅस्टिकची चप्पल अन उसाचा पाला बांधायची सूती दोरी बेवारश्यासारखी पडली होती. मालकीण तळाला विश्रांती घेत पहूडली होती. पाणी आता कुठं शांत होवू लागलं होतं.