Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

गंध-शशी डंभारे

$
0
0

शशी ही माझी एक आवडती लेखिका आहे. तिने स्वतःचे मार्केटिंग कधी केले नाही...त्यामुळे तिची दाखल ज्या प्रमाणात घ्यायला हवी तितकी घेतली गेलेली नाही. विदर्भातील बहुतांश लेखक लेखिकांचे हे प्राक्तन आहे आणि त्याला जबाबदार "सखोल" वाचक म्हणवणारे आम्ही आहोत. असो...शशीची एक उत्तम कथा.

गंध-शशी डंभारे

एके काळी शहरातील नंबर एक मानली जाणारी सपना टॉकीज आता शहरातील सगळ्यात भंगार जागा झालीय. या टॉकीजमधे रेल्वे कॉलनीच्या तरुण, किशोरवयीन, मध्यमवयीन, वयस्कर अशा सगळ्या वयोगटातील मुलांनी-मुलींनी, बायकांनी-पुरुषांनी आपापल्या वयात राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती , गोविंदा , अनिल कपूर आणि आमिर खान पर्यन्त क्रम राखत सिनेमे पाहिलेत.

टॉकीजसमोरच्या, पूर्वी ' हिंदुस्तान लॉज' नाव असलेल्या आता 'गैलेक्सी' असा नावात आणि व्यवस्थापनात बदल झालेल्या हॉटेलच्या सूट नंबर ३०३ च्या मोठ्याशा खिडकीत बसलेली माया 'सपना टॉकीज' च्या भूतकाळात रमलीय. २० वर्षांचा मोठा काळ वाहून गेलाय मधे. शहराने कुस बदललीय. जूनी कात टाकून नविन रंगीत, चकचकीत झुल पांघरलीय.

स्लाइडिंग विंडोची काच सरकवून मायाने सपना टॉकीजच्या गेट पर्यन्त आपली नजर पुरवली. लोखंडी ग्रिलच्या गेटला मोठंसं टाळं दिसतंय. आतल्या पैसेजमधे भर दिवसा अंधार पसरलाय. सगळं शहर बदलत असताना या टॉकीजलाच कुणी वाली कसा मिळाला नसेल? हिचं रूपांतर सिनेमैक्समधे का झालं नसेल अजून ? हा प्रश्न तिला पडत नाही, कारण जागोजागी चकचकीत बदल स्विकारलेल्या या शहरात काही जागा अजूनही आपल्या जूनेपणासह ठिगळासारख्या शहराच्या नवेपणाला बिलगून असलेल्या दिसल्यात तिला प्रवासात.

टॉकीज समोरची केळ्यांची हातगाडी तिथेच आहे. तिला टक्क आठवतोय आज ही तो गाडीवाला. आता तो नसावा, त्याचा वंशज असेल कुणी. गाड़ी ही बदलली असेल, पण जागा तीच. उजव्या बाजूच्या गल्लीतला 'शाम बियरबार' जुन्याच नावासह जुन्या जागेवरच दिसतोय. पण त्याची पूर्वीची रौनक गेलीय. डाव्या बाजूचे 'राज स्वीट मार्ट' शाबूत आहे. मात्र पूर्वी ते शहरातलं सर्वात दर्जेदार मिठाईचं दुकान वाटायचं, तसं आता वाटत नाहीये. शाम बियर बार आणि राज स्वीट मार्ट ही त्याकाळी सपना टॉकीज इतकीच चकचकित ठिकाणं होती शहरातली.

गाठ्यांची शेव, फरसाण, पापड्याच्या लांब लांब पट्ट्या, जाळीच्या झाकणांखाली गुलाबजाम, काचेच्या कपाटात लाडू, बर्फी आणि हलवा आताही मिळत असेलच तिथं. पण तितकिशी गर्दी दिसत नाही. पूर्वीसारखी. १० तारखेला पगार झाला की कॉलनीतले सगळे पगारदार इथून पिशवीभर खाऊ विकत घेत. अण्णाही. शहराची संध्याकाळ पूर्वीसारखी रम्य भासत नाही. 'तेंव्हा सगळंच रम्य होतं म्हणा ' मनात उमटलेल्या या विचाराने तिला नॉस्टल्जिक फील आला. इतका की त्या संध्याकाळी या रस्त्यावर दरवळणारे सगळे गंध तिच्या जाणिवांत जसेच्या तसे वाहू लागले, अगदी जसेच्या तसे.

शाळेतून घरी परतताना सगळ्यात आधी चौकात लागणाऱ्या पुष्पक हॉटेलच्या दरवाजा-खिडक्यांतून येणारा धूप आणि अगरबत्तीचा उग्र गंध. त्याच्या लगेचंच पुढे भाजीमार्केटचा सकाळपासून विकायला ठेवलेल्या ओल्या सुक्या भाज्यांचा मिश्र गंध. मधे लागणारे, जोडूनच असलेले मच्छी मार्केट. त्या परिसरात पसरून असलेल्या मासळीच्या ताज्या वासाने तिला तीव्र भूकेची जाणिव व्हायची नेहमीच. वाम,मांदेली, काटेरी, कोलंबी, सुरमई, राणीमासा हे कॉलनीच्या जेवणातील रूटीन मासे. तिचे पाय घराच्या दिशेने झपझप निघायचे मग. झपझप पुढे आलं की सोनेरी प्रकाशात न्हायलेला शाम बियरबार.

स्मरणातले गंध मागे पडून तिच्या स्मरणातले रंग सुरु झाले आता.

दुपारी ११.३० -१२ वाजता शाळेत जाताना, हा अगदी साध्या पाव -बटर -खारीच्या दुकानाइतका छोटासा दिसणारा बार संध्याकाळी ६ वाजता शाळेतून परतताना एकदम भव्य आणि सोनसळी रंगात उजळलेला असे. बारच्या दरवाजाशी एक छोटी पान-सिगारेटची टपरी. टपरीत नेहमी हिरवा, निळा, लाल , गुलाबी असा तीव्र रंगाचा बल्ब जळताना दिसे. नॉर्मल पांढऱ्या किंवा दुधाळ रंगांचा बल्ब कधीच दिसायचा नाही तिथे. कॉलनीत क़्वार्टर-क़्वार्टर मधे पांढरा किंवा दुधाळ रंगांचे बल्ब जळत. कुणाकुणाकडेच ट्यूब लाइट्स असत. बियर बारच्या पुढे, सपना टॉकीजची रंगीबेरंगी गर्दी, सेंट परफ्यूमचे सुगंध. त्यानंतर राज स्वीट भंडार मधून दरवळणा-या तळणाच्या गोड-तिखट वाफा. सगळे रंग - गंध तिला क्रमवारीने आठवले. जाणवले.

हे सगळे वेगवेगळे रंग - गंध मागे टाकत, थोडं सरळ चालत गेलं की मुख्य बाजारापासून वेगळं होत उजवीकडे आत जाणारा रस्ता धरायचा. हा रस्ता टोपल्या - सुपं विणणाऱ्या लोकांच्या झोपड्या ओलांडून पुढे रेल्वे रुळांना समांतर होतो. थोडं चालत गेलं एक रेल्वे फाटक दिसतं. इकडच्या तिकडच्या दिशेने ट्रैन येतेय का बघून फाटक क्रॉस केलं की एक छोटी डांबरी सडक. जी सरळ रेल्वे कॉलनीत तिच्या क्वार्टरला नेऊन सोडते.

हॉटेल गैलेक्सी च्या तिसऱ्या मजल्यावर रस्त्याच्या दिशेने उघडणाऱ्या त्या मोठ्याशा खिडकीत बसलेल्या मायाने शाळेपासून कॉलनी पर्यंतचा ३५ मिनिटांचा रस्ता मनाने, डोळ्यांनी आणि जाणिवेच्या माध्यमातून अलगद पार केला तेव्हा तिच्या हातातल्या मगातली कॉफी निवून थंडगार झाली होती. हात पुरेल इतक्या अंतरावर इंटरकॉम असूनही रूम सर्विसला कॉल करणे टाळलेच तिने. ती पुन्हा तोच रस्ता नव्याने न्याहाळू लागली. अधाशासारखी.

पाचवी ते दहावी, वय वर्षे ११ ते १६, रोज याच रस्त्यावरून शाळेसाठी ये-जा केली होती तिने. पुष्पक हॉटेलच्या समोरून आत जाणारी गल्ली पार केली एक चौक यायचा. त्या चौकातून चालत गेलं की अगदी दहाच पावलांवर तिची शाळा. त्या काळातली शहरातली सगळ्यात चांगली शाळा.

अण्णा रेल्वेत असूनही त्यांनी चौथी नंतर तिचे नाव रेल्वे शाळेतून काढून या शाळेत घातले होते. हिच्या आधीची त्यांची २ मुलं आणि २ मुली रेल्वे-शाळेतूनच मेट्रिक झालेली. माया त्यांचं शेंडेफळ. आधीच्या चार मुलांनातर बऱ्याच वर्षांनी मायाचा जन्म झाला. त्यामुळे इतर मुलांत नी मायाच्या वयात बरेच अंतर. मोठया छायाताईच्या लग्नात तर माया केवळ २ वर्षाची होती. त्यामुळे इतर मुलांपेक्षा मायाचे जास्तच लाड झाले त्या घरात. इतर मुलांपेक्षा सगळं जास्तच मिळालं मायाला. जयाताई अनेकदा आरडओरडा करायची, भांडायची अण्णांशी की 'तुम्ही भेदभाव करता, मायाचे जास्त लाड करता' वगैरे. पण अण्णा बधायचे नाहीत. माझी म्हातारपणाची काठी आहे म्हणायचे.

' माझी म्हातारपणाची काठी ' ...... या वाक्याच्या आठवणीने मायाला एकदम भडभडून आले. आण्णांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. अण्णा असायला हवे होते, किमान आपण खरोखर ठीक आहोत आता हे बघायला अण्णा हवे होते. अण्णा, माई, किशोरदा , मोहनदा या शहरात तिचे असे आता कुणीच राहत नाही या विचाराने तिला विषण्ण वाटले. या विषण्णतेने लगेचच आपला ताबा घेवू नये आणि एकटे पणाच्या अंधाऱ्या दरीत पुन्हा आपण खोल खोल कोसळू नये म्हणून मान झटकून ती पुन्हा त्या रस्त्यावरची तिच्या स्मृतीतली दृश्ये शोधण्यात हरवून गेली.

अण्णांचे बोट धरुन ती तासंतास या टॉकीज समोरचे नानाविध सिनेमांचे पोस्टर्स बघण्यात हरवून गेलेली असे. विशेषता हीरोइन्सचे ड्रेस, केशभूषा , कपाळावरच्या टिकल्या, काजळाच्या रेषा वगैरे वगैरे. अण्णा तोवर ही भाजी घे, ती फळं घे, टोस्ट घे -बटर घे, मासे घे, मिठाई घे असे वेगवेगळ्या दुकानांत व्यस्त असत. 'राज स्विट मार्ट' नंतर मुख्य स्टेशन व्यतिरिक्तचे एक छोटे ऑटो स्टैंड. १०-१२ ऑटो इथे नियमित उभ्या असत. ऑटो चालकांचे चेहरे ओळखीचे. अण्णांना तर नमस्कार वगैरेही करत त्यातले बरेच. पायी जायचे नसेल तर इथून कॉलनीसाठी ऑटो मिळत. बाजार-पिशव्या जास्त असल्या की अण्णा ऑटो करत. कॉलनीच्या रस्त्याकडे न वळता बाजारच्या रस्त्यानेच सरळ चालत राहिले की अण्णांच्या ओळखीचे एका सिंधी माणसाचे कपड्याचे छोटे-बसके दुकान लागायचे. कॉलनीतले जवळजवळ सगळे त्याच दुकानातून कापड खरेदी करत.

अण्णा तिथून मुलींसाठी फुलफुलांचे आणि मुलांसाठी प्लेन किंवा पट्यापट्ट्यांच्या डिझाईनचे कापड घेत. माईसाठी कॉटनच्या साड्या आणि त्यांच्यासाठी शर्ट पैंटचे कापडही तिथूनच घेत. मुलांचे शाळेचे ड्रेसही. बरेचदा सगळी कापड-खरेदी उधारीवर असे. दिवाळीच्या बोनस मधे मग अण्णा सगळ्या उधा-या चुकवत. कॉलनीच्या वार्षिक खर्चाची बरीचशी गणितं दिवाळीच्या बोनसशी निगडीत असायची.

मायाने पहिल्यांदाच अण्णांच्याच नाही तर कॉलनीच्याही वर्षानुवर्षाच्या परंपरेला आव्हान देत बाजारातल्या हैंगरवर रंगीबेरंगी कपडे लटकवणा-या इतर दुकानांतून तिच्यासाठी कपडे घ्यायला अण्णांना भाग पाडले. अण्णांनी तिचे सगळेच हट्ट पुरवले. स्वत:च्या कुवतीबाहेर जावून. अण्णा-माई दोघेही इतर मुलांचा रोष पत्करून आपली हौस मौज पुरवत राहिले आणि आपण त्यांच्या मान मर्यादांचे धिंडवडे उडवत राहिलो कायम.

' अण्णांनी आपल्याला वेळीच अडवले असते तर?' हा प्रश्न मनात उमटला आणि इतर प्रश्नांसारखाच विरुन गेला.

आण्णा म्हणजे हिरामण रंगनाथराव जगताप यांना कॉलनीत अण्णा म्हणूनच ओळखत सगळे. ते रेल्वेत फिटर होते. मात्र त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना कॉलनीत खुप मान होता. कॉलनीतले अनेक लहान सहान वादविवाद त्यांच्या शब्दावर मिटत. कॉलनीतल्या सगळ्याच नांदत्या सुनांना अण्णांचा आधार वाटायचा तर नांदायला गेलेल्या लेकीबाळींच्या सासरी अण्णांचा वचक असायचा. कॉलनीतले कोणतेही धार्मिक, सामाजिक तंटे अण्णा समजूतदारपणे हाताळत. त्यांच्यामुळे कॉलनीत शांतता आहे असे म्हणायचे सगळे. सगळ्यांना अण्णांचा मनापासून आदर होता. कॉलनीतल्या एका रांगेत १० अशा ५-६ रांगेतून जवळपास १५-२० मुलं मिळून बाजारातल्या त्या शाळेत जात.

रेल्वेशाळे ऐवजी इतर शाळेत जाणारी मुलं त्यावेळची कॉलनीतली हुशार मुलं असायची. त्यांना जास्त चांगली शाळा, जास्त चांगले शिक्षण देण्याचा त्यांच्या पालकांचा प्रयत्न असे. मायाच्या बाबतीत फारसे हुशार असणे हे कारण नव्हते. अण्णांची हौस हेच मुख्य कारण. त्यामुळे पाचवीत असताना इतर मुलं-मुली जेंव्हा रस्त्याने सोबत चालताना I-We, You -You, He, she, It वगैरे पाठ करत किंवा सातवीत असताना पिरॅमिड-थिस्बीच्या इंग्रजी कथेतल्या सुंदर उता-यांना सगळ्यात आधी कुणी पाठ केलय अशी चर्चा करत , तेंव्हा ही रस्त्याच्या कडेचे होर्डिंग्स, पोस्टर्स पाहत चालणे पसंत करायची. हे होर्डिंग्स, पोस्टर्स, त्यावरील चकचकित हीरो -हिरोइन्सचे फोटो, त्यांच्या फैशन्स, कपडे, हेयर स्टाइल्स यांची जादू, मोह याच काळात आपल्यात रुजत गेला. अभ्यासापेक्षा आपण अभ्यासाबाहेरच जास्त रमलो या विचाराने मायाचं काळीज आता उगाचच उसवलं . तिची नजर जुन्या दिवसांत अधिकच खोल खोल शीरली.

जयाताईचे लग्न होऊन ती सासरी गेली आणि मोहन दादा-किरणदादाचे लग्न होऊन वहीन्या कॉलनीत नांदायला आल्या तेंव्हा माया जेमतेम सातवीत होती. दादा -वहीनींची मायापुरी, सत्यकथा किंवा गुलशन नंदाची उपन्यासं किंवा त्याही पलीकडची तिने वाचू नयेत अशी पुस्तकं चोरुन चाळताना तिची नजर फ़क्त त्यातल्या हिरोइन्सच्या फोटोवर स्थिरावायची.

रेखा, हेमामालिनी, परवीन बॉबी, रीना रॉय, अनिता राज पासून टीना मुनीम, पुनम ढिल्लों ,श्रीदेवी, जया प्रदा, पद्मिनी कोल्हापुरे पर्यंत तिने एकाग्रतेने केलेला हा एकमेव अभ्यास. हीरोइन्सचे फोटो पुस्तकांतून, मासिकांतून व्यवस्थित कापून त्यांचा संग्रह दप्तरात ठेवायची तिची सवय आणि बाजारातल्या मोहन टेलरला ते फोटो दाखवून तस्सेच ड्रेस शिवायचा तिचा हट्ट सुरुवातीला कॉलनीच्या करमणुकीचा विषय होता.

अण्णा माई तिची कशीबशी समजूत काढत. मात्र जेमतेम सातवीतच मायाचे एकूण राहणीमान, तिच्या जाडसर पेन्सिल फिरवलेल्या कमानदार भुवया, डोळ्यांच्या कडा लांघून ओसंडणारे काजळ, गालावर काळ्या स्केच पेनने रोज नव्या जागेवर उमटणारा तीळ हे हसण्यावारी नेण्याईतके बालिश राहिलेले नाही, हे कॉलनीच्या चांगलेच लक्षात आले. चांगल्या क़्वार्टरमधल्या आयांनी आपल्या मुलींना माया पासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या.

आण्णा एव्हाना रिटायर्ड झाले होते. वयानुसार अधिकच हळवेही. माई मुळातच साधी. मायाची लक्षणं बरी नाहीत हे कळायला त्यांना बराच वेळ लागला. बहिणी सासरी, भाऊ आपापल्या लग्नांच्या नवाळीत रमलेले. मायाला टोकणारे कोणी नव्हते. ती तारुण्याच्या उंबरठ्यालाच संपूर्ण आयुष्य समजून बसलेली. शाळा, ट्यूशन ही फक्त तिची सौंदर्य प्रदर्शनाची ठिकाणं बनलेली. अभ्यासात जेमतेम रिजल्ट राखत दहावी पर्यंत कशीबशी पोहचलेली माया कॉलनीतल्या आणि कॉलनी बाहेरच्याही तरुण, किशोरवयीन मुलांच्या रुटीन दिनचर्येवर परिणाम करु लागली. शाळेच्या नावाखाली मुलं मायाच्या पाठीपाठी चालणे पसंत करीत, मायाला चीठ्ठी लिहत, चिठ्ठ्यांची उत्तरं मागत. हिरोगीरी करत. त्यातली बरीचशी तशीही वाया गेलेली, सपना टॉकीज समोर, शाम बिअर बार जवळ धुरांची वलयं काढणारी किंवा राज स्वीट मार्ट लगतच्या रिक्षास्टैंडवर टाईमपास करणारी असत. पण दुर्दैवाने त्यात काही चांगल्या क़्वार्टर मधली भोळी, नुकतीच मिसरुड फुटलेली, किशोर वयातील भावनीक, शारिरीक गोंधळ सांभाळू न शकणारी साधी मुलंही होती.

माया आपल्या मागे असणा-या या ताफ्याला ऐंजोय करणं शिकली लवकरच. आपल्या कटाक्षांनी या ताफ्याला घायाळ ठेवणं तिला छानच जमायला लागलं होतं. आवडतही होतं. जमेल तशी ती आपल्या मागे असलेल्या प्रत्येक मुलाला झुलवत होती. ताफ्यातल्या कुणा एकाचे होण्यापेक्षा गळ्यांच्याच नजरेत मिरवत राहणं तिला अधिक आवडत होतं. हे असेच चाललं असतं, जर घाईघाईत राजू आणि संदिपच्या बाबतीतल्या घटना घडल्या नसत्या.

राजूचा उल्लेख स्मरणात आला तसा तिच्या जाणिवांत एक कडवट चव पसरली. मात्र त्याच्याच जोडीने आठवली मीरा आणि मग सा-या कडवटपणाची जागा मंद उदबत्तीच्या सुगंधाने घेतली. मीरा तिची लहानपणापासूनची मैत्रीण. सखी, सोबतीण. माया जितकी चंचल, मीरा तितकीच सुजाण, समजदार. जगतापांच्या क़्वार्टरपासून तिस-या क़्वार्टरमधे राहणा-या सोनवणेंच्या घरातली मीरा चार भावंडांत सगळ्यात मोठी. कडक स्वभावाच्या आई वडिलांच्या शिस्तीत वाढणारी मीरा मायाच्याच वयाची असली तरी मुळातच मवाळ स्वभावाची, समजदार आणि कमालीची कुटूंबवत्सल.

माया-मीरा लहानपणापासून एकत्र वाढल्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक मैत्री असणे स्वाभाविक असले तरी वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षीच मायाने जे गुण उधळणे सुरु केले होते त्या पार्श्वभूमीवर मीराने तिच्याशी मैत्री सुरु ठेवणे कॉलनीत कुणालाच पटण्यासारखे नव्हते. मीराच्या आईने मीराला चांगली तंबी देऊनही मीरा मायाशी पूर्णत: वेगळी होत नव्हती. बालपणापासूनची मैत्री तोडणे तिला पटत नव्हते. त्या पेक्षा ती मायाला सुधरवण्याचा प्रयत्न करायची. जे की अजीबातच शक्य नव्हते. कॉलनीला मीराच्या चांगुलपणावर, चारित्र्यावर जास्त विश्वास असल्याने तिने मायासारख्या मुलीसोबत राहण्यावर आक्षेप उठायचे तसेच विरायचेही.

मायाने मीराला, तिच्या सल्ल्यांना कधीही फारसे गांभीर्याने घेतले नसले तरी तिने तिच्याकडून मीराला कधी टाळलेही नाही. मुळात ती मीरासोबत असली की माई अण्णा निश्चिंत असायचे. त्यांच्या अर्ध्या तक्रारी कमी व्हायच्या. दुसरे म्हणजे तिच्या अभ्यासाची जी काही डगमगती नौका होती ती पूर्णतः मीराच्या वह्यांवर तरलेली असायची. मीरा, नाकी डोळी निटस असली तरी मायाच्या मते दिसायला खुप सुंदर वगैरे नव्हती . सुंदर म्हणजे केसांत फॅशनेबल रिबन्स, डोळ्यांत काजळ , हिरोइनसारखे कपडे घालणे अशीच काही तिची त्यावेळची समज. त्यामुळे मीराशी त्याही बाबतीत स्पर्धा वगैरेचा प्रश्न नव्हता. तरी शाळेतल्या उनाड असला तरी सगळ्यात हैंडसम दिसणाऱ्या राजूने मीराला का प्रपोज केले असेल? हा प्रश्न आत्ताही तितक्याच तीव्रतने उमटला मायाच्या मनात.

मायाला एकंदर या गोष्टीचा बराच मनस्ताप झाला होता. तिच्या सौंदर्य साम्राज्याला हा मोठाच धक्का होता. काय पाहिले इतक्या सामान्य मुलीत राजूने हेच कळत नव्हते तिला. त्याही पुढे तिने तो स्वताचा वैयक्तिक आपमान मानला. वास्तविक मीराने शांतपणे राजूला नकार दिला होता आणि असे प्रपोज़ वगैरे प्रकार फ़िल्मी असून ते गंभीर मानायचे नसतात असे मायाला समजवले होते. तरीही मायाच्या मनातला आपमान पुसला जात नव्हता. उलट ती राजूला आकर्षित करण्याचे नवेनवे फंडे शोधत राहिली. पुनम धिल्लौ सारख्या सिल्वर रिबन्स वेणीच्या पेडीत गुंफून शाळेत येणारी ती पहिली मुलगी होती. त्याबददल प्रन्सिपलने तिचा चांगलाच समाचारही घेतला होता. त्याने तिला विशेष फरक पडला नव्हता. मात्र तिच्या त्या विशेष प्रयत्नांना चांगलंच यश आलं होतं. राजू नावाचं ते उनाड ढोर लवकरच तिच्या दिशेने वळलं होतं.

जेमतेम दहावीत शिकणा-या राजूचे आणि मायाचे प्रकरण एखाद महिन्यातच शाळेत आणि कॉलनीत वणव्यासारखं पसरलं. कॉलनीत अशा गोष्टी वेगानेच पसरायच्या. पण त्याहून वेगाने पसरली एक नवीच गोष्ट की कॉलनीत मागच्या लाईनमधे क़्वार्टर नंबर १७ मधे राहणाऱ्या गायकवाडांच्या एकुलत्या एक मुलाने, वसंताने माया-राजू प्रकरण ऐकून त्याच्या दोन्ही मनगटाच्या नसा कापून घेतल्या आहेत.

माया, मायाचे आईवडिल आणि वसंतचे आईवडीलच नाही तर आक्खी कॉलनीच या नव्या प्रकरणाने हादरुन गेली. डॉक्टरांनी बऱ्याच प्रयत्नांनी जीव वाचवलेला वसंत मायाशी लग्न या हट्टावर अडून बसला. जेमतेम १८ चा वसंत आणि १६ ची माया. मायाच्या चंचल वागणुकीने तिचे कुटूंब आधीच हैराण होतं. गायकवाड कुटूंब जातीतलं होतं. गायकवाडही रेल्वेत फिटरच होते. आणि ITI ला असलेल्या वसंतला ते लवकरच रेल्वेत चिकटवणार होते. मुलाच्या हट्टापुढे हवालदिल गायकवाडांना मायामुळे हैराण असलेल्या जगताप कुटुंबाने तात्काळ होकार दिला.

माया जरा गोंधळलीच. तिला इक्यात लग्न वगैरे नकोच होते आणि झाले तरी राजूच्या आणि तिच्या तथाकथित प्रेम प्रकरणाचे काय हाही प्रश्न समोर होता तिच्या. तिच्या या गोंधळातून राजूनेच तिची सुटका केली. "लग्न बिग्न? दहावीतच?" खुप जोराने हसत 'तू खुशाल लग्न करुन टाक' म्हणत त्याने काढता पाय घेतला. माया समोर मग वेगळा काही विषयही उपलब्ध नसल्याने आणि घरातल्यांनी दाखवलेल्या अतिव घाईमुळे मायाचे लग्न दहावीची परिक्षा ऐन तोंडावर असतानाच उरकले गेले जगताप-गायकवाड़ या दोन्ही कुटुंबांनी मोकळा श्वास घेतला. कॉलनीनेही. हळहळली होती फक्त मीरा.

"किमान १० विची परीक्षा तरी होउ द्यायला हवी होती. मायाला अक्कल नाहीच, पण घरातल्यांनी तरी विचार करायला हवा होता" वगैरे तिची तक्रार होती.

लग्न, संसार, सासू -सासरे, परिवार, मुलं यातलं काहीच धड कळण्याचं मायाचं किंवा वसंताचं वय नव्हतं. किशोरवयातली आकर्षणं फ़क्त. प्रेमाचा अर्थही न कळलेली ही दोन मुलं संसार काय करणार होते? पूर्वी शांत शालीन स्वभावाच्या वाटणाऱ्या वसंताचं वेगळंच रूप लग्नानंतर कॉलनीला दिसु लागलं. त्याच्या डोक्यातलं राजू नावाचं भूत उतरेना. उलट मायाच्या चारित्र्याबाबत तो प्रचंड संशयी बनला. त्याचं प्रेमाचं भूत मात्र लग्नानंतर महीना दोन महिन्यात पूर्ण उतरलं. आता तो फ़क्त मायावर संशय घेणं, तिच्यावर नजर ठेवणं याच गोष्टीत गुंतला. एक मिनिटही ती नजरेआड़ झाली तरी तो घर डोक्यावर घ्यायचा. भांडण करायचा. मारझोडीपर्यन्त पोहचायचा .

थोडक्यात मायाच्या लग्नाने जगताप कुटुंबाची मायाच्या बाबतीतली समस्या संपण्या ऐवजी वाढलीच होती. कॉलनीतल्या अनेक मुलींचे विस्कटू पाहणारे संसार सुरळीत मार्गी लवणाऱ्या अण्णांना आपल्या मुलीचा संसार मार्गी लावणे जमत नव्हते. त्यातल्या त्यात मायाला लवकरच दिवसही गेले. गर्भार पणाच्या आठवणीने माया जागच्या जागी उसासली. वसंत, त्याचे तथाकथित प्रेम, त्याचा छळ आणि ते अकाली गरोदरपण. शरीर आणि मन दोघांनाही जणू जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती नशिबाने. उछ्रखल स्वभावाच्या मायाला फार काळ ही शिक्षा सोसणे शक्यच नव्हते. पाचवा-सहावा महीना लागताच ती जी माहेरी आली ती बाळ सहा महिन्याचं झालं तरी सासरी जाण्याचं नाव घेईना. अण्णा-माई , वसंताचे आई-वडील सगळे तिला वसंता बदलला असल्याची हमी देत असले तरी.

मुलगा झाल्यावर वसंत खरोखरच बराच बदलला होता. मायाला घरी चलण्याबाबत विनवत होता . मध्यंतरी त्याला नोकरीची ऑर्डर ही मिळाली होती. मुलाचा पायगुण म्हणाले सगळेच. वसंता संध्याकाळी जगतापांच्या घरीच असायचा. तासंतास बाळाशी खेळायचा. अण्णा माईंनी बरीच समजूत काढून तिला सासरी पाठवले. मनात नसतानाच माया वसंत बरोबर नांदायला तयार झाली. पण गर्भार पणातुन मोकळं झालेल्या मायाला आता कुठलाच पाश नको वाटत होता. ती सासरी आल्यावर बाळाची सगळी जबाबदारी सासू सासऱ्यांनी घेतली. वसंता नंतर घरात पहिलंच बाळ. दोघं हौशीने बाळाचं सारं करत. संध्याकाळनंतर बाळाचा ताबा वसंतकड़े. रिकामपण मायाच्या अंगावर येवू लागलं. तिच्या वयाच्या मुली आता कॉलेजला जात होत्या आणि ही एका मुलाची आई होऊन बसलेली.

लग्न ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे हे तिला कळून चुकले होते. लग्नाच्या धामधुमीतच मैट्रिकचे पेपर देवून कसेबसे काठावर पास झाल्याच्या योग्यतेवर तिला आता कॉलेजला एडमिशन घ्यायची होते. आपला पुढील शिक्षणाचा हट्ट तिने अण्णांकरवी, वसंत आणि तिच्या सासु-सासऱ्यांच्या गळी उतरवला. बिचारे अण्णा, तिचा शिक्षणाचा हट्ट योग्यच समजून तिच्या कॉलेजचा सगळा खर्च स्वत: उचलत होते.

माया मात्र तिच्या मुळ स्वभावानुसार कॉलेज एन्जॉय करत होती. घर, कुटुंब, नवरा, मुलगा या सगळ्या तिला आता निव्वळ कटकटी वाटू लागल्या होत्या. अभ्यासाच्या, परीक्षेच्या सबबीखाली ती जास्तीत जास्त वेळ माहेरीच थांबू लागली. कॉलेज, कैंटीन, कट्टे, हॉटेलिंग आणि तशातच पुन्हा आयुष्यात आलेला राजू.

रंगेल स्वभावाचा राजू तिला वसंता पेक्षा खूपच सरस वाटला. तिचे लग्न झालेले असतानाही राजू तिच्याकडे पुन्हा आकर्षित झाला हा तिला तिच्या सौंदर्याचाच विजय वाटला. राजूच्या आणि तिच्या चर्चा कॉलेज मधे सुरु होऊन कॉलनीत संपू लागल्या. त्यातच काही दिवसांत राजूला तिच्या व्यतिरिक्तही अनेक मैत्रिणी आहेत हे लक्षात आल्यावर चूक सुधारण्याऐवजी तो आपला अपमान समजून, साम-दाम-दंड-भेद तत्वावर त्याचे लक्ष केवळ आपल्याकडे वेधावे, त्याला कॉम्प्लेक्स द्यावा म्हणून तिने कॉलेजमधल्या इतर मुलांशी जास्त मैत्री दाखवणे सुरु केले. आणि यातून सुरु झाले एक दुष्ट चक्र. एकेक नाव, एक एक मुलगा, एक एक प्रकरण. अर्ध्या खऱ्या अर्ध्या खोट्या वन्दतांवर विश्वास ठेवत माया हे नाव कॉलनीने ब्लैकलिस्ट मधे टाकले.

वसंताने डिवोर्स केस फाइल केली.

तत्पूर्वी अशाच एका बातमीने वैतागलेल्या वसंतने तिला एका रात्री खुपच मारहाण करुन घराबाहेर काढले होते. किशोरदा-मोहनदाने अण्णांना मायाला घरात घ्यायचे नाही अशी तंबी दिलेली असल्याने मायाला माहेरी जाणेही शक्य नव्हते. अशा अवस्थेत मायाला आठवले मीरा रात्री उशिरापर्यन्त अभ्यासासाठी जागी असते. मायाची अवस्था पाहून मीरा लगेच द्रवली. स्वत:च्या आई वडिलांना पत्ता लागू न देता मीराने रात्र भर मायाला अभ्यासाच्या खोलीत लपवून ठेवले. आणि सकाळी कॉलनी जागी व्हायच्या आत स्वताच्या पॉकेट मनीतून जमवलेले सगळेच्या सगळे पैसे मायाच्या हातावर ठेवून, मायाची सगळ्यात मोठी बहिण छायाताईच्या गावी जाण्याची व्यवस्था केली. तिकडे जावून चांगले वागण्याचे, इकडे सगळे व्यवस्थित झाले की परत येण्याचे आणि उरलेले शिक्षण पूर्ण करण्याचे वचन घेवून.

मीरा कुठे असेल आता? माया भानावर आली स्वत:च्याच या प्रश्नाने.

नक्की काय करायचेय , कसे वागायचेय, कसे जगायचेय याचा काहीच आदमास नव्हता तिला स्वत:लाही तेंव्हा. पण सगळी बंधनं धूड़कावून नव्या प्रवासाला सुरुवात केली होती त्याच दिवशी तिने.

लवकरच वसंतकडून डिवोर्स तिने मान्य केला आणि तो ही वसंताची मुख्य अट 'मुलगा त्याच्याच कड़े राहणार' मान्य करुन. मुलाचा तिला नी मुलाला तिचा लळा नव्हताच. मुलगा वसंत आणि त्याच्या आई वडलांजवळच खुश होता.

अण्णा प्रचंड खचले तिच्या डिवोर्सने, माईने हाय खाल्ली. किरण आणि मोहनने अण्णा-माईला माया बद्दल स्पष्ट नापसंती दर्शवली होती. त्यामुळे मायाने नासिकला छायाताईकडेच काही दिवस रहावे असे ठरले. छाया ताईच्या मुली जवळजवळ मायाच्याच वयाच्या होत्या. ३-४ वर्षांनी माया मोठी. कॉलेज पूर्ण करून मायाने स्वताच्या पायावर उभे रहावे असे ताईचेही प्रयत्न होते. पण मायाचे लक्ष शिक्षणात पूर्वीही कधी लागले नव्हते, पुढेही लागणार नव्हते. मात्र तिला तिथेही नवनवे मित्र मिळाले. पैकी एकाने तिला लग्नाचे वचन देवून दुबईला नेले.

माया नावाचा अध्याय कॉलनीसाठी इथेच संपला. कॉलनीत 'माया' या नावाचा शिवी सारखा उच्चार झाला बरेच दिवस.

अण्णांचा मान सन्मान मायाने धुळीला मिळवला होता. अण्णा त्या धक्क्यातुन कधीच सावरले नाहीत. 'माझ्या मरणाला माया नसावी' ही एकच इच्छा व्यक्त करून ते गेले. माई ही त्यांच्या पाठोपाठच काही वर्षांत. किरण मोहनने कॉलनी सोडली. वसंताने नात्यातल्याच एका शालीन, समजदार मुलीशी लग्न केले. तो ही कॉलनी सोडून गावी बदली घेवून तिकडेच रहायला गेला.

दुबईत स्थिरावण्यासाठी मायाला बरेच कष्ट उपसावे लागले. तिच्याजवळ पुरेसे शिक्षण नव्हते की कुठल्या कामात कौशल्य. दुबईतुन काही दिवसासाठी भारतात येणाऱ्या मूली-बायका- रुष सांगतात तितके दुबईतील जीवन चकचकीत किंवा सोपे नाही, निदान तिच्यासारख्या अर्ध शिक्षित मुलीसाठी तरी. हे तिला लवकरच लक्षात आले. पण तिला सांभाळणारे कुणी नव्हते, तसे तिला अडवणारेही कुणी नव्हते. मित्राने तिच्याशी लग्न बीग्न केले नाही. तो आधीच विवाहीत होता. तिनेच मग तिच्या साम-दाम-दंड-भेद तत्वांनुसार एक-एका मित्राची शीडी करत आपली जागा तयार केली. हवे तिथे हवी ती तडजोड करत. कारण तिच्यासाठी भारतात आता एकही दार उघडे नव्हते.

दरम्यान तिच्या डोळ्यावरची झापड़ कधीचीच उडाली होती. आपण काय काय गमावलय हेही लक्षात आलं होतं. अण्णा, माई, वसंत आणि बाळ या सगळ्यांचे आपण गुन्हेगार आहोत ही टोचणी जीव पोखरत होती. तिला कुणालाच डिस्टर्ब करायचे नव्हते पण २० वर्षे पोरकेपण उपरेपण भोगत असलेल्या तिला स्वत:चा एक तरी माणूस डोळ्याने पहायचा होता. कुणीही चालणार होतं.

मागच्या ३ दिवसापासून ती हॉटेल गैलक्सीच्या सूट नंबर ३०३ च्या खिडकीत बसून रस्ता न्याहाळतेय. एखादा चेहरा, एखादा माणूस ओळखीचा दिसावा इतकीच अभिलाषा ठेवून.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>