Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

पद्मालय-Asawari Deshpande

$
0
0

आज पद्मालयचा शेवटचा भाग...१२ चित्तथरारक रात्री पद्मालयने आपल्याला दिल्या...ह्या कथेचे पुस्तक (आणखी काही थरारक भागांसहित लवकरच येत आहे.

पद्मालय – आसावरी देशपांडे

भाग बारावा

मनवा

तो दिवस पद्मलायमधला बारावा दिवस...

हॉल मधल्या आरामखुर्चीत तासनतास तंद्री लावून बसणं हल्ली नित्याचंच झालं होतं. शारदाची तसबीर मी एका कापडात गुंडाळून ठेवली होती..कारण तिच्या नजरेला नजर भिडवायची माझी अजूनही हिम्मत होत नव्हती. मिहीरच्या तसबीरीला सुंदरसा चंदनाचा हार अडकवला होता..रोज सकाळी मी तसबीर पुसायचे, त्याच्या डोळ्याभोवती तळं साठलेलं असायचं..त्याचा जीव त्याच्या डोळ्यात साठलेला असायचा. तो असा ओसंडून वाहताना पाहिला की मन भेदरायचं...

बऱ्याचश्या गोष्टी तुला सांगायच्या राहिल्याच रे..तू असा अर्ध्यावर डाव सोडून जाशील हे कुठं ठाऊक होतं मला? मी असेन सात आठ वर्षांची, दामलेकाका आईला सांगत होते

"मनूची काळजी घ्या,पाण्यापासून धोका आहे"

बस्स त्या दिवसापासून या पाण्याचा जो काही 'बागुलबुवा' झाला आजतागायत हा तसाच आहे. त्या दिवशी तळं पाहायला गेलो आणि तिथल्या पाण्याची खोली पाहताना..मनातली एक खोली अलगद उघडली..तू छोटासा दगड तळ्यात फेकताच स्थिर, शांत पाण्यावर अनेक तरंग उमटले, अनेक वर्तुळाकार वलयं... परत एकदा मी या चक्रात अडकत होते...ज्या पाण्यापासून इतके दिवस मी दूर पळत होते ते पाणी मला स्वतःकडे खेचून घेत होतं.....त्या दिवशी देखील जाणीव झाली आपण कोणत्यातरी अज्ञात शक्तीच्या आहारी जातोय.. मला तुला सांगायचं होतं आपण पद्मालय सोडून जाऊ,पण जमलंच नाही कारण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतास...त्या शक्तीने तुझ्यावर केलेल्या वारा मधून तू सावरलेला नव्हतास, पण हळुहळू 'पद्मालय' माझ्या रक्तात भिनू लागलं..

इथली प्रत्येक गोष्ट वर्षानुवर्षापासून माझ्या प्रतीक्षेत आहे असं जाणवायला लागलं..चुंबकासारखे ओढले जात होते मी या घराकडे...माहीत होतं मला हे लोखंड आहे तरीही...आणि माझ्या आयुष्याचं सोनं करणारी व्यक्ती माझ्यापासून दुरावत होती...उघड्या डोळ्यांनी मी हे सारे पाहात होते..शारदाचा अंत होताना हा 'बागुलबुवा' उसळ्या मारून वर आला, मी नाही वाचवू शकले तिला..मी मलाच वाचवू शकले नाही तर तिला काय 'जीवनदान' देणार? मिहीर,आज तुझ्या डोळ्यातली आसवं पाहून मन कातर होतंय...मला माहिती आहे तुझा जीव माझ्यात अडकलाय, तू नाही जाऊ शकत इथून, मी आणि पद्मालय सोडून..म्हणून तर हा सारा खेळ...

दिवस सरला रात्र आली...घड्याळात बाराचे टोले वाजत होते...पहिला टोला 'टण' ..त्याची स्पंदनं अजून भरून उरली होती तेवढ्यात दुसरा टोला...प्रत्येक टोला मनातली हुरहूर वाढवतच होता. भयाण शांततेला चिरून त्याहीपलीकडे काळ्या भेसूर गर्तेत नेणारा तो आवाज.. हे टोले जाणीव करून देतात मला चिंधीसारख्या भासणाऱ्या माझ्या अस्तित्वाची..

चिंचेच्या झाडावरची सळसळ एव्हाना सुरु झाली..रातकिड्यांचा किर्र आवाज,घुबडाचा घुत्कार, टेकडीवरच्या म्हातारीचा आक्रोश सारे आवाज मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोचले होते. मला ठाऊक होते थोड्याच वेळात मनाचे भंगलेले अवशेष मला इतस्ततः विखुरलेले मिळणार..प्रत्येक अवशेष एका अपवित्रतेने भरलेला...लडबडलेला असणार.

शेवटचा टोला पडताच पद्मालयचं फाटक उघडलं..आता गंजलेल्या कडीचा आवाज..काळोखात ठासून भरलेला...मग 'फाच-फाच' पावलांचा आवाज..तळ्यातल्या चिखलाने भरलेल्या पावलांचा घरभर वावर.. एवढे मोठे अंगण केवळ पाच पावलातच संपावे याचे गूढ माझ्या चेहेऱ्यावर..पण गुढत्वाचा शोध घेण्याचा ध्यास आता संपला होता..तीच ती टेकडीवरची म्हातारी...आता ती माझ्याजवळ येते..अजून जवळ..तिच्या लुगड्याच्या हिरव्यागार रंगाने मी ओढली जाते तिच्याकडे..तिचे बटबटीत गढूळ डोळे माझ्या डोळ्यांना एका नजरेत काबीज करतात...अगदी क्षणभर मनाला वाटतं आपल्या वाढलेल्या नखांनी उपटून टाकावे मुळासकट तिचे डोळे, आणि ती रोखलेली विषारी नजर..दुसऱ्याच क्षणाला जाणवतं एक वास्तव....कोपऱ्यात दिसला माझ्याच हिमतीचा झालेला बोळा...

ती येताच जिना उजळून निघतो,मी तिच्यामागे भारावल्यासारखी जातेय..पहिली, दुसरी, तिसरी पायरी असं चढता चढता विसाव्या पायरीवर पाय ठेवताच येतो एक क्षीण आवाज..माझ्या मिहीरचा...

मिहीर

"थांब मनवा,नको जाऊ त्या खोलीत..माझं सर्वस्व हिरावलंय त्या खोलीने आता तू तरी सावर स्वतःला..कर मन घट्ट आणि जा 'पद्मालय' पासून दूर..मला नाही बघवणार तुझ्या वेदना..जिवंतपणी तुला होणाऱ्या मरणयातना..ह्या असल्या क्रूर खेळाच्या मागे लागू नकोस..तू स्वीकार खंबीरपणे वास्तव कितीही कटू असले तरीही.. 'पद्मालय' च्या हातातली कळसूत्री बाहुली म्हणून नको जगूस... तू करू नकोस जागे तुझ्यातल्या क्रूर नैनाला...

संपू दे इथेच तुझ्या मेंदूचं परावलंबित्व...."

मनवा

"तुझ्याजवळ आणणारा प्रत्येक खेळ हा माझ्यासाठी मोलाचा आहे.अगदी जीवनमरणाच्या सीमारेषेवर असला तरीही... पद्मालयवर जोपर्यंत 'मिहीर मनवाचे' नाव कोरले जात नाही तोपर्यंत मी नैना ला टक्कर देईन..

हे काय, मी थुई थुई नाचतेय मोरासारखी...अरे, हे बघ मिहीर मी उडतेय शुभ्र निळ्या आकाशात, इतकं हलकं हलकं वाटतंय..अगदी 'पिसासारखं'..माझं जडत्व सोडून दिलंय मी कुठेतरी..आता इथे माझे कोणीच लचके तोडू शकणार नाही.. मला इथे माझे शरीरच जाणवत नाही..दिसला बघ तो काळा बिंदू..मला दिसतोय त्यात तुझा चेहेरा...इतके दिवस छळणारा तो काळा बिंदू तू होतास..आता मी एका पोकळीत प्रवेश करतेय..बहुतेक तुझ्या जवळ येतेय मी...इतकी विलक्षण अनुभूती आहे ही....क्षणभर मिळाली तरी पुरुन उरणारी...पण कधीच भरून न पावणारी...होईन हळुहळू या खेळात तरबेज, घाबरू नकोस मिहीर, ही तर सुरुवात आहे...

आत्ता कुठे खेळ सुरू झालाय....

समाप्त


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles