स्मृतीची कोरी पाटी - एक मोट्ठे आव्हान -
विक्रम
आय कार्ड – सचिन भट
वाहिनीने चहाचा कप माझ्या हातात दिला… "तुम्ही बसा बाहेर. मी काहीतरी खायला आणते". मी "OK…" म्हणून बाहेर हॉल मध्ये आलो. दादा कानाला हेडफोन्स लावून बसला होता त्याच्या कॉम्पुटर समोर. त्याने मला ओठावर बोट ठेवून "माझा कॉल चालुये…". मी "बरे बरे… चालुदे …" असे पुटपुटलो आणि सोफ्यावरती बसलो आरामात.
टि-पॉय वरती पेपर पडला होता तो घेतला आणि चाळायला लागलो. जेमतेम एखाद मिनिट झाले असेल. तोच भेंडे काकू दरवाज्यातून आत आल्या आणि धपकन सोफ्या वरती बसल्या. माझ्या हातातला चहा जवळ जवळन सांडलाच अंगावर. मी वैतागून त्यांच्या कडे बघितले पण त्या आपल्याच तंद्री होत्या. त्यांना वाटते मी दिसलोच नसेन…हातात कसली तरी कापडी पिशवी होती. त्यात कदाचित सटर फटर गोष्टी असतील. पण महत्वाचे म्हणजे त्यांचे आय कार्ड असेल!
मी एकदाच ते बघितले होते. म्हणजे मला काकांनी दाखवले होते. त्यात काकुंचे नाव, पत्ता, काकांचे नाव आणि मोबाईल नंबर लिहिले होते.
सर्वात मुख्य म्हणजे तिथे लिहिले होते "सदर व्यक्ती हि अल्झायमर्स ह्या रोगाने ग्रस्त असून, ह्यांना रोजच्या गोष्टी किंवा स्वताबद्दल ची माहिती लक्षात रहात नाही. जर तुम्ही हे आय कार्ड वाचत असाल तर वरील मोबाईल नंबर वरती कॉल करावा हि विनन्ति."
काकू नुसत्या बसल्या होत्या. काहीही न बोलता. वाहिनी पण तेवढ्यात बाहेर आली हातात चिवड्याची बशी घेउन. तिने काकुना आलेले बघितले. त्तीने माझ्या हातात बशी दिली. तिने अगदी हळू आवाजात काकूंच्या पाठीवर हात ठेवून "काकू पाणी देऊ का प्यायला?" काकूंनी फक्त "अं…मी…संदीप बाहेर गेलाय. मी पण मार्केट ला गेले होते पण यादी घरीच राहिली वाटते…" वाहिनी पाणी आणायला आत गेली.
"अगं तू इथे आलीस होय…मला वाटलेच…" काका घरात शिरतांना म्हणाले. त्यांनी मला बघितले आणि त्यांना हायसे वाटले. "चल घरी आता…संदीप पण येइलच थोड्या वेळात." काकूंनी वाहिनी कडून पाण्याचा ग्लास घेतला…शांत पणे पाणी प्यायल्या आणि काकांबरोबर निघून गेल्या.
बिचारे काका आणि काकु. मला अचानक अस्वस्थ वाटायला लागले. दादाला काही पत्ताच नव्हता… तो त्याच्या कॉल मध्ये पार गुंगला होता. मी पण बशी आणि कप ठेवला आणि वाहिनी मी येतो असे ओरडून बाहेर आलो. ……
मी जिन्या वरती का थांबलो होतो का कुणास ठावूक. परत चढायला सुरुवात केली आणि दुसर्या मजल्या वर आमच्या दाराशी आलो आणि बेल वाजवली. बाबांनी दार उघडले.
आई आली का… हो आली. आज पण खालती जाऊन बसली होती का?
हो… मी जाऊन तिला घेऊन आलो. बराय सानिया खालतीच राहते. दुसरे कोणी असते तर वाट लागली असती सगळी.
सनु आला ग… अरे कधी पासून विचारतेय तो आला का म्हणून?
मी आत गेलो. आईला बघून मला भरून आलं. बिचारी शांत बसून होति. तिच्या मनात काय चाललय ह्याचा काही पत्ता लागत नव्हता तिच्या कडे बघुन. मला बघून ती अगदी मोकळे पणे हसली…मी तिचा हात घेतला हातात आणि हळुवार पणे थोपटत बसलो तिच्या बाजूला. ……
बाहेर हॉल मध्ये भेंडे काकांनी संदीपची पिशवी चेक केली. त्यात एक आय कार्ड होते.
संदीप भेंडे. राहणार… जवळील व्यक्तीचे नाव मोबाईल नंबर…
सर्वात मुख्य म्हणजे तिथे लिहिले होते "सदर व्यक्ती हि अल्झायमर्स ह्या रोगाने ग्रस्त असून, ह्यांना रोजच्या गोष्टी किंवा स्वताबद्दल ची माहिती लक्षात रहात नाही. जर तुम्ही हे आय कार्ड वाचत असाल तर वरील मोबाईल नंबर वरती कॉल करावा ही विनंती."