राजेश लोंढे - पुन्हा एक नव्या दमाचा लेखक...नुक्कड आणखी सशक्त करणार...फेसबुक ने किती लेखकांना लिहिती केले आहे...एक प्रश्न पडतो ..ही उर्जा कुठे होती...आणि समजा फेसबुक नसते तर ती कुठे लुप्त झाली असती? विचारवंतानी ह्याचा विचार करायला हवा...
निरागस – राजेश लोंढे
एस.टी. ने गावी चालला होता. एक फोन आला होता. तातडीने जाणे गरजेचे होते. लहानपणी शिक्षण गावीच झाले असल्याने शाळेत एका वेगळ्या जातीतल्या मुलीशी याची मैत्री झाली होती. पण रूढीबाज गावकऱ्यांनी वेगळाच अर्थ काढून याला गावातून हुसकावून लावले होते. अर्धवट शिक्षण सोडून हा शहरात मामाकडे आला. जिद्दीने पुढचे शिक्षण पूर्ण केले. गावचा संपर्क तुटला होता आणि अचानक तिचा फोन आला. कारण सांगितले नाही, फक्त तू ये म्हणाली. नंबर कुठे मिळाला हा प्रश्न देखील विचारू न देता तिने फोन कट केला.
रात्रभर याच्या मनात उलट सुलट विचार येत राहीले. गाव जवळ येताच, कोरडे पडलेले नदीचे पात्र, बाभळीची झाडे, दूरवर भकास पडीक जमीन, नजरेस पडू लागली. डोळ्यात अश्रू घेवूनच तो राजवाड्यात पोहचला. कुलूप उघडून पडक्या घरात पाऊल टाकले. घरभर जळमटं पसरली होती. बाहेर येऊन तासभर कोवळ्या उन्हात बसला. तेवढ्यात फोन आला, तिने संध्याकाळी गावाबाहेरच्या देवळात यायला सांगितले होते.
हा अगोदरच पायऱ्यांवर जाऊन बसला. ती आली, आत चल म्हणाली, देवासमोर हात जोडून झाल्यावर घंटा वाजवली. गावाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने...
तो : का एवढ्या तातडीने बोलावलस?
ती : तू गेल्यानंतर चार वर्षाने माझं लग्न झालं. पण समाज काही विसरु शकला नाही. माझ्या नवऱ्याच्या कानावर गोष्ट गेली, तो मला त्रास देतो.
तो : अगं, पण त्या निरागस वयात तसं काही नसतं.
ती : पण समाज, माझा नवरा? त्यांनी ठरवलंय की आज मी तरी जिवंत राहीन किंवा तू ...
पाठीमागून याच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव बसला. तशाही स्थितीत त्याने मागे वळून पाहिलं. तिचा सगळा समाज जमा झाला होता. डोळे मिटता मिटता लहानपणी शाळेत वर्गाबाहेर टांगलेल्या थोरामोठ्यांच्या तस्वीरी तरळू लागल्या...
त्याला एक प्रश्न पडला; हिने कधीतरी त्या तस्वीरी पाहील्या असतील का?