काय लिहावे? हे असे सकाळी वाचतो आणि मला खात्री पटते आजचा दिवस मस्त धुंदीत जाणार आहे. शाब्बास सुनीत
तू-सुनीत काकडे
सिटी बसच्या गर्दीत मी मिसळलो. बरं वाटतं आपण एकटे नाहीत हे बघुन. पण ही गर्दी माझ्यावरच ऊलटली तर...? जाऊदे, आज काय सुंदर दिसतीयेस तु....तुझ्या घराकडे जाणाऱ्या बसमधे चढलोय. आज मात्र तुझ्या घरापर्यंत तुला सोबत करणार. तुला त्रास नाही द्यायचाय, पण माझ्यापासुन दुर जाऊन तु कोणत्या घरट्यात विसावतेस हे जाणुन घ्यायचंय...कप्याला सोबत घ्यायला पाहीजे होतं. असो....आज मात्र माघार नाही. बस निघाल्या नंतर बसच्या दरवाजातुन कोणीतरी आवाज दिल्याचा भास झाला, परत पुन्हा तोच आवाज. मग मी शोधायला लागलो कोण आवाज देतंय....तुझ्याच बस मधे जाणारा किश्यातर नाहीना...? हरामखोर मला तुझ्यावरून धमक्या देत होता..चांगला फोडुन काढला होता स्टंपने क्रिकेटच्या ग्राऊंडवर. पन तो जर असला, तर आज त्याचा बदला घेईल. आधी बघु तर आवाज कोन देतंय....इतक्यात दरवाज्यात लटकलेला कप्या दिसला....डोळा मारून हसत होता. आता मी एकटा नाहीए ह्याच विचाराने मी विसावलो.
इतक्या वेळापासुन तुला चोरून बघनारा मी आता थेट तुला बघतोय. हवेनी अस्ताव्यस्त झालेले तुझे केस तुझ्या टोकदार नाकाला छेडताय, गळ्यातल्या लोकेटच्या हुकने मान थोडी लाल झालीए. गालावरच्या केसांना मागे करण्यासाठी ऊचललेल्या हातात, क्रोमचं एक नाजुक ब्रेसलेट आहे. ते ऊन्हात चमकतंय. तुझी नेलपेंट तुझ्या ड्रेसला मॅचिंग आहे. इतक्यात तू पुढच्या दरवाजाकडे चालायला लागलीस. मी पण वाट काढुन पुढे सरकलो. तू ऊतरलीस आणि मी पण. मागच्या दरवाज्याला लटकलेला कप्या पळतच माझ्याकडे आला. त्याला सनसणीत दोन शिव्या देऊन विचारलं
'कुठे कडमडला होतास? तुला रात्रीच सांगीतलं होतं ना? आणि तुझा बुट चावतोय मला, ब्लेडने कापुन अंगठा बाहेर काढु का..?'
तो रागाने बघायला लागला, त्याला माहीत होतं मी हे करू शकतो, अजुन त्याला त्याच्या वडीलांनी त्या बुटाने मारलं नव्हतं, इतका नवा होता तो बुट. त्याच्याकडे बघुन हसलो आणि चालायला लागलो.
तिच्यात आणि आमच्यात बेताचंच अंतर होतं. चालता चालता कप्याने सॅक ऊघडली, त्यातुन एक पुस्तक आणि ग्रिटींग काढलं. रस्त्यावरच एक वळण लागलं, कप्या अचानक दोन पावलं पुढे निघाला आणि त्याने आवाज दिला... 'वहीनी.....' आयला हा तर आत्मघात होता, मी थबकलो, पण तो तिच्याकडे पळत सुटला..... झाडाखाली थांबुन तो काहीतरी बोलत होता, इकडे चांगलंच धडधडायला लागलं होतं. मी आजुबाजुला बघत, येणाऱ्या संकटाचा विचार करत होतो. लटकलेल्या चेहऱ्याने कप्या परत आला. पहीले त्याला लाथ घातली, नंतर त्याला विचारलं काय बोललास...?
कप्या 'मी माझा' हे चारोळ्यांच पुस्तक आणि ग्रिटींग घेऊन माझ्यावतीने प्रपोजपण करून आला होता. तिने जमतील तश्या त्याला शिव्या घातल्या होत्या. कप्याला शिव्या दिल्या म्हणून माझीपण सटकली होती, त्याला म्हणालो
'साला, ही काय स्वतःला अनारकली समजते काय...?'
कप्या म्हनाला
'जाऊदे भावड्या, तु तरी कुठे सलीम आहेस?'
या जोकवर जोरदार हसत एकमेकांच्या गळ्यात हात टाकुन आम्ही परत निघालो. एका लव्ह स्टोरीवर एक दोस्त भारी पडला.....परत कधी रस्त्यावरच्या त्या वळणावर गेलोच तर 'मी माझा'ची ती चारोळी आठवते .........
आपण दोघं भेटायचो ते वडाचं झाड माझ्या सारखंच कमरेत वाकलंय तिथेच माझ्या मुलानं चहाचं दुकान टाकलंय.....