असे छोटू पावलोपावली पसरलेले आहेत. ७० वर्षांच्या स्वातंत्र्या नंतर ही देशाची अवस्था आहे.
छोटू – भाग्यश्री भोसेकर बिडकर
तशी पावसाची संततधार मध्यरात्रीपासूनच सुरु होती. मध्येच हलकी सर तर मध्येच जोरदार झडप येऊन जात होती. भटारखान्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या 10×10 खोलीच्या, गळणाऱ्या छताकडे पहात आणि छोट्याश्या काचेच्या खिडकीमधून पावसाचं निरीक्षण करत छोटू काहीतरी विचार करत पडला होता. विचार करताना त्याची नजर कोपऱ्यातील दप्तरावर पडली. बरीच धूळ बसली होती त्यावर. पूर्वी निदान त्यातल्या वह्या, पुस्तक काढून त्यावरून हळुवार हात फिरवायची इच्छा होत असे पण आताशा तेही बंद झालं होतं कारण वर्तमानाच्या ओझ्याखाली छोटुचं भविष्य दबून कोमेजून गेलं होतं. विठ्ठलाच्या मंदिरातून काकडआरतीचे आवाज येऊ लागले, घंटानाद आणि टाळ घुमू लागले तसं पहाट झाल्याची जाणीव छोटूला झाली तसा तो उठला त्यानं तोंडावर पाणी मारलं, ब्रश केला, बाहेरच्या नळाला आज गरम पाणी येत नवहतं पण गरम पाण्याची वाट पहाण्याची मुभा छोटूला नवहती तिकडे कामं खोळंबली असती. मग थंडीत कुडकुडत कसेबसे गार पाण्याचे चार तांबे अंगावर घेत छोटूने आंघोळ उरकली,कपडे केले आणि निघाला.
जाता जाता त्याने विठठलाला बाहेरूनच हात जोडले. हॉटेलात पोचला.
"हम्म, चला सगळे पटापटा कामाला लागा. ए पोऱ्या तू मागे पडलेली भांडी घासून घे.छोटू आज सगळं हॉटेल तू चकाचक करायचं आहे धुळीचा एक कणही दिसता कामा नये. ए पिंट्या आत्ता कस्टमर यायला सुरुवात होईल तू त्यांच्या ऑर्डरी घे......."
सगळ्या कामांचं रोजच्यासारखं वाटप झालं नि सगळेजण पटापट हात चालवू लागले. छोटूने देखील कोपऱ्यात पडलेलं फडकं उचललं आणि तो साफसफाई करण्यात गुंतला. तो हॉटेलबाहेर जी पाटी पुसत होता त्यावर लिहिलं होतं
'इथे बालकामगार काम करत नाहीत'