आठवणीतील गोष्टी - पुष्प ८वे
दररोज - शिल्पा गडमडे
संध्याकाळच्या वेळचे एका बागेतील दृष्य..
आपापल्या आईचे बोट पकडून बागेत आलेले लहान मुलं.. बागेतील बाकावर एकटीच बसलेली ती.. तिथूनच लहान मुलांच्या किलबिलाटात पूर्णपणे गुंगून गेलेली.. लहान मुलांच्या निरागस हालचाली न्याहाळत त्यांच्या जगात हरवलेली.. मुलांच्या निरागस हास्यामध्ये हसणारी.. खेळता खेळता पडणाऱ्या मुलांच्या वेदनेने हळूच स्वतःचे डोळे पुसणारी .. बाकावर खिळून बसलेल्या तिची नजर मात्र संपूर्ण बागभर पसरलेली असायची.. बागेत घालवलेल्या तासा दोन तासात आनंदाच्या-दुःखाच्या कितीतरी छटा तिच्या चेहऱ्यावरून झळकून जात..
लालसर रंगानी आभाळ भरून गेल्यावर हळूहळू अंधारू लागे.. तोवर घरट्याकडे परतणारे पक्षी पाहत आईचा हात धरून लहान मुलंही घरी निघालेली असत.. एक सुस्कारा टाकत ती उठे.. घरी पोहचून अंधारलेल्या घरात दिवा लावल्यावर भिंतीवर एका लहानग्या मुलाच्या फोटोभवतीचा हार अधिकच स्पष्ट दिसत असे.. दररोज..
-शिल्पा गडमडे