एक दिवस - अर्चना हरीश
खूप दिवसांनंतर किंवा खरतर पहिल्यांदाच, आज ते दोघेच घरी होते.
सकाळपासून तिची बडबड सुरु झाली, गोष्टी, बाहुल्या, खेळणी सगळ्या बद्दल बोलत होती ती, अगदी न थांबता!
मग तो तिला drive ला घेऊन गेला, रस्त्यात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत होती ती. त्याला आश्चर्यही वाटले, इतके सतत कोणी कसे बोलू शकते?
नंतर ते मैदानावर गेले, तो झपाझप पावले टाकत होता आणि ती अक्षरशः त्याच्या मागे पळत होती, त्याला वाटले आता दमून गप्प बसेल, पण छे .........................
घरी परत आल्यावर त्याला त्या बडबडीचा कंटाळा यायला लागला, दुसरे कश्यात तरी गुंतवून ठेऊ असे म्हणून त्याने TV लावून दिला .... TV बघतानाही तिचे अखंड बोलणे चालूच होते.
आता मात्र तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागला .................
आज त्याला तिच्याच आवडीचे जेवण जेवावे लागले होते , स्वतः चे ताट ही धुवावे लागले होते, शिवाय तिने घरही आवरायला सांगितले. झोपताना गोष्टही वाचून दाखवावी लागली ........
" बाबा today was the best day, I like your company ". असं बोलून ती झोपी गेली.
तो दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहू लागला .........