खूप महत्वाची आहे ही फिरस्ती....हे असे पाहणे..आणि ते आपल्या मनात रुजणे...हेच तर फिरास्तीचे उद्दिष्ट आहे...
विक्रम
स्वयंपुर्ण? - स्वाती फडणीस
रस्त्यावर डांबरीकरणाचं काम चालू होतं. बाया, बाप्ये खडीने भरलेली घमेली इकडून तिकडे वाहून नेत होते. तिथे जवळच सावली बघून तान्ह्या बाळासाठी झोळ्या बांधलेल्या. झोळीत न राहण्याजोगी कच्ची बच्ची उन्हा-सावलीत जमेल तसा आपापला जीव रमवत होती. मध्येच त्यांच्यात कुरबुरी होत. शिव्यांपासून सुरुवात होऊन हातापायीवर भांडण गेलं की कामगारापैकी कोणीतरी पुढे होऊन हाताशी येईल त्याच्या पाठीत धपाटे घाले. त्याने पोरं आपली हाणामारी विसरून जात. मुले शांत झाली की थंडावलेला बाप्या पुन्हा एकदा घमेलं उचले. आणि पाट्या टाकू लागे.
झोळीतलं पोर किरकिरू लागलं की मात्र त्याच्या मायेलाच पुढं व्हावं लागे. घमेलं खाली ठेवून ती पोराला झोळीतून बाहेर काढून तिथेच फतकल मारे. आणि पोराला छातीशी घेऊन तंबाखूचा बार भरायला घेई. कसला आडोसा ना आडपडदा. अशा तिच्याकडे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या कोणाची नजर गेलीच तर पचकन तंबाखूची पिक टाकून त्याला त्याची जागा दाखवून देई. की बघणाऱ्याची नजर आपसूख पापण्या ओढून घेई.
तरी आज मात्र ती सारखी दिसत होती.
अवघ्या चाळीस दिवसाच्या मुलीला खांद्यावर घेऊन डायपर, झबली, दुपटी असलेली पिशवी सांभाळत कामावर रुजू झालेली ती. आधीही अगदी चाळीसच दिवसांपूर्वी देखिल ती जमेल तसं काम रेटतच होती. तेव्हा तिची तान्हुली तिच्या उदरात नाळेतून मिळणारा जीवनरस निवांतपणे घेत होती.
आज कार्यालयात तिमाही नियोजनाची मीटिंग. तान्हुलीची आई विभाग प्रमुख. मीटिंग नेहमीप्रमाणेच वेळेचा अंदाज चुकवत लांबत चाललेली. त्या तान्हुलीला थोडीच कळणार होती. अर्धा-पाऊण तास कसा बसा गेला असेल नसेल. तान्हुलीची चुळबुळ चालू झाली. तान्हुलीच्या आईतल्या विभाग प्रमुख कर्मचारिणीने मांडी डोलवत वेळ मारून नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तरी पुढच्या दहाव्या पंधराव्या मिनिटाला तान्हुलीचा संयम संपुष्टात आला.
नाजूक आवाजातला टॅहँ सभागृहात घुमला. आता मात्र विभाग प्रमुख बाईंच्यातली आई त्यांना स्वस्थ बसू देईना. गळ्याभोवतीचा स्ट्रोल पांघरून घेत तान्हुलीची आई सर्वांना देखत तान्हुलीला पाजू लागली.
सगळ्यांनी सभ्यपणे पापण्या ओढून घेतल्या. मी देखील त्यातलीच एक.
मनातल्या मनात चुक, बरोबरचा वाद रंगला.
तान्ह्या जीवाला आवश्यक निवांतपणा, त्याच्या आईला आवश्यक असलेले सुरक्षित, मोकळे वातावरण, स्त्री सुलभ लज्जा, पदाचा शिक्षणाचा अहंकार आणि त्याच बरोबर आईचं मन. अंगावरच पाजायचा अट्टहास? पण हे झाले माझे विचार.
तिच्या बाजूने पाहताना..
दोनच दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेली एका प्रथितयश व्यावस्थापिकेची मुलाखत आठवून गेली. तिने तर बाळंतपणानंतर अवघ्या पंधराव्या दिवशी बाळाला घरी सोडून, दोन दिवसांच्या निवासी सभेत हजेरी लावून व्यावसायिक निष्ठा प्रमाणित केलेली. मोठा हुद्दा असल्याने ब्रेस्टपंपची मागणी पुरवली गेली. इथे काहीच नाही. ना घरचा आधार ना कार्यालयीन सहकार्य.
यायला नकार देता आला नसता का? वेळीच उठूनही जाता आलं असतंच की.. सगळ्या आघाड्यांवर पूरं पडण्याचा अट्टहास कशासाठी..!
रस्त्यावरची ती, ती तरी हे आपखुषीने करत असेल काय?
या क्षणी तरी त्या सारख्याच भासतायत.
अगतिक..!!
स्वयंपूर्ण..?
एक आल्या परिस्थितीला तोड देत आणि दुसरी परिस्थिती अोढावून घेत.
स्वतःच्या मर्जीने..?