चित्तथरारक --- अंगावर काटा आणणारी भयकथा ...अक्षय वाटवे...अभिनंदन...क्या बात है!!
विक्रम
पौर्णिमा – अक्षय वाटवे
भाग ६
सोनल हळूहळू शुद्धीवर येत होती. ती भानावर आली तशी तिने आजूबाजूला पाहण्यासाठी मान वळवली आणि तिच्या डोक्यात प्रचंड वेदनेच्या मुंग्या उठल्या. हवेत एकप्रकारचा मास जळत असल्यासारखा उग्र दर्प पसरला होता. श्वास घेतानाही तिला प्रचंड त्रास होत होता. तशातच तिने हात-पाय हलवायचा प्रयत्न केला आणि तिला जाणवलं की तिचे हात-पाय करकचून बांधले आहेत. थोडं जरी हलायचा प्रयत्न केला तरी घट्ट बांधलेल्या दोऱ्या काचत होत्या.
‘आई गं ...’
सोनलने विव्हळून आक्रोश केला. डोक्यात होणाऱ्या वेदना तिला सहन होत नव्हत्या. तिला पुन्हा भोवळ आली. तिची शुद्द हरपण्या आधी तिच्या कानावर अस्फुट शब्द पडले.
‘स्वामी सगळी तयारी पूर्ण होत आली आहे. आज अमावस्या, ठीक पंधरा दिवसांनी पोर्णिमा. साधनेच्या शेवटच्या टप्प्याची सर्व सामग्री आणली आहे. स्वामी या वेळी आम्ही नक्की यशस्वी होणार... होणार नं...’
इकडे सोनल शुद्धीवर रहाण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. तिने आजू बाजूला पाहिलं. दाट काळोख पसरला होता. काही क्षणात तिची नजर काळोखाला बरीचशी सरावली. तिने आपण कुठे आहोत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पण तिला काहीच लक्षात येईना. ती पूर्णपणे अनोळखी भागात होती. ते मैदान होतं.. की एक अतिशय विस्तीर्ण दालन.. तिला काहीच कळेना. तिने अतिशय कष्टाने आवाजाच्या रोखने मान फिरवली. समोरचं दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले.
तिच्या डाव्या बाजूला काही अंतरावर एक महाकाय भिंत होती. त्या भिंतीवर कसल्याश्या विचित्र भयानक खुणा रेखाटल्या होत्या. एक मोठा षटकोन होता त्याच्या मध्यभागी एक चक्र. चक्र आणि षटकोन यांना जोडणारे बाण. मधल्या रिकाम्या भागात अगम्य भाषेत चितारलेल्या खाणाखुणा. सोनलने सभोवताल नजर फिरवली आणि काय काय दिसते आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. तिने जे काही पाहिलं त्याने मात्र ती अतिशय भयभीत झाली थरथर कापू लागली.
त्या भिंतीवरच्या आकृती समोर एका उंचवट्यावर मानवी पुतळा असावा त्याप्रमाणे ‘तो’ मांडी घालूनबसला होता. एका बाजूने त्याच्या अंगावरची चामडी लोंबत होती आणि जुन्या जीर्ण वस्त्राने देहं झाकला होता. डोळ्यांच्या खोबण्यामध्ये मात्र हिरवट प्रकाश चमकत होता. त्याच्या समोर एक व्यक्ती पाठमोरी उभी होती.
‘चारशे वर्ष... चारशे वर्ष वाट पाहतो आहे मी.’ दूर अंतरावरून यावेत त्या प्रमाणे खोल घोगऱ्या आवाजात एक एक शब्द सोनलच्या कानावर पडत होते.
सोनल लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करू लागली.
‘स्वामी,ह्या वेळी विजय आपलाच होणार.’
हा आवाज पाठमोऱ्या उभ्या असलेल्या व्यक्तीचा होता. सोनलला हा आवाज ओळखीचा वाटू लागला. ती व्यक्ती उत्साही स्वरात बोलू लागली.
‘कारण बलीविधीसाठीचा बळी आपल्या ताब्यात आहे, आणि आपला प्रतिस्पर्धी आपण निर्माण केलेल्या भ्रमाच्या जाळ्यात पूर्णपणे फसला ...’
‘होता..’
पुन्हा तोच खोल आवाज. पण आता आवाजात प्रचंड संताप होता.
‘भ्रमाचा भोपळा फुटला आहे...’
‘म्हणजे..? स्वामी... पण हे हे अशक्य आहे...’
ती पाठमोरी व्यक्ती व्यक्ती भेदरलेल्या स्वरात म्हणाली.
राजेश मामा, हो. तोच.. तोच आहे हा.. तसाच आवाज आणि पाठमोरा पहिला तर दिसतोही तसाच. सोनलच्या पाठीतून एक थंड शिरशिरी गेली.
‘राजेश्वर, जरा आकाशात पहा... आपलं सैन्य समीप आलंय... पण मला ऐकू येतायत त्या विजयाच्या आरोळ्या नाहीत तर वेदनेच्या किंकाळ्या..’
त्या खोल आवाजातले हे शब्द हवेत विरतात नं विरतात तोच.. पाच पन्नास जखमी वाघळं त्या दोघांच्या समोर कोसळली. विचित्र आवाजात सुरु असलेल्या त्यांच्या कालकलाटाने राजेश्वर दचकून मागे सरकला... आणि तेवढ्यात शेजारी असलेल्या मशालीचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला.
तो चेहरा पाहिल्यावर सोनलच्या मनातला संशय पूर्ण पणे दूर झाला. हो. हा राजेश्वर म्हणजे तिचा राजेश मामाच होता. त्या वाघळां पाठोपाठ एका माणसाचं धूडही खाली कोसळलं. जमिनीवर पडल्या पडल्या ते धूड वेदनेने विव्हळलं. ही त्याच्या जिवंत असण्याची खूण पाहून राजेश्वर पुढे सरसावला. मात्र क्षणार्धात चेहरा फिरवून माघारी आला.
‘शाब्बास, किमान शत्रूचा एक मोहरा घायाळ करून त्याला ओलीस घेऊन आलात. शाब्बास माझ्या पाठ्यांनो..’
असं म्हणत हिरव्या डोळ्यांचा ‘तो’ अतिशय कष्टाने उंचवट्यावरुन खाली उतरला.
‘ईssss....शी...’ सोनल मोठ्याने किंचाळी. कारण ‘तो’ खाली उतरला तसं त्याच्या अंगावर पांघरलेलं वस्त्र खाली घरंगळलं आणि समोर दिसणारं दृश्य अतिशय किळसवाणं होतं.
त्या शरीराच्या डाव्या बाजूने अंगावरच्या मासाचे गोळे जळत होते. त्यातून रक्त आणि पु वहात होता. त्याची घाण दुर्गंधी पसरली होती. चेहरा डाव्याबाजूने पूर्ण भाजला होता. गालाची हाडं दिसत होती. डोळ्याच्या जागी मात्र खोबण्या होत्या आणि त्यातून बाहेर पडणारा तो हिरवा प्रकाश... सोनलचा आवाज ऐकल्यावर त्या हिरव्या प्रकाशाला लाल छटा येऊ लागली. ते हिरवे डोळे आता सोनलवर रोखले होते. त्या प्रखर हिरव्या प्रकाशात आपलं सारं शरीर भाजून निघतं आहे. असच सोनलला वाटत होतं. त्या असह्य वेदनांनी सोनल आक्रोश करत होती.
‘स्वामी ती आपली बळीची कुमारी आहे.’ खाल मानेने राजेश्वर पुटपुटला.
‘राजेश तू ...?’ जमिनीवर पडलेल्या त्या व्यक्तीच्या तोंडून एकाच वेळी संताप आणि आश्चर्याने उद्गार निघाले.
तो आवाज ऐकला मात्र आणि वेदनेने विव्हळणाऱ्या सोनलने क्षणभर वेदना विसरून आवाजाच्या दिशेने पाहिलं.. आणि समोर जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला पाहून ‘बाबा’ अशी अस्फुट हाक तिच्या तोंडून बाहेर पडली मात्र दुसऱ्या क्षणी सोनल बेशुद्ध पडली.
तिन्हीसांजेची वेळ... नाडकर्णी वाड्याभोवती घुबडांचे घुत्कार ऐकू येत होते. रातकिड्यांची किरकिर सुरु झाली होती. वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश जणू मिणमिणता झाला होता. खरंतर वाड्या भोवती पसरलेल्या गडद हिरव्या काळोखाने आजूबाजूचा प्रकाश शोषून घ्यायला सुरवात केली होती. वाड्याची लाईट केव्हाची गेली होती. दिंडीदरवाजावर आढ्याला एक वटवाघूळ लटकले होते. त्याची अधून मधून होणारी फडफड वाड्याच्या आवारातली स्मशान शांतता भेदून टाकत होती.
सविताबाईंनी कसाबसा तुळशीपाशी दिवा लावला आणि त्या भेदरलेल्या अवस्थेतच झपझप आतल्या दिशेला वळल्या. चार पावलं पुढे गेल्या आणि कसल्याश्या विचाराने त्यांनी फिरून मागे वळून पाहिलं तर... तुळशी समोर लावलेल्या दिव्याची ज्योत फडफड करत अचानक विझली. आजूबाजूला मात्र वाऱ्याची साधी झुळुकही नव्हती. सविता बाईंच्या काळजात धस्स झाल. त्या जीवाच्या आकांताने उपाध्यांच्या खोलीकडे धावल्या. गडद होत जाणारी हिरवी काळी सावली वाड्याभोवती आपले पाश आवळत चालली होती.
फक्त उपाध्यांच्या खोलीतून पेटत असलेल्या हवनकुंडातील पिवळ्या-लाल ज्वालांचाच काय तो प्रकाश वाड्यात शिल्लक होता. वाड्यात रक्त गोठवणारा गारठा पसरला होता. सविताबाई धापा टाकत हवनकुंडा समोर येऊन बसल्या.
आणि उपाध्यांच्या तोंडून निघालेल्या ॐकारचा दीर्घ नाद संपूर्ण नाडकर्णी वाड्यात घुमला. पाठोपाठ बाहेर घुबडांनी घुत्कार केला.
‘ग..ग..गु..गुरुजी.. म.. ला फार...भीती... वाटतेय हो..’ सविताबाईंच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
उपाध्यांनी पुन्हा एकदा ओंकार करून शांती मंत्र पाठणाला सुरुवात केली. मत्र पठण सुरु होताच.. हळूहळू त्या खोलीतील ताण कमी होत गेला. सविताबाई सावरून बसल्या.
गेल्या सात दिवसात त्यांनी काय पाहिलं होतं सहन केलं होतं ते आठवून त्यांच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. दिवसा रात्री... कधीही घरात वावटळ शिरायची. घरातल्या वस्तूंची उलथापालथ व्हायची. मध्येच अंगणात झाडांना आग लागायची. पाणी टाकायला जावं तर आग अजून भडकायची. एकदातर सविताबाईंचा पदर जळता जळता वाचला होता. वाडा भग्नावस्थ बनला होता. रात्रीच्या वेळी सोनल किंवा शरदराव हाका मारत असल्याचा त्यांना भास व्हायचा. या सगळ्या प्रकाराला त्यांनी धीराने तोंड द्यायचा प्रयत्न केला होता. कारण याची पुसटशी कल्पना ध्यानाला बसण्याआधी उपाध्यांनी त्यांना दिलीच होती. मात्र आज ध्यानाचा शेवटचा दिवस.. आणि तुळशी समोर लावलेला दिवा विझला तेव्हा सविताबाईंचा धीर सुटला.
उपाध्यांनी मात्र गेले सात दिवस स्वतःला खोलीत बंद केलं होतं. सात दिवस त्यांची ध्यानधारणा चालू होती. त्याचं तेज त्यांच्या मुखावरून ओसंडून वाहत होतं. . त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुढे येणाऱ्या प्रसंगाला समोरे जाण्याची परिपूर्ण तयारी केली होती. पण... आज ध्यानाच्या वेळी त्यांनी जे दृश्य पाहिलं त्याचा त्यांना धक्का बसला होता.
शंभर वर्षांपूर्वी पराकाष्ठेने रोखण्यात आलेला हा सैतानी खेळ अतिशय जवळच्या भावनिक आणि रक्ताचे संबंध असलेल्या व्यक्तीने सुरु केला होता. आणि हे आता एकट्या पडलेल्या सविताबाईना सांगणं.. आणि फक्त सांगणच नाही तर त्या व्यक्ती विरुद्ध लढण्याची त्यांची मानसिक तयारी करणं. हेच उपाध्यांसमोर मोठं आवाहन होतं.
‘सविताबाई कदाचित या प्रकरणात आपल्या सोनलचा बळी जाऊ शकतो.’
सविताबाई सारा धीर एकवटून उपाध्यांच्या तोंडून निघणारा एक एक शब्द काळजीपूर्वक ऐकत होत्या.
‘कदाचित शरदराव... परतणार नाहीत... कदाचित सोनल आणि शरदरावांच्या बदल्यात तुमच्याकडे काही काम पूर्ण करण्याची मागणी केली जाईल. कदाचित माझ्या नकळत तुम्ही माझी हत्या करावी असेही सुचवले जाईल. तुम्हाला अतिशय सावध राहावं लागणार आहे. ’
सविताबाईंचे हात-पाय गारठायला लागेल. सोनल आणि शरदरावांचा चेहरा त्यांच्या समोर तरळला.. त्यांनी पुन्हा उपाध्यांकडे पाहिलं.
‘पण.. पण माझ्या कडूनच...का... आणि कोण करून घेणार हे...’
सविताबाईंचा धीर सुटत चालला होता. त्या प्रचंड घाबरल्या होत्या.
‘मन घट्ट करून ऐका सविताबाई..’उपाध्यांच्या आवाजाला धार आली होती.
‘हे सारं करणारा तुम्हलाही ह्या पापामध्ये सहभागी व्हायला लावणारा... हा... तुमचा सख्खा लहान भाऊ राजेश आहे..’ ‘काय?..’
सविताबाईना हे ऐकून फार मोठा धक्का बसला होता.
‘हो, सविता बाई हेच सत्य आहे. या सगळ्या प्रकरणात. ‘त्या’चा पुढचा शिलेदार म्हणजेच, शंभर वर्षानंतर होणाऱ्या या विधीचा कर्ता हा सर्वस्वी तुझा भाऊ राजेश आहे.’
सविताबाई दिग्मूढ झाल्या