दृश्य आपण पाहताच असतो...दृष्टी मिळाली की त्यातील व्यंग जाणवू लागते...बरोबर?
विक्रम
' प्याकेजिंग का जमाना है बॉस - मधुरा गिरधर
रविवारच्या आठवडी बाजारातला एक किस्सा.
"लसुण ?" "३० रुपये पाव" "१/२ पाव लसुण आणि १० रुपयांचं अद्रक द्या " आई आणि भाजीविक्रेत्यातला संवाद सुरु होता.
मी नेहमीप्रमाणे भाजीची पिशवी पकडून बाजारात चाललेल्या नित्याच्या गोष्टींकडे बघत होती. तेवढ्यात भगवे वस्त्र परिधान केलेला एक संतवजा माणूस नजरेस पडला. एका खांद्यात त्याने लोंबकळणारी झोळी अडकवली होती आणि त्याच्या दुसऱ्या हाती कडी असणारं एक भांडं होतं. एक एक करून तो प्रत्येक भाजी विक्रेत्याकडे भांडं समोर करत होता आणि क्षणाचाही विलंब न करता सगळेच भाजी विक्रेते त्याच्या पात्रात काही न काही टाकत होते.
कुणी एक लसणाचा गड्डा, कुणी एक सिमला मिरची तर कुणी थोड्या मिरच्या, सांभार. हे बघून मी मोठ्या कुतुहलाने आईच लक्ष त्याच्याकडे वेधलं. लगेच आई म्हणाली, "त्याच्या हातातल्या भांड्याला भिक्षापात्र म्हणतात", आणि आम्ही पुढल्या दुकाना कडे वळलो.
एक क्षण माझ्या डोळ्यांसमोर सकाळी गल्लीत भिक मागत फिरणाऱ्या मुलींची प्रतिमा आली. विस्कटलेले केस, मळकट फ्रोक आणि हाती अन्युमिनीयमच भांड असा एकूण अवतार त्यांचा. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. "भिक्षा आणि भीक" यात फरक काय? कारण दोन्हीमध्ये 'मागणे ' ही कृती तर सारखीच आहे.
विचारांचं चक्र फिरू लागलं आणि थोडी जुळवाजुळव केल्यानंतर जाणवलं, फरक हा 'मागणे' ह्या कृतीत नसून तो 'देणे' ह्या कृतीत आहे. मागणारा भिक्षुक असो वा भिकारी, अपेक्षा एकच 'मागितल्यावर’ काही न काही तरी मिळेल. पण देणाऱ्याचे हेतू मात्र वेगवेगळे असू शकतात. भिक्षा मागणारा भगव्या वस्त्रात आहे म्हणजेच त्याला काही देणे हे 'दानकार्म किंवा पुण्यकर्म' आहे असे समजून सन्मानाने जे आपण खातो आणि वापरतो तेच, त्याच दर्ज्याचे दान त्याला दिले जाते.
आणि अगदी विरुद्धार्थी विचार भीक घालताना केल्याच दिसत जे अन्न उरलंय,ते बुरशी लागण्याऐवजी आणि वापरत नसलेल्या वस्तू घरात अडगळ वाढू नये म्हणून भिकेच्या स्वरुपात दिल्या जातात आणि अधोरेखित करण्या लायक गोष्ट म्हणजे नाक- तोंड वर करत चेहेऱ्यावर नकळत उमटलेला 'एकदाचं देऊन टाकलं ' हा भाव.
'दाता' एकच, मग हा फरक का? माझी आपली सवयच ही. उगाच प्रश्नांची साखळी विणत बसण्याची. आता तर बाजार आटोपून मी आणि आई घरापाशी येउन पोहोचलो होतो. मग विषय संपवायचा म्हणून माझा मलाच मी साधासोप्प उत्तर देऊन टाकलं... प्याकेजिंग का जमाना है बॉस…..!!!