एक तशी पाहता छोटी घटना एका छोट्या विश्वासाठी खूप मोठ्ठी असते...त्याचे स्वरूप पालटून टाकू शकते...
विक्रम
चिमुरडं जग…. इरा पाटकर
पाच वर्षाचा आमीर आज मोठ्ठ्या शाळेत गेलाय… आमूला सगळं नवीन मिळालंय… शाळेचा गणवेश, बुट, डबा, दप्तर, वह्या आणि नवे जुने मित्र…सगळं नवं…नवीन टिचर सुद्धा …आमूचं छोटं जग पूर्ण भरून गेलेलं…
बाबाच्या आयुष्यात फारसा बदल होत नाही कधी; तसा तो आजही झाला नाही… घर ऑफिस, पेपर, आणि मोबाईल भोवती फिरणारं त्याचं जग आजही घरातल्या बदलापासून पार दूर …
आमू शाळेत म्हणून आईची सकाळपासून गडबड… आमूच्या आवडीचा डबा, आमूची आंघोळ, आमूचे कपडे, एवढंच नाही तर आमूचा वर्ग आणि आमूची टीचर कशी असेल, आमु शाळेत कसा राहील, डबा निट खाईल ना अश्या एक ना हजार चिंतांमध्ये बुडालेलं आईचं जग …
अडीज वर्षाचा अर्जुन मात्र गप्प गप्प… सकाळी लवकर उठून दादाला शाळेसाठी मदत करतोय… दादापासून पहिल्यांदाच एवढे तास दूर राहणार आता तो… दादा त्याचा मित्र आहे आणि गुरुही… दिसत नसलं तरी अर्जुनचं जग मात्र कोमेजलेलं….
घड्याळाच्या काट्यावरचं जग नेहमीप्रमाणेच धावणारं… पण अर्जुनचं "चिमुरडं जग" मात्र दादाच्या शाळेबाहेर थांबलेलं ….