तुम्ही वाचा आणि तुम्हीच ठरवा..मी माणिकला किती दिवस आग्रह करीत होतो...बयो...लिही...तुझे शब्द तुझ्याजवळ आहेत...पण ऐकतच नव्हती...मध्ये न लिहिलेली पत्रे वर एक पत्र लिहिल तिने...आणि सुटली...अशी गंमत असते! स्वागत आहे माणिक तुझे...तू गाजवणार नुक्कड!
तिचं काळीज- माणिक घारपुरे
तिने त्याच्या ओंजळीत तिच्याच काळजाचा एक तुकडा दिला. म्हणाली,
'बघ, काही करता येतंय का ह्याचं? '
तो विस्मयचकित होऊन बघत राहिला ओंजळीकडे. चिरवांछित स्वप्न होतं ते त्याचं. हरखून गेला अगदी. तेवढ्यात त्याला वास्तवाचं भान आलं. खेदाने म्हणाला,
'अग, हा तर फक्त एक तुकडाच आहे. हा मोडतांना किती दुखलं असेल तुला?'
त्याचा प्रश्न ऐकून तिचे डोळे भरून आले. म्हणाली,
' तू नको करुस माझ्या वेदनांचा विचार आणि ' हा' फक्त तुकडाच असण्याचा खेदसुद्धा......पाण्याचा प्रत्येक थेंब हे स्वतंत्र तळं असत ना तसंच. त्यात आकाश उतरून येऊ शकतं शिवाय त्यात तरंगही उठू शकतात किंवा आरशाचा तुकडा हा पूर्ण आरसा असतो. त्यात दिसणारं प्रतिबिंब हे मूळ आरशासारखंच असतं. तसंच हा तुकडाही अपूर्ण नाहीये. तू जर दुःखी होऊन हा तुकडा स्विकारलास तर माझ्या तुटण्याच्या वेदना मातीमोल ठरतील. असं नको होऊ देऊस प्लिज. निःशंक मनाने स्वीकार कर त्याचा.'
ओंजळ केलेले त्याचे हात थरथरायला लागले होते. कुठला विचित्र पेच टाकला होता तिने. तिचे म्हणणे त्याला पटत होतं पण मान्य नव्हतं. तिच्या वेदनांची किंमत मोजून कसा सुखी होणार होता तो? तो विचारात पडलेला पाहून तिच्या डोळ्यांतलं तळं अधिक गहिरं होऊ लागलं होतं. पण एव्हाना हातातल्या काळजाच्या तुकड्याची ऊब त्याला जाणवायला लागली होती. मनात अनाहूतपणे आठवांनी फेर धरला. त्या दोघांनी एकत्र घालवलेले दोन चार क्षण असेच ऊबदार होते. तेव्हा वाटलं होतं त्या शिदोरीवर पुढचे सारेच हिवाळे घालवता येतील आणि आता ती आपण होऊन त्याचा वाटा घेऊन आली असतांना त्याच्या मनाला किंतु परंतू छळत होते.
त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिला काय काय ओलांडावं लागलं असेल याची कल्पना तो करू शकत होता. तिच्या त्या साऱ्या वेदना जाणवून त्याच्याही डोळ्यांत सरसरून पाणी आलं. तिच्या लक्षात येताच तिने तिची ओंजळ समोर धरली आणि गोळा केली त्याची सारी आसवं आणि म्हणाली,
'वेडाच आहेस. अशा सखींवेळी कुणी पाणी आणतं का डोळ्यांत? पण सांगू का तुला, माझी जखम भरून आलीये ह्या अर्घ्याने.'
त्याने पुन्हा स्वतःची ओंजळ जवळ केली आणि हातातल्या काळजाच्या तुकड्याकडे पाहिलं. अनेक गोष्टी घेऊन आली होती ती त्या तुकड्यात त्याच्यासाठी. स्वप्न होती, कविता होत्या, चांदणं होतं, फुलं, फुलपाखरं होती. सुगंध होते\, रंग होते ...... कुठेतरी सांडलेली मोरपिसं पाहून तो खूप समाधानाने हसला. त्याला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिने तिथे आवर्जून साठवल्या होत्या.
तळाशी मात्र तिने एक लपवून ठेवलेली गोष्ट दिसली त्याला. तिला ती कशी सापडली? आणि तिने ती स्वतःच्या मनात कधी लपवून ठेवली त्याला कळलंच नव्हतं. तिथे त्याचं एकटेपण त्याची नजर चुकवत लपून बसलं होतं. अरेच्या ...हे इथे आहे होय? आपल्या मनातल्या एकटेपणाची अनुपस्थिती त्याला त्या क्षणी प्रकर्षाने जाणवली. त्याने स्वतःच्या मनात डोकावून पाहिलं तर तिथे त्याला पैंजणांचे आवाज मिरवणाऱ्या तिच्याच पाऊलखुणा दिसल्यात.
त्याला एकाएकी खूप छान वाटायला लागलं. निर्भर झालं सगळं. सर्वस्व उधळून नाचावंसं वाटत होतं. साऱ्या जगाला ओरडून सांगावंसं वाटतं होतं,
'अलीकडे मी एकटा नव्हतो .......एकटा नाहीये मी आता' .
खरंच आता यापुढे तो एकटा असणार नव्हता...... तिच्या काळजाची सोबत होती ना त्याला. किती श्रीमंत होता तो!