आज खूप दिवसांनी "बाळा" तुमच्या भेटीला येत आहे...मे महिन्यात नुक्कड साहित्यला संमेलनात बाळाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
बाळा – संजन मोरे
चार वाजले. घंटा बडवली. आज शुक्रवार! सगळ्यांनी दफ्तरं आवरली. मास्तरांच्या टेबलावर दफ्तरांचा ढीग लागू लागला. उरलेली दफ्तरं खिडक्यांच्या गजांना अडकवली गेली. वर्ग भुंडा दिसू लागला. साहित्याच्या खोलीमधनं बादल्या, घमेली काढली. पोरं वड्याला पांगली. गवताळ पटांगण. मोळवाणाच्या गवतावर गुरं खूट्ट्या, मेखा ठोकून अडकवलेली. सुईसारखं टोकदार मोळाचं गवत पण चावून चावून गुरं त्याचं लोणी करत होती. चरून टम्म फुगल्यावर दोन वेळ पाणी पाजलं की झालं. गुरं दिवसभरात जोगवून निघतात. पोरांचं टोळकं शेण शोधत वड्याने फिरू लागलं. जर्सीचं शेण चालत नाही. गावरान गाय, खोंड, कालवड, म्हैस चालते. शेणाचा पोव दिसला की पोरं हरकून जातात. लगेच तो शेलका गोळा घमेल्यात टाकतात. बारीक मोठ्या आकाराचे गोळे, गोळा करून घमेल्यात टाकायचे. पातळ शेण चालत नाही. घट्ट, जमीनीला न चिकटणारे, अलगद उचलून घेता येणारे शेण चांगले. तासाभरात घमेलं शीगोशीग भरले. घमेलं काठावर ठेवून पोरांनी हातपाय स्वच्छ धूतले. हाताचा वास घेवून पाहिला. सर्व काही ठीक ठाक झाल्यावर पोरं शाळेकडे परतली.
सगळ्यात मिळून तीन घमेली शेण गोळा झालं होतं. आता पाणीवाली पोरं पुढं झाली. बादल्या घेवून ओढ्याला गेली. बादलीच्या दोन्ही कानांना धरून पाण्याच्या भरलेल्या बादल्या, दोघादोघांनी पळवत आणल्या. शेण पाणी आणून दिल्यावर पोरं मैदानात धूडगूस घालू लागली. आता पोरींची बारी होती. त्यांनी तोंड वाकडे करत शेणाचे गोळे उचलले, पाणी कालवून आपआपली जागा धरून त्या वर्ग सारवू लागल्या. सवय झाल्यावर मग सराईतपणे त्यांचे हात फिरू लागले. पाणी संपलं की त्या पोरांना हाक मारू लागल्या. रिकाम्या बादल्या भरून येवू लागल्या. बघता बघता सगळे वर्ग सारवून निघाले. मग लांबलचक वऱ्हांडे. सगळं लखलखीत झाल्यावर त्यांनी शेणाचा उरलेला चोथा फुलझाडांच्या बागेत ओतला. शेणपाणी झाडांच्या बुंध्याला ओतलं. मग हातपाय धूवून, चेहरे, नाकडोळे धूवून पोरीपण स्वच्छ झाल्या. मग त्यांचाही खेळ मैदानात सुरू झाला. लंगडी, जीभल्या असलं काय काय …
उम्या बहरात होता. कब्बडीचा डाव रंगला होता. बाळा अंग चोरून खेळत होता. उम्या मात्र खरचटण्याची पर्वा न करता फाटीच्या दिशेने मूसंडी मारत होता. गुडघे फुटत होते, खरचटत होतं, अंग सोलवटलं जात होतं. पण पोरांना त्याची तमा नव्हती. सारवण अजून ओलं होतं. ओल्यात पाय उमटतात. त्यामुळे दफ्तर आणायला जाता येत नाही, पोरी वैतागतात. म्हणून मग उशीरापर्यंत डाव रंगतात. मास्तर लोकांचा, बाईंचा घोळका पोरांच्यावर लक्ष ठेवून गप्पा छाटत बसलेला असतोच पोरं जास्तीच दंगा करू लागली त्यांचा करड्या आवाजातला दम येतो.
उद्या सकाळची शाळा आहे. सकाळी सगळं कसं चकचकीत दिसेल. आता पंधरा दिवस तरी काळजी नाही. दोन आठवड्यात वर्ग, वऱ्हांडे उखणून जातात. पोपडे निघतात, खड्डे पडतात. अभ्यासाच्या नादात पोरं नखाने भुई उकरत बसतात.
वर्गा वर्गाबाहेरच्या बागा चांगल्याच फोफावल्या आहेत. सदाफूली, गुलमूस, कर्दळ, झेंडू, मखमल शेवंती, आबोली, जाई जुई अणखी कसली कसली रंगीबेरंगी फुलं लागलेली आहेत.पोरांनी कुदळीने खोदून भोवतीने काटेरी फांद्या रोवलेल्या आहेत. फुलांना, झाडांना काटेरी जाळीबंद संरक्षण. फुलं झाडावरच चांगली दिसतात. बागेला शाळेचे बक्षीस असते म्हणून पोरं कुठून कुठून, कसली कसली रोपं आणून लावतात. गाढवा, शेरडांपासून बागेचे रक्षण करतात. पण सुट्टी दिवशी बागेला वाली नसतो. सोमवारी सकाळी बागेची नासधूस दिसू लागते. रोपांच्या माना खुडलेल्या असतात. शेंडे करंडलेले असतात. फुलं तूडवली गेलेली असतात. पोरांना वाईट वाटतं.पोरं पण फुलांसारखी हिरमुसतात. मग परत काटेरी फांद्या आणायच्या नविन रोपे आणायची. पुन्हा बाग बंदीस्त करायची. झारीने पाणी घालायचे. बुडाभोवती माती भरायची, आळी करायची. शाळेची बाग म्हणजे पोरांच्या, पोरींच्या मनातला एक हळवा कोपराच जणू, काय काय फुलत असतं, तिथंही ….
सारवलेलं वाळलं की नाही, आगोदर पोरींनी बघीतलं. पोरी दफ्तर घेवून आल्या. मग पोरांनी खेळ मोडले. वर्गात आले, दफ्तरं गोळा केली. वर्गाला कुलपं ठोकली. सगळी घराच्या ओढीने निघाली. मास्तरलोक मग साडेपाचच्या एसटी साठी घाई करू लागले. बाईंना, मास्तरांना घेतल्याशिवाय एसटी कधीच पुढे जात नाही. कोलाहल शांत झाला, मैदान सुनं झालं, वर्ग मुके झाले.
उद्या सकाळची शाळा …
उम्याच्या संगतीने बाळापण दफ्तर नाचवत घराकडे निघाला…..