संवादाच्या माध्यमातून पुढे जाणारी ही कथा आहे...ते वाचत असताना एखाद्या निबिड अरण्यात शिरतो आहोत असेच वाटते...शेवटचा प्रकाश दिसे पर्यंत
विक्रम
दिशा - भी. शि. स्वामी
'येवढ मोठं गुलाबाच्या फुलाचं झाड आणि त्यावर एकच फूल म्हणजे विचित्रच.'---तो. 'होय.'---ती. 'मी आजच इथं आलो. तू रोज येतेस?'---तो. 'तसं काही नाही.'---ती. 'तुझं नाव?'---तो. 'दिशा'---ती. 'दिशा? हे काय नाव झालं? तुला दुसरं चांगलसं नाव असायला हवं'---तो. 'आपली नावं आपल्या मर्जीनुसार असत नाहीत.'---ती. आपली मनं तरी आपल्या हितात असतात.'---तो. 'आपणच आपल्या मनाच्या आधीन असतो.'---ती. त्याला यातून काही दाद लागत नाही. तेव्हा तो विषय बदलू पाहतो. 'त्या एकुलत्या एक फुलाची एक पाकळी गळिली. तू पाहिलीस?'---तो. 'पाकळी तर गळालीच.'---ती. 'तिनं का गळावं?'---तो. 'ते तिच्या हातात नाही.'---ती आणि पुन्हा त्याला वाटलं, यातूनही काही दाद लागत नाही.तेव्हा तो पुन्हा विषय बदलू पाहतो. 'मी आता निघावं म्हणतो.'---तो. 'हरकत नाही.'---ती. 'तू?'---तो. 'ते माझ्या हातात नाही.'---ती. पुन्हा एकदा त्याला वाटलं, यातून काही दाद लागत नाही. ही ठार वेडी आसावी. व्हा निघावच. त्याच्या पायांनी त्याला तेथून दूर नेलं. मनात ती होतीच. तो स्वतःशी म्हणाला, ही कोण असावी? या गावात पूर्वी तिला पाहिल्याचं आठवत नाही. दुसरे दिवशी पुन्हा तो तिथं आला. ती तेथे होतीच. 'काय बघतेस?'---तो 'काल गळालेली पाकळी.बुंध्याशी तिचं खत होतय.'---ती. 'होय. ते तसंच होणार. दुसरं काही होणार नाही.'---तो. 'तिला खत व्हावं वाटलं असेल?'---ती. 'ते तिच्या मर्जीवर नाही.'---तो एकदम बोलून गेला. त्याला वाटले, हे शब्द आपले नव्हेत. ते कालचेच तिने उच्चारलेले शिळे शब्द आहेत, आणि लगच त्याला वाटले , हे शब्द कायमचेच शिळे आहेत. काल तिने उच्चारले तेव्हाही ते ताजे नव्हते. तेव्हा तो तिला म्हणाला, 'मी तुला कालच्या तुझ्याच शब्दात उत्तर दिले'. 'नाही.'---ती. 'मग?'--- तो. 'काल शब्दच नव्हते. आणि तू उत्तर दिलंच नाहीस.'---ती. तो किंचित लटपटलाच. ही वेडीच आसायला हवी. काल शब्दच नव्हते म्हणजे काय? काल बोलताना ही शुध्दीवर नव्हती काय? आज तरी ही शुध्दीवर आहे काय? तरीही तो म्हणालाच, 'उत्तर देणं आपल्या मर्जीवर नसतंच मुळी.' यावर तिने खत झालेल्या पाकळीवरचे डोळे उचलले आणि फुलात रोवले. त्याला वाटलं आता ही काहीच बोलणार नाही. आणि अचानक त्या फुलाची दुसरी पाकळी गळली. ‘पुन्हा एक पाकळी गळली.'---तो. 'आणखी पुष्कळ पाकळ्या आहेत फुलाला.'---ती. 'एकेक करुन सगळ्या गळणार.'---तो. 'ते तरी कुणाच्या मर्जीवर आहे?'---ती. त्याला वाटले, ही वेडी नाहीच. ही जागाच तशी आहे. हे सगळं भयानक आहे. आता तेथे जाणं न जाणं आपल्या हातात नाही. आज जाऊ तेव्हा पाकळीविषयी बोलायचेच नाही. दुसरंच काही बोलायचं. त्याने जाणून बुजून सुरुवात केली. 'तू खूप सुंदर आहेस.'---तो. 'म्हणजे काय?'---ती. मला तुझं नाक खूप आवडलं.'---तो. 'नाक?'---ती. 'केस सुध्दा.'---तो. मग त्याला वाटलं की ती आपली नजर फुलामध्ये घुसवीत आहे. लाकडाला छिद्र पाडण्यासाठी फिरते गिरमीट घुसवतात,तशी. ती नजर अशीच घुसवत राहील. फुलाला छिद्र पडेल. पलिकडच्या हवेतूनही ते नजरेचे गिरमीट वळसे घेत क्षितिजावर जाईल. तेव्हा ती बोलली,'आवडण किंवा न आवडण तुझ्या मर्जीवर नाही.' ‘मला शिळे शब्द ऐकवू नकोस. तू सुंदर आहेस.'--- तो. तू सुध्दा शिळे शब्द बोलू नकोस.'---ती. ‘तुझे सौंदर्य शिळे नाही. तू सुंदरच आहेस.'---तो. ‘मी माझ्याविषयी म्हणत नाही. शब्दाविषयी म्हणतेय..'---ती. 'मग काय म्हणू? कोणते शब्द वापरू? शिळे शब्द वापरावेसे मलाही वाटत नाहीत. पण ते माझ्या हातात नाही.'---तो आणि त्याला वाटले दाद आजही लागणार नाही. आजची पाकळी गळली. तिचे खत होणे सुरू झाले. आता आपल्याला गेले पाहिजे. पण आज एकटं जायचं नाही. तिला इथं एकटं सोडायचं नाही. 'चल. मी निघतोय.'---तो. 'जा.'---ती. 'तू एकटीच इथं का थांबणार?'---तो. ‘तुला थांबता येत नाही म्हणून.'---ती. 'मला का थांबता येत नाही?'---तो ‘ते कोणाच्या मर्जीवर असत नाही.'---ती. तो तिथून दूर झाला आणि तिला एकटी सोडून आल्याबद्दल नित्त्याप्रमाणे स्वतःला दोष द्यायला लागला आणि त्याला एकदम वाटलं तिला लग्नाच विचारावं. हे फार छान सुचलं. हे आधी सुचलंच नाही. कारण ते तरी कोणाच्या हातात असतं? दुसरे दिवशी तो घाईघाईने तेथे गेला.
झाडावर फूल नव्हतं. फुलाची शेवटची पाकळी मात्र गळून बुंध्याशी पडली होती . खत होण्यासाठी. त्याचे डोळे भिरभिरले. त्याला दिशा दिसलीच नाही.