आरती जोशी....हरहुन्नरी लेखिका..नात्याचा पोत तपासते आहे...
वादळ – आरती जोशी
मनातल्या वादळाने अतिउच्च टोक गाठलं होत. इतक्यात 'त्याला' तू दिसलास..तुला बघताच वादळाने तुझ्याकडे झेपवायला सुरवात केली...मी कसंबसं 'त्याला' थोपवल...
थोड्या वेळानंतर तुझ्या जवळ येऊन बसले....तू माझा हात हातात घेतलास... माझ्या डोळ्यात बघितलं.... परत वादळ झेपावल तुझ्याकडे यायला...सगळं डोळ्यात जमा झालं...तितक्यात तू म्हणालास, 'काहीतरी मस्त कर आज...जाम भूक लागली आहे'... वादळ डोळ्याच्या कडेतून बघतच राहील तुझ्याकडे....त्यावर आता मनाने ताबा घ्यायाला सुरवात केली. ...आज त्याला हे वादळ दिसलं नाही म्हणून मला वाईट वाटतंय पण त्यानेही अशी कित्येक वादळ झेलली असतीलच की....तेव्हा मीही कदाचित माझ्याच विश्वात रमली असेल'
खरच निस्वार्थी, निरपेक्ष असं काहीच नाहीये का जगात????
तितक्यात अर्णव आला. माझा हात धरून म्हणाला.... 'आई, तुला काही होतंय का? तुझे डोळे असे काय दिसतायेत?...तुला आजीची आठवण येतेये का? चल आपण आजीला फोन करू ....तुला छान वाटेल...
डोळ्यातून सगळं वादळ वाहून गेलं.... निस्वार्थी, निरपेक्ष असं काहीतरी गवसलं त्याला...