भन्नाट कथा आहे ही -- मेघा निकम जियो...
विक्रम
जलसा – मेघा निकम
हातात कोणीतरी दिलेला लाडू चिवडा.. थोडी जीर्ण झालेली, थोडी कसली! बरीच जीर्ण झालेली एक हिरवी नऊवार..डोक्यावरून पदर, कपाळी भला मोठा कुंकवाचा टीळा, एका पायात निळी-पांढरी थोडी अपुरी चप्पल तर दुसऱ्या पायात लाल चप्पल, अंगठ्याच्या पुढे आणि टाचेच्या मागे इंच-इंच जागा उरेल अशी एक! अनुभवाने आलेले शहाणपण डोळ्यांत दिसत होते..
काटक अन सडपातळ देहयष्टी, चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून तर्क केला, सहज पन्नासेक वर्षाचा संसार झाला असेल या आजीचा..हरीसप्ताहात विठूरायाची भजने, अभंग गायला ती आली नाही तर गावालाच चुकल्यासारखे वाटेल. गोड गळा आणि मुखात हरीनाम..ही जलसा आजी साऱ्या गावाची..आणि ती स्वत:साठी मात्र तिच्या बाप्पुरावची! उठता बसता बाप्पुरावचे नाव ओठी.. आणि नाव घेतले की एक खळखळून हास्य! कोणालाही तिचा हेवा वाटावा असे. गावातील कोणत्याही लग्नकार्यात, मंगलप्रसंगी उखाणा घ्यायचा म्हटलं तर जलसाआजी सर्वात पुढे.. प्रसंग कोणताही असो, शब्दांची गुंफण क्षणार्धात.. चहा पिताना बाप्पुराव, चिवडा खाताना बाप्पुराव,
“एकदा केला निवून गेला, चिवडा करीन ताजा, बाप्पुरावचं नाव घ्याया पहिला नंबर माझा”
महादेवाच्या पिंडीवर बेल वाहताना बाप्पुराव, नवी नवरी पाहिली त्यावरून उखाणा, त्यातही तिचा बाप्पुराव, कांदे लसणाच्या पिशव्या भरताना दिसले तर त्यावरून हा
“भरले कांदे, भरला लसूण, पिशव्या झाल्या दोन, बाप्पुरावचं नाव घेते, पोहोचल्यावर करा फोन”
वटसावित्रीच्या पूजेपासून बेंदूर, पंचमी, गौरी गणपती, दसरा-दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा करत आषाढी एकादशीपर्यंत वर्षाच्या साऱ्या सणांना एका उखाण्यात बाप्पुरावच्या नावासाठी, माळेचे मणी ओवल्या प्रमाणे सुंदर ओवणारी ही साऱ्या गावाची जलसा...आणि एक कटू सत्य!
बाप्पुरावनं हिला कधी नांदवलीच नाही, दुसरे लग्न करून संसार थाटला! आणि हीचं सारं आयुष्य त्याचं उखाण्यात नाव घेण्यात..
माहेरी कोणीतरी दिलेल्या भाकरतुकड्यावर जगून शेळ्या-मेंढ्यापाठी रानावनात!