घ्या..दुसरी कथा सुद्धा माणिकचीच आहे...वैविध्य!
मोक्ष-माणिक घारपुरे
खोलीतल्या विचित्र शांततेचा सगळा रोख सुजाताकडेच होता. हलक्या कुजबुजीचा एखादा ओरखडा शांततेवर उठत होता. ती मात्र अन्यमनस्क होऊन बसली होती त्या गराड्यात. ह्याक्षणी तिच्या मनात कुठलाच विचार नव्हता. तिचे सारेच प्रश्न संपून गेले होते.
तिचा नवरा तिच्या पुढ्यात आला आणि म्हणाला,
'निघालाय सुजित. संध्याकाळपर्यंत येईल'.
प्रसंगाला शोभणार नाही असं उसळून तिने विचारलं,
' ता का येतोय हा? गेल्यानंतरही तिने ह्याची वाटच बघायची का? आधीही कधी तिने बोलावल्यावर हा लगेच आला नाही...फक्त स्वतःची सवड बघत राहीला.'
खोलीतली शांतता अधिक गहिरी झाली. सगळे एकमेकांकडे बघणं टाळून खाली बघू लागले. तिच्या नवऱ्याने फक्त तिचा हात हातात घेऊन थोपटला...थोडी शांत झाली ती. त्याच तर स्पर्शाच्या आधारावर तिने सगळं निभावलं होतं. तिने नवऱ्याकडे पाहीले. शांत राहण्याची याचना करत होता तो. तिच्या मनात विचार आला, काय देवमाणूस आहे हा? इतका कसा समजूतदार! त्याच्याकडून ५% गुण जरी भावाने घेतले असते तरी आईची अशी मानसिक फरफट नसती झाली .
सुजाताला आता एकेक गोष्टी आठवत राहिल्या. अनेक वर्ष चाललेलं आईचं पूर्ण परावलंबीत्व, नोकरी सांभाळून सेवा करणं, त्यावरून सासूचे टोमणे ऐकल्याशिवाय दिवस न संपणं. सगळीकडून तिचीच कोंडी. आता संपलंच होतं सारं.
पण गेल्या काही वर्षात लहानपणापासून न जाणवलेली एक गोष्ट तिने फार प्रकर्षाने अनुभवली.... आईचा सुजितकडे असणारा ओढा! ती इतकं मायेने, जीव तोडून आईचं सारं करत होती पण आईचा सारा जीव सुजितसाठी तुटत होता. तिचं करणं, तिच्या समस्या, तिचं घुसमटणं ह्यातलं काहीच पोहोचत नव्हतं आईपर्यंत. तिच्या भावविश्वात फक्त सुजित आणि त्याचा परिवार होते. आईचे सगळे मनोव्यापार सुजितशी जोडलेले होते. सुजित, त्याच्या आठवणी, त्याच्या आवडीनावडी एवढंच तिचं जग होतं. कित्येकदा तिच्या नवऱ्यालाही आई डावलत होती. अशावेळी फार पेटून उठे ती. पण आईला ते कधीच समजलं नाही आणि समजावलं असतं तरी समजून घेण्याची क्षमताही उरली नव्हती आईमध्ये.
पण तिच्या सेवाव्रताला तिच्या नवऱ्यानेही तेवढंच निभावलं होतं. स्वतःच्या आईचा प्रकट विरोध पत्करून तो तिच्या पाठीशी अविचल उभा राहीला. गेल्या काही वर्षात सोय - गैरसोय, मान - अपमान ह्या गोष्टींचा विचार करणं त्याने सोडूनच दिलं होतं. मुळात फार विचार करण्याचा त्याचा स्वभावच नव्हता. जी जवाबदारी पुढ्यात आली ती त्याने पूर्ण स्विकारली होती. आताही पहिला फोन त्याने सुजितलाच केला होता. पण बायकोसाठी, सुजातासाठी त्याला वाईट वाटत राहायचं. तिच्या वर्षानुवर्षांच्या सेवेला आईच्या दृष्टीने काहीच मान्यता नव्हती पण सटीसामासी सुजितने आणून दिलेल्या औषधांचं तो पुन्हा येईपर्यंत कौतुक असायचं. अशा नाकारलेल्या क्षणांना सुजाताची खूप तडफड व्हायची. पण तो तिची अबोल समजूत काढायचा.
बोलण्यासारखं काही नसायचंच. आई अशी का वागतेय ते माहित होतं त्याला. जुने संस्कार हेच एकमेव कारण होतं.
'मुलाशिवाय मोक्ष नाही' .
आणि सुजाता नेमकी त्याचमुळे खवळली होती...सगळंच आठवलं असणार तिलाही. आईचं काहीही न करणाऱ्या भावामुळे आईला कसा मोक्ष मिळणार? हे तिला समजतच नव्हतं. आईची भावनिक ओढाताण बघून कारणीभूत असलेल्या भावाचा उत्तराक्रियेचा अधिकारही तिला मान्य नव्हता. निखळ तत्वांसाठी प्रवाहाविरुद्ध जाण्याची तिच्यात अफाट ताकद होती. पण आज तिची समजूत बोलूनच काढावी लागणार होती. सुजाता कडे बघून तो फक्त म्हणाला,
'आईची इच्छा!'
ह्या दोनच शब्दांनी तिच सारं अवसान गळून पडलं. हरली होती तिने दिलेली अनेक वर्ष! मान खाली घालून मूकसंमती दिली तिने.
तिचीच सतरंजी अडकली होती ना!