गद्यात कविता आहे ही - चुकवू नका....
विक्र्रम
स्वगत – अस्मिता चितळे
भाग ६
भेटलो..एका क्षणात आठवून गेली ती आपली आधीची वादळभेट. मी वादळात वाहून गेलेली नी तू तसाच घट्ट मुळांशी रूजून राहिलेला. तरीही..तरीही आपण खोल एकमेकांमध्ये बुडी मारलीच की. तळ शोधलाच की. तसं घडावं म्हणून आपण प्रयत्न केले नाहीत आणि घडू नयेत म्हणूनही केले नाहीत, ते एक छान झालं.
आजही परत भेटलो तेव्हा तुला नीटच पाहिलं पुन्हा.. तू तसाच. कपाळावरचे बेफिकीर केसही तसेच. हातांची घडी घालून समोरच्याचा अंदाज घ्यायची लकबही तीच आणि तीच ती बेफिकीर जिंदादिली.. मला हे हवं आहे आणि तेच हवं आहे असा अधे मधे उमटणारा हट्टी भाव.
तशी हट्टी मीही आहेच की. तुझ्यापेक्षा जास्त. तुला हे जाणवून देण्याची वेळ आणणार बहुदा तू....
संवाद झाला की आपण फक्त बोललो रे? बहुदा फक्त बोललो. खरं तर त्याही पलीकडे मला बरंच काही सांगायचं होतं, पण अर्थात मी का बोलायचं? तसं फार बोलून न बोलण्याची कला मी अवगत केलीयच की.. आणि तू तरी मनातलं बोलतोस की नाही ही जरा शंकाच. तरी आपण सोबत आहोत.
एकमेकांना नेमकं हवय तरी काय रे? कसला शोध घेतोय आपण?
ते कळलय कुठं आपल्याला अजून? जाऊन देत की.. हे असले कसले कसले विचार आपण करतो नं, म्हणूनच बहुदा आपण सोबत आहोत.
सारख्यासवारखे आपण दोघे मित्र मित्र.. केव्हा तरी तेव्हाच तुझ्यापेक्षा माझं लक्ष मागे असणाऱ्या इमारतींच्या गच्चीवरून काळा झेंडा दाखवणाऱ्या पोराकडेच जास्त लागलं.. त्याच्या त्या झेंड्यांच्या तालावर नाचणाऱ्या शुभ्र स्वच्छ कबुतरांच्या गिरक्यांकडेही...
अन तेव्हाच तुलाही ते समजलं आणि मग स्वच्छ हसलास फक्त आणि हातांवर हात ठेवून म्हणालास चल उडून जाऊ..
मग मीही स्वच्छच हसले..
भेट सरली पण ती वेळ मनातून सरली नाही. छळत राहिली. आधीच्या तुझ्या बाकीच्या आठवणीं सारखीच अध्येमध्ये पिंगा घालत राहिली. आयुष्याचा रोजचा प्रवाह फक्त आठवणींशी अडला नाही, पण केव्हा आठवणींशी अडखळला नक्कीच की.
समजतय आणि उमजतय केव्हा केव्हा आठवणींचा काच होतो आहे आणि आता तो काच आणि त्या काचण्याचा जाच असह्य होतो आहे. (सवयीनं की सवयीचा परिणाम?)
मी का असं वागतेय? मी जाच करून घेतेय..
तुझ्यामुळे मला त्रास होतोय. पण तू?
तू छान आहेस आणि माझ्यातून अलग होऊन पण मला सोबत घेऊन कधीच जगायला लागला आहेस. त्याच धुंदीत मस्त आयुष्य जगतो आहे आणि नसते प्रश्न मला नकोयत गं म्हणून आयुष्यात म्हणून छान वास्तवात जगतोयस. (खरं सांगू? मला त्याचाच राग येतोय)
माझं मी पण तुझ्याजवळ सोडून वागते आहे, त्याचा राग येतोय खरं तर.
मला नकोयस तू. (मनातून उत्तर हवाय तुला तो)
हवायस?
हवास तू.. (पुन्हा गाणंच, कुणाचं बरं?)
खरं तर आत्ता पुन्हा भेटावसं वाटतं आहे (मगाशी वागलो नं जरा खडूस सारखं तसं न करता मोकळेपणी)
न राहवून घेतलाच फोन हातात (पण मी एसएमएस करणार नाही)
मी नाही करणार एसएमएस
अर्थात हा एसएमएस तुलाच
रिप्लाय
‘ते मला माहितीय’
असं कसं याला सगळंच माहिती.. का आणि ते?
उत्तर नाही आणि आता प्रश्नांचे खेळही नकोत
मी डोळेच मिटून घेते नं..