अप्रतिम लिहिली आहे ही फिरस्ती...क्यामेऱ्याच्या लेन्स सारखे डोळे फिरले आहेत श्वेताचे...शाब्बास...!!
विक्रम
गाठोड - श्वेता निलेश जाधव
BARC मध्ये जाण्याच्या योग आला, कंपनी कामा निमित्तानेच. एक टेंडर चे ओपनिंग होते.. जायला थोडा उशीर झाला होता कारण दोन तासांचा प्रवास होता. आत गेटमध्ये शिरले, खूप गडबडीत ... बाहेर एन्ट्री करावी लागते ना म्हणून रिक्षेतून उतरले आणि स्वत:ची माहिती लिहून दिली. मग पुन्हा रिक्षेत बसले, थोड्यावेळाने लक्षात आले ज्या पेनने माहिती लिहून दिली होती ते पेन मी स्वत: सोबत चुकून घेऊन आले होते.....
पोहोचले त्या स्थळावर, तिथे आत शिरण्यासाठी खूप कडक बंदोबस्त आहे.. आधीच उशीर झाला होता त्यात तिथे गेल्यावर समजले इथे बऱ्याच गोष्टींचे स्कॅनिंग होते.. मग सगळी माहिती देऊन ... मोबाईल, पेन ड्राईव त्यांच्या ताब्यात देऊन मी स्थळावर पोहोचले!
बघते तर काय ... टेंडर कधीच ओपेन झाले होते आणि, शाळेत पेपर लिहून सुटल्यावर जसे शिक्षक पेपर गोळा करतात तशीच काहीसे ते पेपर गोळा करण्या मागे ते दोघे जण लागले होते. माझ्या पोटात पण गोळा आला... इतका उशीर कसा काय झाला मला की टेंडर ओपन करून सगळे निघून पण गेले ... मग नंतर समजले ते आमच्याशी संबधित नव्हते...
खूप शांत वाटत होत त्यादिवशी.. एकटीच होती मी, सकाळ पासून! निघाले चालत चालत...दुतर्फा लावलेली झाडे, सावलीची साथ करत होती, चालता चालता त्यांच्या मूळाशी बिलगलेल्या मातीचा वास अचानक भिडला!! हो भिडला असेच म्हणेन! .. तो आठवण करून देत होता. बऱ्याच आठवणींची!
मी विसरून गेले होते त्याला! ... अत्तराच्या सुगंधात, हॉटेल मधून बाहेर पडणाऱ्या जेवणाच्या सुगंधात .. कामासाठी बाहेर पडताना अंगभर पसरणाऱ्या त्या डीओ च्या घमघमातात. मातीचा ओला वास! जो फक्त पहिल्या पावसाच्या सरी बरसल्यावरच येतो असा कुठलातरी गैरसमज बाळगून होते.
तोच पुढे न जाते तर रिकामे बाकडे दिसले. बहुतेक ते येणाऱ्या जाणाऱ्याला विश्रांती घेण्यासाठी बनवले असावे. पण आजकाल सावलीच्या सानिध्यात विश्रांती घेण्यासाठी कुणाला सवड आहे? केविलवाणे बघत होते माझ्या कडे, मग मी सुद्धा काही क्षणासाठी त्याची सोबती होण्याच ठरवलंच.. बसले त्या बाकड्यावर ... एकटीच. येणारे जाणारे कदाचित बघत असतील, पण मी दुर्लक्ष केल. शांत पण निर्विकार मनाने पाहत होते आजूबाजूला .. तिथल्या गमती जमती न्याहाळत होते.. शांत वाटल खूप, पक्षांचा आवाज आणि मध्ये त्याला साथ देणारे गाड्यांचे सूर,... एक गम्मत राहून गेली!!
जेव्हा मी त्या ऑफिस मधून बाहेर पडले तेव्हा तिथे एक माकड दिसले मला ... हसू आले ... ए त्याला कस कोणी विचारल नाही, तू कुठून आलास?? तुझ्या कडे काय पुरावा आहे? तुझ आयडी प्रुफ काय?? इथल्या झाडांवर उडी मारण्या आधी तुला गेट वरून पास घ्यावा लागेल, तुला इथून जाताना तुझी शेपूट स्कॅन करावी लागेल ... वैगरे ?? वैगरे ?? अस असत तर ?? नाही आहे तेच बर आहे, नाही तर जे काही प्राणी पाहायला मिळत आहेत तेही मिळाले नसते! नसती भानगड कशाला?
तोच पुढे येताना एक माणूस गाडीत झोपलेला पहिला होता मी, त्याची आई कदाचित त्याला वाढत्या अंगाचा शर्ट घ्यायला विसरली असेल बहुतेक.. कारण पोटाचा कलिंगड झाला होता आणि तो कलिंगड शर्टामधून डोकावत होता... त्यात त्याने व्यायामाचा प्रकार म्हणून की काय किंवा सिट च्या लवचीकतेचा पूर्ण वापर करण्यासाठी, डोके अगदी मागे पर्यंत टेकवून झोपला होता ..त्यामुळे एका अर्धवर्तुळ तयार झाल होत..
मग जरा सेल्फी काढली. मनन करत बसले होते.. एकटीच. थोड्या वेळाने जाणीव झाली भुकेची, मग बाकडयाची सोबत सोडली आणि पोटाच्या सोयीकरता पुढे चालू लागले, अगदी गेटच्या अलीकडे एक छोटेसे उपहारगृह होते.. वडे पाव सोडले तर बाकीचे सगळे संपले होते ... आता भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशा म्हणी प्रमाणे ते थंडगार वडे खाण्याचा निर्णय झाला. एक माणूस त्या उपहार गृहात घरचा डब्बा आणून खात होता, सोबत त्याच्या जवळ एक मांजर भिरभिरत होती तिलाही देत होता.. एरव्ही दुध भात , मच्छी खाण्यासाठी प्रसिध्द असलेली हे मावशी .... चक्क भाजी चपाती खात होती.
मग वडापावची ओर्डर दिली.. त्याने स्वताहून मला चहा? अस विचारल. मी हो म्हटले..! त्याने विचारल म्हणून नाहीतर मी कुठे अशी एकटी चहा घेते! पण कॉलेजचे दिवस आठवले.. असाच थंडगार झालेला वडा आणि मग त्यावर एक कटिंग ... ! पण त्या दिवशी तो शेयर करायाल सोबत कोणीच नव्हत ! तेव्हा पैसे नसायचे वडापाव खायला!! पण मित्र मैत्रिणी सोबत असायचे आज पैसे आहेत, हवे ते खाण्यासाठी पण साले सोबत ते कोणी नाहीत!!
असाच प्रवास चालू होता, त्या उपहार गृहाचे आभार मानून, निघाले! जरा पुढे गेले आणि लक्षात आले हे BARC सुरक्षा रक्षकाचे पेन ... माझ्याजवळ राहिले आहे! मग पुन्हा मागे फिरले आणि द्यायला गेले, तर तिने विचारले कुठे जायचं ?? मी म्हंटल मी जाऊन आले. हे तुमच पेन राहिले होते.. तेव्हा तिथला सुरक्षा रक्षक हसायला लागला ... चांगली गोष्ट आहे असा म्हणाला .. मी हसले आणि पुढे निघाले !!
रेल्वेची वाट धरली! मानखुर्द रेल्वे स्टेशनला उभे होते पनवेल ट्रेनची वाट पाहत, तोच एक आंधळ जोडप दिसल! त्यांना कुठे तरी पहिल्यासारख वाटल.. हो म्हणजे ते जोडप ठाण्यातल होत बहुतेक मी बरेच वेळा पाहिलं होत, जरा तब्येत झाली होती, सुरुवातीला जरा बारीक होते दोघ पण आता जर छान दिसत होते. तिने आधी त्याला बसायला जागा केली .. मग ती स्वतः बसली!
आणि अचानक माझ्या मनात एक गोष्ट घर करून गेली, हे दोघे आंधळे आहेत पण डोळस आहेत. त्यांना माहित आहे त्यांच्या जोडीदाराला दिसत नाही, पण म्हणून त्यांचा संसार कुठेच ठेचकाळला नाही! तरी ८-१० वर्षे मी त्यांना पाहतेय आणि त्या आधी पासून ते एकत्र आहेत. एकमेकांना सोबती म्हणून.. मग आम्हा डोळस माणसांच्या आयुष्यात घटस्फोटासारखे अपघात सर्रास का घडतात? आम्हाला डोळे असूनही आम्ही दृष्टिहीन झालोत का?
मग आली की ट्रेन पनवेल .. पनवेल ला उतरले ...उतरल्यावर एका झोपडपट्टीतून चालत बस थांब्या पर्यंत पोहोचले.. त्या रस्त्याने जाताना एक बाई दिसली, तिचे केस कापले होते, एक गाउन घातला होता तिला आणि अशीच खितपत एका कोपऱ्यात बसली होती . क्षण भर वाईट वाटले! वय झाल्यावर माणूस किती हतबल होतो न? त्याला कस दुसऱ्यावर अवलंबून रहाव लागत, किती स्वतंत्र म्हणालात तरी उतारवयात अवलंबून रहावच लागत! माझ्या पर्स मधला एक बिस्कुटचा पुडा तिच्या हातावर टेकवला आणि पुढे निघाले. त्या पेक्षा मी तिच्यासाठी काहीच वेगळ करू शकत नव्हते . मनात बरेच प्रश्न घेऊन ...बस पकडली ... आणि पोहोचले घरी दिवसाच गाठोड बरोबर घेऊन.!!