हे असे अलवार प्रेम...शाळेत सुद्द्धा होऊ शकते...बघायचा दृष्टीकोन खुला हवा...
विक्रम
बांगडया – सुचिता घोरपडे
गावच्या लक्ष्मीच्या जत्रतंयंदा लै दुकानं आल्याली व्हती. सगळी पोरंटारं रातीच्यानं तितचं ठान मांडून बसलेली.
“ ये धन्या, ती शिरप्या आणि राजा येणार तर हायीत नव्हं. नायतरं आपून इथचं बसायचो वाट बगीत आणि ती लेकाची पारं जत्रतं जाऊनबी बसली असायचीत.”
तवा धन्या म्हणाला;
“ नायं रं, शिरप्यानं सागतलयं पारावरचं उभ -हावा, म्या येतोचं पाठनं.”
“ धन्या तीकडं बगरं, त्या पोरींकडं. ती संगीच हाय नव्हं शिंदयाची.”
“व्हयंरं सर्जा, शाळतं सगळ्या पोरी सारक्याच दिसत्याती आणि असं काय असल की काय नटत्याती काय खिदळयाती.”
पोरीस्नी जातेलं बगून सर्जा म्हणाला;
“धन्या चलं की गडया, आता समद्या पोरी बी जायला लागत्याती. आपून एकटचं रायलोय माग. ती मागनं येतील रं, चल आपून जावूया.”
“सर्जा तुला रं कवापासनं पोरींचा नाद लागलाय.”
“तस नव्हं धन्या. परवा पवार बाईच्या तासाला त्या शिंदयाच्या संगीचा पेन खाली पडलेला. त्यो म्या दिला उचलून तर ती हसली बगूनश्यानं माझ्याकडं. माझी तर पार दांडी गूल झाली गडया. तवापासनं सारखी तीच दिसालीया.”
“अरंरं.... लेका म्हणजी तुझी पारं विकेटच पडली म्हणायची. तरी म्या म्हणूतया ह्या सर्जाला कदीपासनं पोरींचा नाद लागला. बरं चल ती येतील मागनं, आपून जावू पुढं”
“चलं.....चलं.....”सर्जा म्हणाला.
ती दोगबी जत्रतं पोचली तवा संगी बांगडयाच्या दुकानात व्हती. नुस्तीच बांगडया बगीत व्हती. एकबी नाय घेतल्या.
“सर्जा ती बग संगी. त्या बांगडयाच्या दुकानात.”
“अरं परं तीनं कारं नाय घेतल्या बांगडया. संगीला आवडलेल्या वाटतं बांगडया, किती इळ बगत व्हती त्या लाल बांगडया.”
“चल सर्जा त्या बांगडयावाल्या मामालाच इचारूया.”
“मामा त्या पोरीनी का ओ नाय घेतल्या बांगडया?”
“तुमास्नी कशाला रं पायजंनस्त्या चौकश्या?”
“ तसं नव्हं मामा, धाकली भन हाय माझी. बानं म्हनलय जत्रतं हरवल बिरवलजा पाठनं नी घे तीला काय पायजे ते.”
हे बगून सर्जानं म्हणाला;
“ह्याच्या भनीनं ज्या बांगडया पसंद केलेल्या हायीत त्या लाल बांगडया द्या आमास्नी.”
सर्जानं बांगडया घेतल्या. पूर्ण जत्रतं सर्जा संगीच्या पाठनच व्हता. ती जिकडं जायील तिकडं धन्या नी सर्जा हायीतच पाठनं. संगीच्या नजरतनबी हे सगळं सुटलं नव्हतं. दुस-या दिशी सर्जानं बांगडया शाळतं नेल्या.
“काय रं सर्जा लेकाच्या काय चाल्लयं तुझ. पवार बाईनं बगीतल तर गडया फोडून काढील तुला.”
“धन्या गप रं लेका. तिकडं बगं संगी माझ्याकडचं बगालीया.”
“आं.......सर्जा, व्हयं की रं तुझ्याकडचं बगालीया. म्हणजी आग बराबर लगी है म्हणायची की.”
“धन्या तूबी लेका काय बी बोलतोयस गडया......”
“आता मला कळत नायं व्हयं. तू दप्तरातनं बांगडया का आनतोयास ते. नुस्त बगीत बसण्याबिगार तिला डायरेक्ट इचारीत का नायीस.” “ इचारलो अनं ती नाय म्हणाली तर....? त्यापरीस नगचं इचारायला. नुस्ती बगतीया तेबी लै झालं.”
आता रोजचाचं झालेला सर्जानी संगीचा नजरचा ख्योळं..कदी संगीचा पेन पडायचा तर कदी सर्जाचा. धन्या तर व्हताच त्यांच्यावर नजर ठेवाया पाठीमागं.
“अरं सर्जा असा किती दिसं नुस्तच बगीत बसणार हायीस?जा आणि इचारच तीला व्हयं काय नाय म्हणून.”“ अनंनाय म्हणाली तर?”“हाटं लेकाच्या घाबरतोयस काय. नाय कशाला म्हणलं हसतीया लेका तुझ्याकडंबगून.अनंहसली म्हणजी फसली.पाटलाचा हायीस गडया...ती नुस्ती व्हयं म्हणूदे आणूया पळवून.थांब म्याच सांगतो भेटाया तुला उद्या.”
“थांब...थांब....धन्या....”
धन्या क़ुठला थांबतोया. त्यो गेला संगीच्या पाठनं. अनं तिला इचारून बी आला.
“ धन्या तू काय केलसं लेका, आता हसायची बी नाय ती.”
“हे बग सर्जा आता म्या तिला उद्या मसोबाला तूला भेटाया ये म्हणून बोललोया. तवा तूला कळलच की. पाड कडंका एकदाचा, नुस्ता झुरालायीस लेका.”
सर्जाला काय बी कळानं काय करावं ते. संगी नाय म्हणली तर काय करायचं. दुस-या दिशी माळावरच्या मसोबाला सर्जानी धन्या दोगबी हजर झाली. चांगली दोन तास वाट बगीतली तरीबी नाय आली संगी. आता मातूर सर्जा धन्यावर चिडणार त्योच बांदावर संगीनी लती दिसल्या. सर्जा गालातल्या गालात हसला. संगी लयीच भारी दिसत व्हती. संगीनी सर्जाला बोलाया द्यायला पायजे म्हणून धन्या लतीला म्हणाला चल लती तुला मोराचं पीस दावतो.
आता सर्जा नी संगी दोगच व्हती मसोबाजवळ. काय घडलं तितं नाय माहीत पर दुस-या दिशी शाळतं संगीच्या हातात सर्जानं जत्रतं घेतलेल्या लाल बांगडया मातूर दिसल्या.