ही कथा म्हणजे एक आरसा आहे...आपला चेहरा दाखवणारा....सुचरिता (आणि तिचे फेसबुक नाव आहे रमा अतुल नाडगौडा) शाब्बास.
शुन्य जाणिवांच्या शहरी कथा
कथा १ :
कूस – सुचरिता
शहराला चेहरा नसतो म्हणे. तसा तर तो आजकाल गावांना सुद्धा राहिलेला नाही. रस्त्याच्या अल्याडपल्याड चार गरजेची, चार मौजेची दुकानं, गटारे, कुत्री, डुकरं, खुप सारे भकास चेहरे आणि नको ती सुधारणा पोचलेली त्रिशंकु प्रजा. शहरात फक्त उजेड जास्त असतो. जो तिथला अंधार खुबीने झाकतो इतकंच. शहरात एक बांधीव रूटीन. जगण्याचं. मौजमजेच सुद्धा. म्हणजे पार्टी, पिक्चर, मॉल, वन डे ट्रिप, लॉन्ग ड्राईव्ह, स्मॉल सेक्स, आर्टिफार्टी पब्लिकसाठी काव्यमैफिल, चित्रप्रदर्शन, प्रायोगिक नाटकं वगैरे. मग पुन्हा मंडे टू फ्रायडे.
रोज उठल्यावर त्याला आठवावं लागतं. आज कोण वार? च्यायला हे अगदीच हिंदी फिल्म स्टाईल झालं! मैं कौन हूँ, कहाँ हूँ?!! उठा, ब्रश करा, आंघोळ कधी केली कधी कल्टी. नाक्यावर तेच ते पोहे आणि उकाळा चहा. आई म्हणते तसं लग्न केलं तर हेच घरी आणि जरा बरं मिळेल. पण तेव्हढयासाठी लग्न? बघु म्हणे. ऑफिसची बस. की मग एकदम पालट. चकाचक बिल्डिंग, एसी, इस्त्री केलेले कलीग्ज. यांच्याबरोबर कंपल्सरी गोड हसुन बोलावे लागते. रोज संक्रांत असल्यासारखे. पगार मिळतो म्हणुन निव्वळ नाय तर एकाचं पण तोंड जन्मात बघुसं वाटत नाय. सगळे साले एकजात चोर. एकच अजेंडा. दुसऱ्यावर कुरघोडी करा आणि त्याने केलेल्या कामाचे क्रेडिट ढापा. असेसमेंटमधे पगार वाढवुन घ्या.
आता त्या नायरचा कॉल येईल. कालच्या कामाचे काय झालं? क्लाएंटकडे जाऊन आलात का? यस सर. यस सर. जातो सर. करतो सर. त्याला स्वतःच्या गळ्यात नंदीबैलाची घण्टी वाजल्याचा भास झाला. नायरची पीए आली. कधी काळी बरी असावी बाई. लग्न होऊन दोन वर्षात कम्प्लीट चुरगळलेली पालेभाजी झालीये. नायरचा चाललाय ट्राय तिला रिप्लेस करायचा. पण अजुन जमलं नसावं. क्लाएंटकडे निघावं. या भैयाच्या गाडीवर मागे बसुन जाणं म्हणजे अंदमानच. सरसो!!
क्लाएंटच ऑफिस मिडसिटीमधे गल्लीबोळात. हेल्मेटच्या आत थोडी धूळ, आवाज कमी. पानाने रंगलेल्या पायऱ्या चढुन तो क्लाएंटच्या गचगचलेल्या केबिनमधे बसला. कागद इकडुन तिकडे दिले घेतले. मधेच भैयाला फोन आला. तो पुढे निघाला. क्लाएंटच्या मागण्यांचा डोंगर डाव्या खांद्यावर पेलत हा पण निघाला.
खाली आला. भैया कुठे दिसेना. थोडं पुढे जाऊन हा कचऱ्याच्या ढिगापाशी आला. नजर गाडी शोधतेय. कोपऱ्यात हालचाल जाणवली. कळकट, लालसर फडक्याची चुंबळी. त्यात वळवळ. याला धक्का बसायला हवा होता. पण हा निर्विकार बघत राहिला. मुळात जे दिसतंय ते काय आहे हे आत झिरपतच न्हवतं. खरचं? होऊ पुढे? मग? नंतर? पोलीस? भानगडी? मी याचं पुढे काय करणारं? फडक्यावर मुंग्या रांगताहेत का? झटकु? हात पुढे झाला. नको. मागे आला. त्याने इकडेतिकडे पाहिलं. गर्दी निर्विकार वाहत होती. इतक्यात भैया गाडीवरून आला. चल बे. बे चालला..गेला. गाडीवर बसला. मान वळली. पण तोवर गाडी पुढे सरकली. आज मारावी लागणार बहुतेक रात्री. त्या शिवाय ती फडक्यावरची मुंगी कुरतडायची थांबणार नाही. लग्न करावं लवकर. लपायला एक कुस पण मिळते.