श्वेता एक गुणी अभिनेत्री आहे...तिच्याकडे तिचे शब्द आहेत हे मला तिने महाराष्ट्र टाईम्समध्ये काही लिहिले होते तेंव्हाच मला जाणवले होते...आणि मी तिला तसे म्हटले सुद्धा होते...आज ती आपली गोष्ट घेऊन नुक्कड वर आली आहे. तिचे कुटुंबात उत्स्फूर्त स्वागत करूया.
विक्रम
फ्रीज – श्वेता मेहेंदळे
डिलीव्हरी रूममधे गडबड चालू होती. नर्सेस आया इकडून तिकडे करत होत्या. संध्याकाळी सहा वाजता मी अॅाड्मिट झाले होते. रात्रभर चार गोळ्यांचा कोर्स करून दुसऱ्या दिवशी डिलीव्हरी करायची म्हणून. पण दोन गोळ्या जेमतेम घेतल्या आणि आठ वाजता डॉक्टर म्हणाले “९ वाजेपर्यंत होईल बाळ”.
त्यानंतर डॉक्टरांनी मला चालायला सांगितलं. पण अरे देवा, पाच मिटर सुद्धा चालवत नव्हतं मला. पण त्या हॉस्पिटलमधल्या आया आणि माझी आई आणि माझ्या सासूबाई मला चालायला लावत होत्या. माझा नवरा कोपऱ्यात बसून माझ्या अवस्थेकडे नुसता बघत होता. तो तरी काय करणार बिचारा. पण मला मात्र या सगळ्या लोकांचा भयंकर राग येत होता. शेवटी मी सांगितलं की “मला आता उभं राहणं शक्य नाही मला चक्कर येतेय. प्लिज मला बसू द्या.”
मग आया मला लेबर रूम मधे घेऊन गेली. त्या एवढ्याश्या बेड्वर झोपवलं. म्हणाली “डॉक्टर येतीलच पाच मिनीटात.” पाच मिनीट. बापरे. तोपर्यंत बाळ बाहेर आलं तर? माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह बघून नर्स हसली. म्हणाली “घाबरू नकोस. लवकर येतील डॉक्टर.” आणि खरच डॉक्टर आले. मला म्हणाले “चला आता जास्तीत जास्त दहा मिनीट. कळ आली की मगच जोर द्यायचा तोपर्यंत रिलॅक्स. नाहीतर दमशील.”
मला एव्हढं दुखत होतं की कळ नेमकी कुठली हेच कळत नव्हतं. आधी केलेले श्वसनाचे प्रकार वगैरे त्यावेळेला आठवत नव्हते. ह्या सगळ्यात ९:१५ वाजले पण बाळ काही येत नव्हतं. मी आता दमायला लागले. डॉक्टर त्यातही विनोद करत म्हणाले “बाळ लबाड आहे. हनुवटीच्या खाली दोन्ही मुठी घेऊन बसलंय. व्हॅक्युम लावा. पाच मिनीट. तुला कळणार पण नाही. बरं नवऱ्याला बोलवायचंय का?”
व्हॅक्युम म्हटल्यावर मला “३ ईडियट्स” आठवला. मी एवढी पॅनिक त्यात माझा नवरा आला आत तर माहित नाही काय होईल म्हणून मी नको म्हटलं. ह्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की “आता मी व्हॅक्युम लावतोय.” म्हणजे नेमक त्यांनी काय केलं हे मलाही कळलं नाही. पण खरंच मला कळलंच नाही बाळ कधी बाहेर आलं. मला डायरेक्ट त्याचं रडणं ऐकू आलं. मी खुश होऊन विचारलं “मुलगी आहे ना?” डॉक्टर म्हणाले “नाही. मुलगा” मी जरा हिरमुसले. मला आणि माझ्या घरच्या सगळ्यांना मुलगी हवी होती.
ठीक आहे हेल्दी आहे ना मग झालं तर. बाळाची नाळ कापली. मग डॉक्टर म्हणाले “तुझ्या गाऊनची वरची दोन बटणं उघड. फिड नको करू. नुसतं घे त्याला.” ते नुसतं पुसलेलं. चिकट, गुळगुळीत, अजूनही आईच्या पोटात असल्यासारख्या अवस्थेत, कापसाचं पोतं डॉक्टरांनी माझ्या अंगावर ठेवलं. स्कीन टू स्कीन. मी त्याला जवळ घेतलं. ते चळवळं बाळ एकदम शांत झालं. आणि मी सुद्धा. माझ्यासाठी जग तिथेच थांबलं.
Freeze.