अनावर स्वप्न पहावीत आणि एका क्षणात जमिनीवर धाडकन कोसळावे....
विक्रम
अनावर – विनया पिंपळे
त्याने खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा मस्त पाऊस पडत होता. दूर हिरवाईने माखलेला डोंगर , कोसळणारा धबधबा, नागमोडी रस्ते, पावसात चकाकत धावणार्या. गाड्या ....डोळ्यांना सुखावणारं आणखीही बरंच काही दिसत राहिलं ...
त्याने अलगद डोळे मिटले... पायात चपला अडकवून त्याने थोड्या वेळापूर्वी खिडकीतून पाहिलेल्या रस्त्यावर पाऊल ठेवले. लांबच लांब पसरलेला रस्त्याचा पट्टा पायाखालून सरकत होता. डोंगराच्या दिशेने आधी हळूहळू मग भरभर चालता चालता तो चक्क धावू लागला...अगदी उर फुटेस्तोवर...
त्याला तिथे पोहोचायचं होतं. त्या हिरवाईत गुंग व्हायचं होतं. पानांवरून खाली उतरायला अधीर झालेला पाचू त्याला त्याच्या हातावर अलगद झेलायचा होता...त्या धबधब्याचे तुषार सर्वांगावर अनुभवायचे होते ...आणखीही सटरफटर बरंच काही करायचं होतं....
पण अचानक धावता धावता काय झाले कळले नाही. तो रपकन आपटला...सगळीकडे खरचटलं...एका तीव्र वेदनेची जाणीव पायातून अंगभर पसरली तेव्हा खाडकन् त्याचे डोळे उघडले ....
तो व्हीलचेअरवर बसलेला होता ....