प्रतिसाद जरूर द्यायचा....मी वाट पाहीन...
लुप्त - विक्रम भागवत
प्रकरण - १ ले (भाग ३)
अजूनही त्याचा श्वास चालू आहे! मला हे काही समजतच नाही! एव्हाना त्याचा मृत्यू व्हायला हवा होता. किंवा मग मीच खूप अधीर झाले आहे. त्याचा चेहरा मी निरखून पहाते. पहिल्यांदाच मला त्याचा चेहरा निर्विकार वाटतो. पांढऱ्या स्वच्छ क्यानव्हास सारखा. जणू तो वाट पाहतो आहे … कदाचित मी ब्रश उचलेन आणि रंगाचा एक फटकारा त्याच्या चेहऱ्यावर ओढेन.
"चहा करून पिऊया" तो म्हणाला.
"का?" माझा तुटक प्रश्न.
"तू एकात दोन आहेस का?" तो विचारतो
"समजेल अस बोल" मी अजूनही चिडलेली
"तू रंगवताना वेगळी असतेस … ब्रश हातात नसताना वेगळी असतेस"- तो हसत बाथरूम मध्ये शिरला.
मी दोन आहे? मग हा किती आहे? मरत पण नाही लवकर. उशी ठेवावी का त्याच्या नाकावर? दाबून ठेवली तर मरेल वीस सेकंदात. मी उठते आणि किचन मध्ये येते. चहा करायला घेते. तीन एक कप पाणी उकळायला ठेवते. ओठांवर गाणे गुणगुणत …
हजारो ख्वाईशे ऐसी हर इक ख्वाईश पे दम निकले
विठूला चहा करायला आवडायचा. त्यावेळी मी आणि तो बाप आणि मुलगी नसायचोच. कोणीतरी वेगळेच.
"तुला सांगतो मी साम … आयुष्य जगायला शिक … फक्त मुल पैदा करणारी मादी होऊ नकोस." दार्जीलिंग चहाचा दिड चमचा उकळी येऊ घातलेल्या पाण्यात टाकत तो बोलला.
"विठू हे काय फक्त माझ्या हातात आहे? तू मला कुठल्या देशात जन्माला घातले आहेस आणि माझी ममा कोण आहे सगळ तुला माहिती आहे" मी विठूला बिलगत म्हणाले.
तो गुणगुणत राहिला
“दुखी मन मेरे … सून मेरा केहना जहा नाही चैना ….वहा नाही रेहना
“पळून जा ग साम … just run away" - त्याने चहाचे भांडे पाण्याला उकळी न येऊ देता खाली उतरले
"पळून जाऊ …घर सोडू? तू? माझा बाप मला सांगतो आहेस?" मी त्याला घट्ट बिलगले.
"साम … फक युर बाप … गो गो गो गो " त्याने चहाचा वास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर मला समाधी लागल्या सारखा आनंद दिसला.
"विठू तू रडणार नाहीस?" मी त्याची हनुवटी पकडून त्याचा चेहरा माझ्याकडे वळवला.
त्याचे डोळे महासागरा सारखे शांत… नितळ दिसत होते. त्याने हलकेच माझा हात दूर केला.
"ह्या प्रश्नाचे उत्तर देऊन मी तुला आनंद देणार नाही … पण स्वतःच्या इच्छा पुऱ्या न करणे ह्यासारख पाप नाही साम… देव पुन्हा मनुष्य जन्माला घालतो … आणि तू पुन्हा माझी मुलगी म्हणून जन्माला यायला नको आहेस मला" - विठू खदाखदा हसला.
मला रडूच आले. मी त्याचा हात हातात घेतला आणि तो कुरवाळत रडू लागले.
"आता काय झाल? इतका मस्त चहा झाला आहे…वास घे … आयुष्य जगल्याचा आनंद घे" तो माझ्याकडे पाहत बोलला.
"सगळ्या इच्छा मारत जगलास न विठू?" मी त्याला प्रश्न केला
"तुला काय ठाऊक?" त्याने विचारले
"नाहीतर देव तुला पुन्हा जन्माला का घालेल?" माझे हुंदके मी आवरूच शकत नव्हते.
तो गुणगुणू लागला
हजारो ख्वाईशे ऐसी हर इक ख्वाईश पे दम निकले
पाणी उकळायच्या आत मी दार्जीलिंग चहाची पत्ति पाण्यात टाकली … आणि भांडे खाली उतरवले. रंग तरी हवा तसा आला होता. चहाची किटली आणि माझा मग घेऊन मी पुन्हा खोलीत आले. त्याचा श्वास अजूनही चालू होता! मी मग मध्ये चहा ओतला … काही वेळ मग नाका समोर धरला …. आणि त्या वासावर माझे लक्ष केंद्रित केले. कदाचित अजून अर्धा तास…! मी माझ्या आराम खुर्चीत टेकले. चहाचा घोट घेतला आणि डोक मागे टेकले.
दरवाज्या वरची बेल वाजली तशी मी भानावर आले. आत्ता ह्या वेळेला कोण आले असा विचार करीत दरवाजा उघडला तर समोर तो उभा होता - विश्राम!
"अरे आलास होय तू … मला वाटल तू येणारच नाहीस" माझ्या चेहऱ्या वरचे आश्चर्य मी लपवू शकले नाही. तो मात्र अवघडल्या सारखा दरवाजातच उभा होता. छातीचा भाता लोहाराच्या भात्यासारखा खालीवर होत होता.
"आत ये" मी त्याला आत यायचे आमंत्रण दिले आणि तो आत आल्यावर दरवाजा लोटून घेतला. त्याने पटकन मागे वळून पहिले.
"बैस" मी त्याला कोच दाखवले. त्याने विचारपूर्वक एक कोच निवडला. त्या दिवसापासून तो कोच त्याचा झाला. त्यानंतर तो दुसऱ्या कुठल्याही कोचावर कधी बसला नाही.
"पाणी ….?" मी संभाषण सुरु करायचे म्हणून विचारले.
"पाणी" - त्याचा उद्गार.
मी आत गेले आणि पाण्याचा जग आणि एक ग्लास आणून त्याच्या समोर ठेवला. त्याने सावकाश अर्धा ग्लास पाणी ओतून घेतले आणि मग ग्लासचा काठ हलकेच बोटांनी पुसून ग्लास ओठांना लावला.
"मग काय ठरवलं आहेस तू?" मी त्याला विचारले.
"ठरवलं?" तो स्वतःचीच पुटपुटल्या सारखा. त्याची बोट सारखी चुळबुळ करीत होती.
"म्हणजे तू मॉडेलिंग करणार का? - मी त्याला विचारले.
तो काही न बोलता गप्प बसला.
"तुझी प्रकृती कशी आहे?" मी त्याला विचारले.
"ठीक" त्याचे उत्तर. तो भिंतीवरच्या फ्रेम्स निरखीत होता.
"काय पहातो आहेस?" मी त्याच्या नजरेचा वेध घेत विचारले.
"नाही" त्याचे उत्तर.
"दम्याचा त्रास?" मी त्याला पुन्हा विचारले.
"लहानपणा पासून"
त्याची नजर आता एकाच चित्रावर खिळली होती. उग्र चित्र होते ते. केंव्हा तरी मनाच्या भरकटलेल्या अवस्थेत काढलेले. ते चित्र माझे विशेष आवडते नव्हते आणि तरीही ते भिंतीवर होते.
"तुला आवडले ते चित्र?" मी त्याला विचारले.
"तुम्ही किती पैसे द्याल?" त्याने एकदम विचारले.
"तुला प्रत्येक सिटींगचे हवे आहेत की महिन्याचे?" मी व्यवहारावर आले.
"मला पैसे हवेत" त्याने पहिल्यांदा माझ्याकडे पाहिले.
"ठीक आहे … तू तुला हवे तेंव्हा माझ्याकडून उचल कर." मी
"उचल " त्याचा प्रतिध्वनी घुमला.
"अरे म्हणजे मागून घे … मी नाही म्हणणार नाही. पण तू कंटाळा करायचा नाही. " मी त्याला म्हणाले.
"कंटाळा" - तो
"अरे एकाच जागी…. एकाच अवस्थेत तास तास बसून, नाहीतर उभ राहून किंवा झोपून रहाव लागत."
मी त्याला समजावून सांगू लागले.
"ठीक" त्याचे उत्तर.
"ये आत"
मी उठले आणि माझ्या स्टुडीओच्या दिशेने चालू पडले. त्याच्या पायातल्या स्लीपर्सचा चपकचपक आवाज सांगत होता की तो माझ्या पाठोपाठ येत होता. मधल्या जिन्याने उतरून मी बेसमेंट मध्ये आले, जिथे माझा स्टुडीओ होता. तो दबकतच तिथे आला. त्याची नजर शोधक अंदाज घेत होती.
"तिकडे बाथरूम आहे" मी बोटाने त्याला बाथरूमचा दरवाजा त्याला दाखवला.
'बाथरूम" सवयीने तो पुटपुटला.
"मला तुला पहायचे आहे" तो आरशात स्वतःला न्याहाळत होता तेंव्हा मी त्याला म्हणाले. त्याने माझ्या कडे वळून पहिले.
"तसे नाही … कपडे काढ" मी त्याला शांत पणे सांगितले.
"कपडे" तो पुटपुटला.
"त्या बाथरूम मध्ये" मी त्याला पुन्हा बाथरूमचा दरवाजा दाखवला.