Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

रकमा–ज्ञानदेव पोळ

$
0
0

ज्ञानदेव पोळ किती सहज एक व्यक्तिरेखा आपल्याला देतात...आत दाटून आल रकमा वाचताना.

रकमा – ज्ञानदेव पोळ

...भल्या पहाटे उठून खणभर घरापुढच्या जागेत कुडानी बंदिस्त केलेल्या चुलवणावर कढई चढवून रकमा तेलाला उकळी आणायची. तिच्या कुडानी शेकारलेल्या हॉटेलातून प्रांतसमयी निघणारे धुराचे लोळ गावावर पसरत चाललेले बघून, एव्हाना तिच्या कढई समोरच्या लाकडी बाकड्यावर गर्दी जमलेली असायची. फसफसणाऱ्या उकळत्या तेलातून पहिल्या घाण्याची फुगलेली खुसखुशीत कांदा भजी बाहेर पडली की खाणाऱ्या तोंडांची झुंबड पडायची. कांदा भजी खावी तर रकमाच्या कुडानी शेकारलेल्या लाकडी बाकड्यावर बसूनच. रकमाच्या हातची कांदाभजी न खाल्लेला माणूस अख्या पंचक्रोशीत शोधूनही सापडणार नाही. इतकी चव होती तिच्या रापलेल्या हातांना.

जत्रेच्या काळात तर चुलवणावर चढलेली कढई उतरलेली कुणी बघितलीच नाही. जर्मनच्या थाळीत पडेल तेवढ्या चिल्लवर दुनियेला कांदाभजी खाऊ घालणारी रकमा गावात अर्ध्यावर नांदून गेलेली शेवटची बाई. शेवटची यासाठी की रकमाच्या खणभर मातीच्या घरातल्या कोपऱ्यात तिच्या कांद्या भज्याच्या मिळकतीवर जगलेला आजारखाती नवरा काळाने उचलला अन रकमाच्या चुलवणावरची कढई उतरली ती कायमचीच.

रकमा आतून खचली. काळजातून तुटली. डोळ्यातूनसुद्धा आटली. रुपायाच्या आकाराचं कपाळावरचं कुंकू गळालेली आणि काटापदराच्या साडीतली रकमा गावाला दिसायची बंद झाली. होय! नात्या गोत्यांचा आधार तुटलेली रकमा तिच्या खणभर जागेतलं रिकामं लाकडी बाकडं आणि कुडाला उभी केलेली कढई सोडून कुठे गेली? माहित नाही...

...पुढं मागं पाऊसपाण्यात ढासळणाऱ्या तिच्या घराच्या पडक्या भिंतीकडे पाहून कोण म्हणायचं खंडोबाच्या यात्रेत दिसली. कोण म्हणायचं पंढरपूरच्या वारीत भेटली. खरं खोटं कोणालाच माहित नाही. या दुनियेच्या बाजारात एखादया वावभर जागेत रकमाचा श्वास अजून सुरु असेल की नाही माहित नाही. पण आजही शहरातल्या एखादया हॉटेलात गेलो की क्षणभर तरी तिथल्या किचन मध्ये डोकावून पाहतोच. मला लहानपणी फुकट कांदाभजी खाऊ घालणारी आणि जीवनाच्या खेळात हरलेली उध्वस्त रकमा भेटेल म्हणून...


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>