हे परकेपण जीवघेणे असते...ज्याच्या वाट्याला येते त्याला ते कळते...
परकी - ऋचा देशपांडे
तिचा जन्म झाला आजोळी. परक्याची पोर म्हणत मामाच्या मुलांकडे त्यांचा जास्त ओढा. वडिलांकडच्या नातेवाईकांनी 'परक्याचे धन' म्हणत काही आपलं मानलं नाही. लग्नानंतर आई वडिलांना जबाबदारीतून मोकळं झाल्याचा आनंदच अधिक होता. भावंडं अशी नव्हतीच, एकुलती एकच होती ती. होते ते चुलत, मामे, आत्ये, मावस भावंडंही दूरच राहिलेत सर्वार्थाने.
मग लग्न झालं तरी प्रेमविवाह आणि मुलाच्या पसंतीची, आमच्या नाही असं म्हणत तिला सासरच्यांनीही प्रत्येक निर्णयात दूरच ठेवलं,कर्तव्याची आठवण करून देत असतानाही. प्रेम तर दूरचीच गोष्ट. नवऱ्याने दिलं ते गोड मानत गेली. इतकंही प्रेम तिला कधी कुणी केलं नव्हतं. त्या थोड्याबहुत (क्वचित स्वार्थी)प्रेमाला तिने अलवार सांभाळून ठेवलं पण 'बायकोचा गुलाम' म्हणत बाकीच्यांच्या दबावाखाली तोही तिला आताशा फार जवळ येऊ देत नसे.
मुलं मोठी होईतो मागे मागे करायचीत. ती कामांत, अभ्यासात गढून गेलीत, बाहेरच्या जगात रमलीत. ती मात्र जाईल तिथे परकीच समजली गेली, वागवली गेली. प्रेम देत देत ती स्वतः मात्र प्रेमाला पारखी राहिली. प्रेमालाही ती कदाचित परकीच वाटली.