आजची दुसरी कथा सुद्धा झकास आहे...
विक्रम
तव्यावरची पोळी - स्वाती फडणीस
त्यांनी लग्नाच्या आधीच तिला सांगून ठेवलं होतं मला आईच म्हणं आता तशीच पद्धत आहे. माझ्या मैत्रिणींच्या सुना त्यांना आईच म्हणतात..छान वाटतं..! आधुनिक..!! तू देखिल मला तशीच हाक मार. "आई.." म्हणून त्या खुशीत हसल्या..तिची आई हे असं इतकं लोभस कधी हसलेली तिला आठवेना..हास्य देखील बहुतेक संसर्गजन्यच असावं त्यांचं लोभस हसू बघून तिच्याही ओठांवर हास्य उमलत गेलं. "बरं आई.." ती नम्रपणे म्हणाली..
तशी ती घरची फार लाडकीबिडकी नव्हतीच. आईपाशी खूप हट्ट करता येई, मजा, मस्करी चाले असं देखील नव्हतं. तिची आई बोलायची ती तिच्या अखंड राबण्यातून तरी ती समोर असली की एक निश्चिंतता असायची. इथे थोडा अवघडलेपण, पण ती खूश होती. गोड गोड हसणाऱ्या, बोलणाऱ्या सासूबाईंवर, तरतरीत मुलावर. तशी ती अबोलच त्याला देखील बहुतेक फारसा संवाद जमत नसावा.. पण रिक्षाने जाणं-येणं साखरपुड्याची उंची साडी अंगठी सोबत अनपेक्षितपणे घडवले गेलेले कानातले आणि चेन. दिवस छान चालले होते. लग्नाची जोरदार खरेदी झाली. "अहो आई" म्हणताना अडखळत ती संसारात रुळू लागली.
"सासरी गेलं की हे केलं पाहिजे..ते आलं पाहिजे.." ऐकतच मोठी झालेली. आईला सतत कार्यरत राहताना पाहणारी ती मेहंदिचा रंग उतरेपर्यंत देखील मागे राहिली नाही. तिने स्वयंपाकघराला आपलंसं केलं..सकाळ संध्याकाळ वेगळा स्वयंपाक व्हायचा.. "आहो आई" देखील मदतीला असायच्या मुलाचं कौतुक सांगायच्या. "आमच्या .....ला नेहमी तव्यावरची पोळीचा लागते. मी कधीच त्याला सकाळची पोळी संध्याकाळी वाढली नाही."
तिच्या माहेरी दिवसातून एकदाच स्वयंपाक केला जाई..हे असे लाड सुट्टीच्या दिवशी ते पण तिच्या वाट्याला क्वचितच येत. क्षणभर नवऱ्याचा हेवा करत ती नव्या नवलाईला सुखावत होती. लग्नाच्या सुट्टीचे दिवस कसे फुलपाखरासारखे भुर्रकन उडून गेले..ती आपल्या कामावर रुजू झाली. सकाळचा स्वयंपाक स्वतःहून स्वखुशीने करायची. संध्याकाळी घरी परतायला उशीर होई.
सासूबाई. तू आलीस की मगच स्वयंपाकाला लागू म्हणून तिची वाट बघत..ती कंटाळे तरी "सासरी गेलं की हे..हे केलं पाहिजे"ऐकून इतकं पक्क झालेलं की त्याचं दारातच विचारलेलं "आता काय करतेस..?" तिच्यासाठी स्वागताचच ठरे.
त्या दिवशी असाच दोघींनी मिळून स्वयंपाक केला. जरा जास्तच झाला..दुसऱ्या दिवशी तिने नेहमी प्रमाणे सकाळचा स्वयंपाक केला. दोघांचे डबे भरले आणि ती बाकीची तयारी करायला निघून गेली. "अहो आई" स्वयंपाक आवरत होत्या.. आवरता आवरता त्यांनी एका डब्यातले जिन्नस काढून त्यात आदल्या रात्रीचे उरलेले पदार्थ भरले. तेवढ्यात ती तिथे पोहोचलीच. त्यांनी तो डबा तिच्या हातात ठेवला. "मी कायम हा असाच डबा नेत आले." अहो आईंनी त्या घरच्या अजून एका पद्धतीचा(?) तिच्यावर संस्कार केला.
तिला तिच्या माहेरी कधीच तव्यावरच्या पोळ्या वाढल्या गेल्या नव्हत्या.. तरी हा असा शिळा डबादेखील कधीच तिच्या वाट्याला आला नव्हता. आई आपल्या मुलांमध्ये असा भेद कधी करते का..? तिला बोलता आले नाही. तुम्ही तुमच्या मुलीला असाच डबा द्यायचात का? ती विचारू शकली नाही.
त्या दिवशी शिळा डबा खाताना "अहो आई" म्हणजे सावत्र आई हा विचार तिला जाळत राहिला. आणि एक बदल झाला. संध्याकाळी "सासूबाई" आज फक्त मुगाची खिचडी करूया म्हणून तिने एकएक शिरस्ता मोडायला घेतला.