Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

उत्तरक्रीया-Madhavi Vaidya

$
0
0

किती समृद्ध कथा आहे ही...डॉ. माधवी वैद्य एका मोठ्ठ्या सुट्टी नंतर पुन्हा एकदा नुक्कडवर

उत्तरक्रीया - डॉ. माधवी वैद्य

समोर चिता ढणढणत होती. ती शांत मनानं कोणा बेवारशी बाईची उत्तरक्रीया मनोभावे पार पाडत होती. हे काम तिनं आपण होऊन अंगावर घेतलं होतं. सकाळी सकाळीच चर्चच्या काही नन्स तिच्याकडे बोलवायला आल्या. ‘ताई ! एक बेवारशी बाई आहे,तिला अग्नी द्यायचा आहे. याल का? नाही, खूप कामात दिसताय तुम्ही,एकदा वाटलं आपणच उरकून टाकावं सगळं. पण तुम्ही सांगितलं आहेत ना! असं काही काम असेल तर बोलावत चला म्हणून आलो. वेळ नसेल तर.’ ती उत्तरली ‘नाही नाही काम काय होतंच राहील. मला बोलावत चला तुम्ही.’ एका कर्तव्य भावनेतून नन्स हे काम करत होत्या आणि तशाच कर्तव्य भावनेतून ती त्यांना साथ देत होती. गुरुजींनी सांगितलेले सारे अंत्यविधीचे संस्कार तिनं मन घट्ट करून पार पाडले होते. त्या जळत्या जिवा शेजारी त्याच्यासाठी चार अश्रू ढाळायलाही कोणीच नव्हतं... तिच्या मनात आलं, कोण असेल ही अभागी बाई? जिच्या मागे पुढे कोणीच नाही? कशी जगली असेल ही? काय काय सोसलं असेल हिनं? काय काय भोगलं असेल? तिचं मन हेलावून गेलं. दर वेळी अशा बेवारशी प्रेताला अग्नी देताना तिला असंच हेलावून जायला होई. त्या व्यक्तीसाठी जमेल तसं प्रेमानं सर्व करून ती त्याला अग्नी देत असे. विचारात गढून गेलेली ती भानावर आली. समोर चिता जळत होती. ज्वाळा त्या बाईला चोहो बाजूंनी घेरू लागल्या. जिवंतपणी जगण्याचे चटके बसलेल्यांना त्या ज्वाळाही सुखावून जात असतील का? एका कवीनं आपल्या कवितेत म्हणून ठेवलं आहेना ! ‘शव हे कवीचे जाळू नका हो,जन्मभरी हा जळतचि होता.’ फक्त कवीच नाही , अनेक माणसं अशीच जन्मभर जळत असतात. कवी निदान शब्द प्रभू तरी असतात, त्यांच्या जाळणार्‍या व्यथा वेदनांना कुठेतरी वाट तरी मिळत असते. पण सामान्य माणसं जिवंत पणीच जळण्याचे चटके सोसत सोसतच इहलोकीची क्लेशकारक यात्रा संपवतात,तसंच झालं असेल या बाईचं. तिच्या मनात आलं... आपल्या आईचं देखील असंच झालं ना ...

तिचं मन बरेच वर्ष मागे गेलं. लहानपणी जरा समजत्या वयाची असताना जिवंतपणी जळणं म्हणजे काय याचा अनुभव तिनं घेतला होता. तिची आई रात्र रात्र खोकून खोकून औषध पाण्याशिवाय तडफडत जगत होती. तिची अशी अवस्था का झाली? कोणी केली? हिला आज पर्यंत काहीच माहीत नव्हतं..तिला फक्त आई भोगत असलेल्या व्यथेची ओळख होती.ही बिचारी तिला कधी तरी लिमलेटची गोळीच आणून दे, कधी पाणी पाज,असेच उपाय करत तिचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करीत होती.पण चिमुकले हात तिचे... आईच्या भयंकर रोगाला सावरण्यासाठी कितीसे उप योगी पडणार? मग दुसर्‍यापाशी दयेची याचना! तिथेही या लहानग्या जिवाला अपुरेपण जाणवायला लागलं. तिचा काही उपायच चालेना,तिला कोणाची मदत घ्यावी ते कळेना ..शेवटी तिनं गाठलंन चर्च. फूटपाथवर राहाताना ती बघत होती,या बाजूला असलेल्या इमारतीतून काळे झगे घातलेल्या बायका बाहेर पडतात आणि आपल्या सारख्या लोकांना काही खायला प्यायला आणतात,दवापाणी करतात. अगदी आजारी असणार्‍या लोकांना मायेनं उचलून त्या इमारतीत नेतात.आणि काही काही लोक काही दिवसांनी या इमारतीतून बरे होऊन बाहेर येतात...तिच्या मनाला या विचारानं जरा धीर आला होता. आपल्या आईलाही असंच दवापाणी मिळेल का? आपल्या आईला या बर्‍या करू शकतील. या एकाच आशेवर ती त्या इमारतीत शिरली आणि तिच्या दैवाची दारेच जणू उघडली गेली. त्या नन्सनी तिचं म्हणणं आस्थापूर्वक ऐकलं. त्यांनी तिच्या आईला मोठ्या प्रेमानं चर्च मधे नेलं. न्हाऊ माखू घातलं.दवापाणी केलं. पण आई हाताला लागली नाही. नन्सच्या प्रयत्नांना दुर्दैवानं अपयश आलं. त्यांनी तिला अत्यंत ममत्वानं जवळ घेतलं. तिचे डोळे पुसले. आई देवाघरी गेली म्हणजे काय ? हे स्पष्टपणे कळण्याचं तिचं वय नव्हतं. फक्त तिला इतकीच अंधुकशी जाणीव झाली होती,आपली आई आता काही परत उठणार नाही बहुतेक.ती आता कधीच परत न उठण्यासाठी झोपी गेली आहे आणि आता देवबाप्पा तिला बरं करायला नेणार आहे. ..

नन्सच्या पुढचा प्रश्न आणखी गंभीर होता तो तिच्या आईच्या उत्तरक्रीयेचा. तो काळ रेशनचा होता. प्रेत जाळायलाही पुरेसे पेट्रोल,डीझेल मिळत नव्हते,मिळत होते ते पुरवठ्याला येत नव्हते. त्यांच्याकडील चितेसाठी लागणार्‍या डीझेलचा साठा संपला होता. कोणातरी मोठ्या माणसाच्या परवानगी शिवाय ते मिळणे शक्य नव्हते. त्यांनी सरळ या लहानगीला उचललं आणि त्या गेल्या कलेक्टर साहेबांकडे..कलेक्टर साहेब उमद्या मनाचा,दयाळू अंत:काणाचा होता. हे सार्‍या शहराला माहीत होते. अशा प्रकारे येणार्‍या प्रामाणिक अडचणींना ते आपणहून राजमार्ग सोडून आडवळणानं मदत करतात, हे ही नन्सनी अनेकदा अनुभवलेले होते... नन्सनी त्यांच्या समोर हात जोडले.या चिमुरडीला त्यांच्या समोर उभे केले आणि तिच्या आईची करुण कहाणी सांगण्यास सुरुवात केली... कलेक्टर खरोखरीच इतके सहृदयी होते की हे ऐकताना व चिमुरडी कडे बघताना त्यांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या. ते सर्व तजवीज करून हिच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहिले. हिचे आणि हिच्या आईचे भाग्य इतकेच की आईचा अंत्यविधी कलेक्टरांच्या हातून झाला. हे सारं बघून हिचा लहानगाजीव इतका भांबावलेला होता की तिनं कलेक्टरांचा हात गच्च पकडून ठेवला होता. त्यांनी तिला कडेवर उचलून घेतलं होतं. ते जायला लागल्यावर तिनं आक्रोशून इतका गोंधळ घातला इतका की शेवटी कलेक्टरांनी तिला उचलले आणि सरळ आपल्या गाडीत घालून आपल्या घरी नेले. तिथून पुढे गतजन्मीचे असतील पण ऋणानुबंध असे जुळले की ती त्यांच्या घरी मुलीसारखी राहू लागली. त्यांनी तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला. मग तर तिचं रीतसर दत्तक विधानंच झालं. एकाच प्रसंगाने तिचं मातृ छत्र हिरावून नेलं होतं आणि पितृछत्र बहाल केलं होतं. ...काय नियतीचा अजब खेळ म्हणायचा हा !

कलेक्टरांच्या घरी, त्यांच्या संस्कारात हिला वाढायला मिळावं हे हिच्या भाग्यात लिहिलं होतं. येणारी जाणारी माणसं या चूणचूणीत मुलीकडे बघून म्हणत,‘काय हुषार,समजदार,गुणी पोर आहे कलेक्टरांची!’ आणि तिला कौतूकानं विचारत,‘बाळ ! मोठेपणी कोण होणार तू?’ ही एका क्षणात सांगे,‘मी ना! आबांसारखी मोठी कलेक्टर होणार!’आणि योगायोगानं एक दिवसती कलेक्टर झाली. तिच्या आबांना कोण आनंद झाला होता. कोण कुठल्या रस्त्यावर पडलेल्या पोरीनं नशीब काढलं होतं. सार्‍या गावाला कलेक्टरांनी पेढे वाटले त्या दिवशी. ती आबांच्या अत्यंतिक आदराने पाया पडली. पाया पडताना म्हणाली,‘आबा!आशीर्वाद द्या. माझं शिक्षण,माझा जन्म गोरगरीबांच्या मदतीसाठी खर्ची पडो.’ आबांनी तिला आशीर्वाद दिला. त्यांनी आशीर्वादासाठी डोक्यावर हात ठेवताच तिला तिच्या आईची ढणढणारी चिता स्पष्ट नजरेसमोर येत होती. ती मनातल्या मनात प्रार्थना करीत होती, ‘देवा ! जे हात मला आशीर्वाद देण्यासाठी लाभले आहेत,त्या हातांचं बळ माझ्यात उतरू देत. त्यांच्याच सारखी जनतेची निरलस सेवा माझ्या हातूनही घडू देत.’

आबांचा आशीर्वाद घेऊन ती पहिल्या दिवशी जेव्हा आपल्या खुर्चीत बसली तेव्हा चर्च मधून काही नन्स तिचा छोटेखानी सत्कार करायला आल्या. त्यांच्या हातात चंदनाचा हार होता. त्यांच्यापैकी एका नर्सला तिनं ताबडतोब ओळखलं. तिनंच तिला उचलून कलेक्टरांकडे नेलं होतं.न्हाऊ माखू घातलं होतं. चार घास प्रेमानं भरवले होते...त्या समोर दिसताच ती तत्काळ आपल्या खुर्चीतून उठली. त्यांचे हात हातात घेत म्हणाली,

‘मला आशीर्वाद द्या. आज मला हा दिवस दिसतो आहे तो तुमच्यामुळे.. मी जन्मभर ऋणी राहीन तुमची.’तिला आपल्या डोळ्यातून वाहणार्‍या अश्रूंना आवर घालणं शक्य झालं नव्हतं. ते अश्रू आभाराचे होते, कृतज्ञतेचे होते. त्या वृद्ध नननं तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं म्हणाली,

‘पोरी ! गरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा असते,याचा कधीही विसर पडून देऊ नकोस. तो आकाशातला बाप फार मायाळू आहे. त्यानं आपल्याला गरीबांची सेवा करण्याकरता इथे पाठवलेलं आहे. ही गोष्ट तुझे आबा कधीही विसरले नाहीत. तू ही विसरू नकोस,विसरणार नाहीस अशी खात्री आहे आम्हाला.’

तिनं त्यांना आश्वासित केलं.म्हणाली,

‘काळजी करू नका.आबा आता थकले आहेत,पण मला कधीही बोलवा.हक्कानं बोलवा. मी येणार नाही,असं होणार नाही. हा शब्द आहे माझा’ त्या तिचे हे बोलणे ,ऐकून समाधान पावल्या. ती वृद्ध नन तिला म्हणाली,

‘ हो. ते तर तू करशीलच. खात्री आहे आमची. पण आणखी एका उत्तरक्रीयेची जबाबदारी तुला उचलावी लागेल. तुझ्या आबांचा काळ तुलनेनं बरा होता.आता तुझ्यासमोर अवघड काळ उभा ठाकलेला आहे. तुझे आबा गरीब,असहाय्य लोकांची उत्तरक्रीया करायला हातभार लावत होते. आता तुझा सामना असणार आहे,तो समाजात ल्या बेगुमानपणे वागणार्‍या,उन्मत्त, आडदांड नरकंटकांशी.त्याुंची उत्तरक्रीया करण्याची जबाबदारी तुला उचलायची आहे.हे आडदांड लोक गरीबांना त्यांच्या सर्व सामान्य हक्कांपासून वंचित ठेवत आहेत त्यांना अनेक प्रकारे नाडताहेत. त्यांचे जगणे असह्य करून सोडत आहेत. त्यांचा नायनाट करणे, म्हणजेच गरीबांना जगण्यासाठी मदत करणे,त्यांना चार घास सुखानं खाता येतील याची सोय करणे अशा अमानवी लोकांची जिवंतपणीच उत्तरक्रीया करण्याचे बळ ईश्वर तुला देवो, ही त्या दयाळू आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करते... ’

त्या ननचे चार शब्द तिच्यासाठी लाख मोलाचे ठरले. तेव्हा पासून ती एक अत्यंत निडर कलेक्टर म्हणून वाखाणली गेली. तिच्या अधिकार कक्षेत असणारे,गुन्हे करणारे,गरिबांना नाडणारे , भ्रष्टाचारी,दुराग्रही,चोर,लफंगे,पिळवणूक करणारे नेते तिच्या कारकीर्दीत गजाआड गेले. प्रसंगी जोखीम स्वीकारूनही तिने समाज नितळ करण्याचा जणू विडाच उचलला. परिणामी तिच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशात सर्वत्र आश्वासक वातावरण निर्माण झाले. तिच्या आबांना मनात वाटत राहिले,खरोखर माझ्या पोटच्या पोरीनं तरी मला इतकं समाधान दिलं असतं की नाही कायकी.. सर्वसामान्य लोक बिनधास्तपणे आपल्याला नाडणार्‍या लोकांना विचारू लागले,

‘ ए ! सरळ वागतोस? की कलेक्टरबाईंना तुझी उत्तरक्रीया करायला सांगू?’

हळुहळू तिच्या कारभाराची प्रशंसा होऊ लागली.सरकारनंही या स्वच्छ कारभाराची दखल घेतली.राष्ट्रपतींच्या हस्ते तिच्या समाज सेवेबद्दल तिचा सन्मान झाला.इतके मानसन्मान मिळत होते पण ती चर्च मधल्या नन्सचे बोलावणे आले की धावून जात होती.

तशीच धावत पळत एका बेवारस बाईची उत्तरक्रीया करायला ती चर्च मधे पोहोचली होती.अशी उत्तरक्रीया करताना तिला तिच्या आईची खूप आठवण येई. तिचे डोळे पाणावत ती मनातल्या मनात म्हणत असे,‘मला आज सारे सारे मिळाले आहे,फक्त तूझ्याशिवाय...पण प्रत्येक मातृरूपात मला तुझीच छबी दिसते, दिसू शकते,हे माझं भाग्य आहे..’

तिच्या मनात तिचा सारा जीवनाचा पट उलगडत होता... समोर कोणा बेवारशी बाईची चिता ढणढणत होती... ती तिची उउत्तरक्रीया अत्यंत ममत्वानं पार पाडत होती...


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>