हुरहूर लावणारी फिरस्ती आहे आजची....खूप काही सांगायचं असत...खूप काही बोलायचं असत...आणि......
"वळण" - स्वाती धर्माधिकारी
तो खूप दिवसांनी निघाला संध्याकाळी फिरायला...अपेक्षित ठिकाणी नव्हतीच ती, तिची चाहूलपण नव्हती. त्याला जरा निराश वाटलं ...आज जरा जास्त दूरचा राऊंड घेऊच म्हणून तिच्या घरासमोरून मुद्दाम आला, पण काहीही मागमूस दिसेना. शेवटी जरा वेळ वाट बघावी म्हणून एका रस्त्याच्या साईडला बेंचवर बसला तो .... नेहमीचे सारेच होते, तो अल्सेशियन कुत्रा घेऊन येणारा---त्याच्या हातातली काठी आणि ओठांतली शिळ ओळखीची, काही मुलींची ग्यांग खिदळत होती जवळच हातात सायकली धरून ...त्या कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडे अजून गर्दी नव्हती सुरु झालेली. त्याने ठरवलं थांबूचया आज जरा जास्त वेळ ....येईलच ती ....
उगाच आठवून बघितलं काय घालेल ती? सलवार कि जीन्स? सध्या थंडीमुळे लेगिंस घालेल, आकाशी निळा कुडता मस्त दिसतो तिला, एरवी फक्त आंखों आंखों में बात असायची! आज सांगूच तिला मला आवडतेस खुप्च्या खूप म्हणून...शब्दांची जुळवा जुळव करण्यात बराच वेळ गेला ....शेवटी अंधार पडाय लागला ..तसा तो उठला .....नाईलाजाने .....
वळणावर दोघी बोलत होत्या ...ओझरतं ऐकू आलं ...अग, जोश्यांच्या आजी अचानकच गेल्या नाही गं?"......
त्याची वॉकरवरची पकड आणखीन घट्ट झाली ......आणि रस्ता धूसर .....धूसर .....!