ह्या अशा कथांनी नुक्कड समृद्ध होते....मयुरा क्या बात है!
शोध – मयुरा गाडगीळ खरे
टेबल नंबर 3 साफ केला 4 च्या ताटल्या उचलल्या न खरकटी घासायला एक रूम आहे माझ्या हाटेलित तिथं एक खिडकी केलीय तिथून खाली द्यायची तिथे टाकून यायचं.
घासून आलेली वेटर लोकांच शेल्फ आहे तिथं पुसून ठिवयाचं हे पण माझं काम.
मला खूप निराशा गिराशा काय नाय बरंका। 3000 रुपडे मोजतंय मालक येक वेळच चहा नाश्ता मिळतो .. न रात्री उरलेलं न्हेता येतंय...ब्येस हाय. मी टेबल साफ केला की कोरडा असतो. कष्टमर कदि बी पूना बोलुवनार नाय. शबुद आमचा बरका.
ताट घासणाऱ्या बाया फार चुकार. तेलगट ठुवनार भांडी. त्या काय मला दिसत न्हाईत. एक म्हातारी हाय कशावरून??? हात दिसतो कि. चार बांगड्या असत्यात. भेगाळले हात सुक्कड ती म्हातारी लै कामचोर हाय.
आता आताशा धान्यांत आलाय का तीन दिस भांडी मस्त चकचकीत असतात. बाकी दिवस नस्त्यात. चकचकीत सोच्छ भांडी पुसायला सोपी कष्टमर बी ते कागुद घयुंन पूना पूना घासत नाइ कंप्लेंट नाय. मग मॅनेजर बी वरडत नायी.
त्या चौकोनी खिडकीतून दिसत नाही बाया कोणकोन ते. न झुकू झुकू पायाला मी काय लुब्रा नायी. येकदा झालं काय कष्टम्बर कमी अलते मंग मी सगळे टेबुल औशुद्धी लावून लावून पुसली सगळी ताट पायली वशट लागली थी घून गेलो खिडकीशी न हात आला फूड येकदम कवळा. हातातच रायली ताट हिरव्या बांगड्या पितळीच्या बांगड्या न धागा नवीन व्हता इतकी सोच्छ भांडी व्हती.
मंग मन लिवायला लागलं ज्या ज्या वेळेस त्यो कवळा हात येणार तेवा तेवा भांडी गिनडी यकदम काचेवानी चुकचुक करनार. खुश व्हतो. मी आपली डुती सुरु व्हायली का आधी ग्लास देऊन बगायचो हात कोणतं. ते हात असलं का ताट देतांना सगळं निपटून द्यायचो मंग रोज रोजच तो हात दिसे. मागल्या दाराने गेलो की बाहेर मोरी होती. उघड्यावर आन हॉटेलीशी त्या खिडकिनी जोडलेली. मंग मला लै इच्छा होई जाऊन बघायचं मागे मी जाऊ का नको जाऊ करत रायलो एक दिस दुसराच हात दिसला आता भांडी वष्ट असत्यात. मी बी खरगट काढत नाय. टेबल नीट निगत नायी.
मंग ती नोकरी बी गेली दुसरं हॉटल शोधलं. काम मिळलं हेच. तो हात शोधत शोधत चार हॉटेली झाल्या. हे पाचवाय .. आता नाय शोधता येनार हात .. गावात ही पाचच हॉटेली आहेत..