अपर्णाराणी विचोरे आठल्ये...खूप वेगळा...आगळा आणि धाडसी विषय घेऊन आपल्या समोर आल्या आहेत..अपर्णाचे अभिनंदन!
विक्रम
"भुमी" - अपर्णा विचोरे आठल्ये
"रामरावजी कित्ती बीया पेरता? कापुस, सोयाबीन, तुर. इकडे पुन्हा टमाटे, भेंडी, मिरची, वांगे ..... ई . मला नाही आवडत वांगे, ते नका पेरू ." घिटुकली सोहा गड्या सोबत शेतात फिरत होती, कुतुहलाने सारं न्याहाळत होती." वांगे नाही ! मला नाही आवडत जमिनीला पण नाही आवडणार" सोहाने ठासून सांगितलं.
"अजी सोहाबाई जमिनीले कायची आवड नं निवड आपण जे पेरू थ्येच तीनं द्यायाचं उगून." हसत हसत रामराव ने सोहाचा गालगुच्चा घेतला.
X X X X X
डॉ.करमरकरांच्या अद्ययावत क्लिनीक मधे सोहा आणि आदित्य रिपोर्टस्ची वाट बघत होते. अस्वस्थ, उत्सुक.
" मि.देशपांडे, .सर्व टेस्टस आणि ट्रिटमेंटचे सार हेच निघतय की तुम्ही स्पर्म ब्यांकचा पर्याय स्विकारावा. बघा तुम्ही दोघांनी मिळून निर्णय घ्यायचाय." डॉ .शांतपणे सांगत होते आणि परंपरेचा, परिपुर्णतेचा अट्टाहास धरणारे देशपांडेंचं उच्चभ्रू कुटुंब हादरत होते. हुशार, देखण्या, कर्तृत्ववान , गर्भश्रीमंत आदित्यमधे इतकी मोठी ऊणीव?
सर्व तपासण्यांच्या चक्रातुन पार पडलेल्या, मातृत्वाची आस पराकोटीला पोहचलेल्या सोहासाठी आदित्य सोबतच्या आठ वर्षातला प्रत्येक क्षण अमुल्य होता. त्यामुळे मांडलेला संसार मोडण्याचा प्रश्नच नव्हता, आदित्यने सुचवले तरीही. आणि डॉ. नी सांगितलेला उपाय पचनी पडत नव्हता.
आदित्यच्या नजरेतली वात्सल्याची भुक, बाळ लेणं अंगी ल्यायला उतावीळ घर अंगण, ताठरत जाणारे कौटुंबिक बंध सोहाला परिस्थिती शरण बनवत होते.
बंद दाराआडच्या कुजबुजत्या चर्चाचं सार एवढच निघालं की बाहेरच्या जगात सारं 'आलबेल ' दिसावं. सावरलेली सोहा नशीबाला सामोरं गेली . . "पण ते स्पर्म बँक वगैरे नको बाई! नाव गाव माहिती नसलेल्या तिऱ्हाईताचा अंश कुठे वाढवतेस पोटी, माझ्या नात्यातले विश्वासाचे आहेत त्यांना मागू विर्य. या कानाचं त्या कानाला कळणार नाही." सासूबाईंनी सुचवलं. अन् सोहाला डॉं. कौस्तुभ आठवले.
X X X X X
गावात नविनच आलेले देखणे, सभ्य,हुशार डॉ.कौस्तुभ गावात कुतुहल आणि कौतुकाचा विषय होते. सोहा स्वतःच्याही नकळत ओढली गेली त्यांच्याकडे. नजरेला नजरेचा प्रतिसाद मिळाला, भावनांची गुंफण दाट होत होती, पण डॉ. वेळीच सावरले. उसनं अवसान आणून लग्नाचं निमंत्रण देतांना त्यांचे डोळे दुखावलेल्या सोहाची क्षमायाचनाच करत होते.
सारंसारं मनाआड करून सोहा होस्टेलवर परतली आणि मैत्रीणी, अभ्यास यातच गुंतली. पुढे तिच्या लग्नातही मनापासून मिसळलेल्या डाँ.च्या नजरेत तिला फक्त हळवेपण आणि मैत्रीची अपेक्षाच जाणवली.
X X X X
"खरंच तसं होतं की आपल्याच मनाचे खेळ? तोच आधार घेउन पुढे व्हायचं, मागायचं त्यांनाच वंशवृद्धीचं दान?" सोहा थरारून उठली. "काय हरकत आहे? नाही तरी कुठल्याशा परपुरूषाचाच अंश धारण करायचाय नां, मग त्यापेक्षा...शिवाय प्रत्यक्ष मर्यादा ओलांडायच्याच नाहीत." आदित्यची आडकाठी नव्हतीच कधी.
काळवेळ बघून सोहाने सासूबाईंजवळ विषय काढला,
"म्हणजे लग्नाआधीपासून तो मनात होता की काय तुझ्या? अं हं! मनातुन का होईना त्याचीच ओढ लागली तर? नक्कोच ते! आम्ही म्हणू त्याचंच बीज स्विकार अन् वंशाला फळ दे आमच्या”