Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

पिंड - डॉ.माधवी वैद्य

$
0
0

खूप खोल जाऊन वाचायला हवी ही कथा...मी डॉ. माधवी वैद्य ह्यांच्या नुक्कडवरच्या प्रेमासाठी ऋणी आहे...

विक्रम

पिंड - डॉ.माधवी वैद्य

आज तिचा तेरावा. दिवस काय झपाझप जातात नाही का? तिला या जगाचा निरोप घेऊन बारा दिवस झाले? खरंच वाटत नाही. तिची ती गोरीपान गोरटेली मूर्ती आजही तशीच डोळ्यासमोर उभी राहते आहे. माझाच नाही तर साऱ्यांच्याच डोळ्यांना धारा लागलेल्या. सारेच साश्रु नयनांनी घाटावर जमलेले. साऱ्यांच्याच मनात तिच्या आठवणी जाग्या होत्या. तिला तिलांजली द्यायला सगळे आले होते. तिच्या तेराव्याचा विधी झाला की सारेच सुस्कारा टाकणार होते. साऱ्यांनाच थोडीफार सुटल्याची भावना होणार होती.

तेरावा म्हटलं ना तर कावळा या पक्ष्याविषयी एक अनामिक भीती मनात बाळगतच खरं तर घाटावर आलेले असतात. प्रत्येकाच्याच मनात तेरावा, कावळा, आणि त्यानं पिंडाला शिवणं या तिन्ही गोष्टी विषयीचं एक विचित्र गौडबंगाल मनात जागं असतच असतं. ही गोष्ट नाकारण्यात काही अर्थ नाही. तिला मात्र हा सारा पोरखेळ वाटायचा.

‘काही नसतं गं असं !’ ती म्हणायची. ‘सर्वच अंधःश्रद्धा, कधी सुधारणार आपण? देव करो आणि माणसं या अंधःश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडोत. पण मी सांगते, हे होणे नाही. या विळख्यातून आपण लवकर सुटणार नाही. उद्या मी गेले ना तर माझाही तेरावा जोरात होतो की नाही बघ !’

असंच काहीसं बोलून एक गडगडाटी हास्य. असं हास्य ती नेहमी फेकायची. लकब होती ती तिची. सारं आठवलं आणि माझ्या अंगावर सर्रकन काटा आला...

मी घाटाच्या पायऱ्या उतरून खाली गेले. सगळीकडे विचित्र शांतता होती. आणि जराशी कुजबुज. तिचा गरीब, सालस, शांत स्वभावाचा नवरा सोवळं नेसून, सर्व धार्मिक विधी पार पडून, तिची पिंड पत्रावळ घेऊन घाटावर आला. त्याला बघून पोटात खड्डाच पडला माझ्या. तिची अतिशय शांत वृत्तीची, शहाणी, समंजस, सर्वांनाच सांभाळून घेणारी तिची मुलगी, सर्व परिस्थितीवर शहाणी नजर ठेवणारा आणि सारी परिस्थिती सावरून घेणारा तिचा सदैव कर्तव्य तत्पर जावाई, तिला आई समान मानणारी, तिच्याशी जीवाभावाचं नातं जपणारी तिची सून, आजीवर अलोट प्रेम करणारी तिची चुणचुणीत नातवंड आणि तिच्या सारखच धडाडीनं वागणारा, काहीसा दरारा जागवणारा तिचा मुलगा, तिचे काही जवळचे नातलग, तिच्या काही जिवाभावाच्या मैत्रिणी सारे सारे जमले होते घाटावर, तिच्या शिवाय तिचा सारा गोतावळा बघण्याची कोणालाच सवय नव्हती.

सर्वांच्याच डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. तिच्या विषयीच्या आठवणी मनात जाग्या होत्या. आपल्या भावना अनावर होऊ नयेत म्हणून प्रत्येक जण दक्ष होता. बायकांनी पदर तोंडावर धरून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता, तर पुरुषही वारंवार रुमालाने डोळे पुसत होते. तेराव्याचा विधी एकदा यथासांग पार पडला की सारेच सुस्कारा सोडणार होते.

तिची आणि माझी तशी अनेक वर्षांपासूनची मैत्री. तिच्या आयुष्यातील सर्व सुख दुःख मला माहित होती आणि ती देखील माझ्या आयुष्यातील सर्व सुख दुःखाची, प्रसंगाची साक्षीदार होती. एकमेकींच्या परीचयांतील सर्व माणसं, सर्व प्रसंग, सर्व गोष्टी एकमेकींना अगदी बारकाव्यांसकट माहित होत्या. आम्ही अगदी मोकळेपणाने त्या एकमेकींशी बोलतही असू. खऱ्या अर्थानं आम्ही जिवाभावाच्या सख्या होतो, आणि आमचं हे सख्य हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय होता.

काही दिवसां पासून तर हे मैत्र अधिकच दृढ झालं होतं कारण माझ्या पतीचं नुकतंच निधन झाल्यानं तिचा आधारच मला धीर देत होता. ते गेल्या नंतर तर ती जणू माझी सावलीच झाली होती. प्रत्येक गोष्टीत तिचं मत घेऊन पुढे जायची जणू सवयच लागली होती माझ्या मनाला. अचानक हार्ट अॅटॅक आला त्यांना आणि त्याना माझ्या पासून किती तरी लांब घेऊनही गेला. मला निरपराध वाटायला लगले, खरोखर हिनंच सावरलं मला. नाहीतर पार कोलमडले असते मी....

त्यानंतर नियतीनं आज परत एकदा निराधार केलं मला. हा धक्का माझ्यासाठी जबरदस्त होता. जेव्हा माझ्यावर आभाळ कोसळलं होतं, तेव्हा हीच माझी सखी माझ्यासाठी धावून आली होती. बातमी कळताच क्षणाचाही विलंब न लावता माझ्या घराकडे धाव घेतली होती. ती मला भेटता क्षणीच माझ्या मनाचा बांध फुटला होता. मी माझ्या पतीची अखेरची इच्छा तिला सांगितली. त्यांची देहदानाची इच्छा! मी तिला म्हणाले,

‘देहदान करावं अशी फार इच्छा होती गं यांची ! फॉर्मही भरला आहे त्यासाठी आम्ही. पण हे कुणाला सांगू? कोण ऐकणार माझं? माझी काही कोणाला सांगण्याची हिम्मत नाही बघ आत्ता या क्षणी. काय करावं काही कळत नाही.’

ती तत्काळ मला म्हणाली होती,

‘त्यांची इच्छा होती, आणि तुझी? तुझी संमती आहे ?’

मी तिला म्हणाले, ‘अगं ! आम्ही दोघांनी फॉर्म भरला आहे नं !!’

ती म्हणाली होती,

‘मग झालं तर ! डोळे पूस बघू आधी, अगं ! मी करते नं तुला सारी मदत. अजिबात काळजी करू नकोस. मन घट्ट कर आणि उठ. मला तो त्यांचा फॉर्म दे. मी बघते काय करायचं ते. सर्व व्यवस्थित तडीस नेऊ आपण. आताच्या काळात असा विचार करणं हे पुरोगामी असण्याचं द्योतक आहे. आपण चांगले शिकले सावरलेले लोक. अशाच विचाराने वागायला हवं. अशा धडाडीनं कृतीतही आणायला हवं आपल्याला’

मी अंगात बळ आणून उठले. आणि तिच्या हातात ह्यांनी भरलेला देहदानाचा फॉर्म ठेवला.

ती उठली आणि पुढच्या तजवीजिला लागली देखील. आमच्या घरातल्या काही जणांचा विरोध असतानाही तिनं ह्यांची सारी उत्तरक्रिया पार पडली. धाडसाने वागली. ती तशीच होती. पुरोगामी विचारांची. धाडसी. आजही नेत्रदान करायला लोक पुढे येत नाहीत देहदान तर दूरच. आपली परंपरा आणि कर्मकांडच त्यांना श्रेष्ठ वाटते, तिला नव्हतं हे पटत. काही दिवसांनी परिस्थिती जरा स्थिरस्थावर झाल्यावर ती माझ्याकडे आली होती. मला म्हणाली,

‘ऐक नं ! माझाही नेत्रदान आणि देहदानाचा फॉर्म आपण भरून ठेवूया.’

आम्ही तिच्या म्हणण्या प्रमाणे दोन्हीसाठीही फॉर्म आणून घेतला. भरला. त्यावर तिने सही देखील केली. आणि तो फॉर्म तिनं माझ्याकडे सोपवला. म्हणाली,

‘किती छान वाटतंय म्हणून सांगू. आता नेत्रदानामुळे एका दृष्टीहिनाला दृष्टी मिळेल आणि देहदानामुळे कोणालातरी जीवन! माझ्या कुटुंबातल्या व्यक्ती जरा परंपरेला धरून विचार करणाऱ्या आहेत. त्या हे मानतीलच असं नाही. पण माझी मात्र अतीव इच्छा आहे की माझं हे नश्वर शरीर मरणोत्तर देखील कोणाच्या तरी उपयोगी पडावं. आत्मा वैगेरे सगळं बोलतो आपण. पण ते सारं आपल्या आकलनाच्या बाहेरचं ग! आपल्या दृष्टीनं या देहाच्या फक्त दोनच खऱ्या स्थिती, आपण आहोत आणि आपण नाही आहोत. बरं ते जाऊ देत... हे बघ, अत्यंत विश्वासानं मी हा अर्ज तुझ्या हाती सोपवते आहे. मी तुला साथ दिली आता तू मला साथ दे. देशील नं ?... अगं वेळ आली तर गं...! इतकी कावरी बावरी इतक्यातच कशाला होतेस? खूप वर्ष जगणार आहोत गं आपण. आणि खूप वर्ष एकमेकींना साथही देणार आहोत आपण. होय ना? तुझ्यावर ही कामगिरी सोपवते आहे कारण तुला माहित आहे, माझा नवरा फार गरीब स्वभावाचा आहे ते... म्हणून तो जरा हडबडला तर तू पुढे हो. माझी अखेरची इच्छा पुरी करायला...’

मी अवाक राहिले बघतच राहिले तिच्याकडे. आपल्या एका कमकुवत मैत्रिणीवर खूप मोठी जबाबदारी टाकत होती ती....

घाटावर सर्व विधी पार पडत होते. आणि माझ्या मनातली तिच्या बद्दलचं कर्तव्य पार न पडता आल्याची भावना प्रबळ होत होती. त्याचं झालं असं की ती गेल्याची वार्ता माझ्या पर्यंत उशीर झाला होता. मी तिथे पोचे पर्यंत तिच्या मृतदेहावर सर्व तिला घरातून उचलण्या आधी करायचे ते सारे सोपस्कार पूरे देखील झाले होते, हिरवी साडी, कपाळावर मळवट, तोंडात ते तुळशीच पान कोंबलेलं... मला ते दृश्य बघवेना. तिचे बोलही घुमायला लागले त्या अवस्थेत, माझ्या मनात. कोणाच्या तरी मृत्यूनंतर आम्ही गेलो होतो, अखेरचं दर्शन घ्यायला. त्या प्रेताच्या तोंडात कोंबलेलं ते तुळशीचं पान बघून ती ताबडतोब म्हणाली होती,

‘काय बाई एकेक प्रथा ! माझ्या बाबतीत कोणी काही असलं केलं ना, तर थू थू करून फेकून देण्यासाठी तरी एक क्षण जिवंत होईन मी!’ मी तिच्या दंडाला बारीकसा चिमटा काढून तिला गप्प बसवलं होतं. आता मला वाटत होतं की एक क्षणभर तरी तिने त्यासाठी उठावं... पण कसचं काय, ती आता उठणार नव्हती. हे सार बघितल्यावर माझ्याही मनानं कच खाल्ली. शेवटी व्हायचं तेच झालं. नाही करू शकणार आपण तिच्या मनासारखं. ती तरी कशी अशी? एकदम कणभरही कल्पना न देता जग सोडलन तिनं! काही आजार नाही, कोणते उपचार करायला संधी न ठेवता इतक्या दूर निघूनही गेलीर्वांना सोडून! काही उपचार करूच शकलं नाही नं कोणीच... आत्ता या क्षणी तिचा देहदानाचा अर्ज कसा ठेवायचा साऱ्यांसमोर?

ती परिस्थिती पुढे अगतिक झाली होती. तिला स्वतःचा रागही येत होता. वाटत होतं, आपणही कच खाणारेच निघालो, तिच्या नवऱ्यासारखे, तिचा देह दानाचा अर्ज तिच्या पर्स मध्येच होता. मनाच्या या अश्या विचित्र परिस्थितीत तेरा दिवस कसे निघून गेले ते तिला कळलं नाही. आता एकच गोष्ट हातात होती तिच्या पिंडाला नमस्कार करून त्याला तिलांजली देणे आणि तिची क्षमा मागणे. तिच्या पिंडाला कावळा शिवण्याची वात बघत रहाणे.

किती वेळ झला होता पिंड ठेवून, एक मेला कावळा त्या पिंडाला शिवायला तयार होत नव्हता. वेळ चुकली होती का पिंड ठेवण्याची? सगळे कावळे पिंड खाऊन तृप्त झाल्यावर मग हिचा पिंड ठेवला गेला की काय? तसंच असावं. तृप्त झालेल्या क्षुधे नंतर कसे खातील ते कावळे हिचा पिंड? त्यांचंही बरोबर आहे. आपण तरी जेवू का डबलदा? तिच्या घरातल्या लोकांनी पिंड करताना आंबेमोहर तांदूळ वापरला होता की साधा? कोणास ठावूक? इतकं बरीक खरं, तिला पहिल्या वाफेचा आंबेमोहर तांदळाचा भात फार आवडायचा, तिच्या अशा बारीक सारीक आठवणी, तिच्या स्वभावाच्या साऱ्या लकबी तिला आठवत होत्या. नेहमी म्हणायची ती तिला,

‘तू अशीच ग, विचार करत बसणारी नुसती, जरा धाडस कर ना ! आपल्या मनातलं केव्हा व्यक्त करणार तू मोकळे पणाने? किती दिवस अशी आपल्या मनात कुढत बसणार आहेस? अगं ! कधीतरी धाडस दाखव, आपल्या मनासारखं घडवून आण !’

‘नाही गं, नाही जमलं ते, माझ्या बाबतीत ठीक आहे गं, पण तुझ्या बाबतीत माझ्या हातून असं घडायला नको होतं... मी तुझी अक्षम्य अपराधी आहे.” माझ्या मनाची टोचणी वाढतच होती.

तिच्या पिंडाला कावळा काही शिवत नव्हता. अगदी जवळ येऊन बसायचा, पण टोच न मारता उडून जायचा. सारेच जरा कंटाळल्या सारखे झाले होते. मनातल्या मनात कावळे महाराजांची आळवणी करत होते. तिच्या ज्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या असतील तर त्यांचं स्मरण करून त्या पूर्ण करू अशी आश्वासनं मनातल्या मनात देऊन बघत होते. पिंडाला कावळेबुवा काही शिवत नव्हते तिच्या. आता काय करायचं? साऱ्यांच्याच समोर एक यक्ष प्रश्न उभा ! शेवटी गुरुजींनी एक उपाय सांगितला, म्हणाले,

‘काही नाही आता एकच उपाय ! दर्भाचा कावळा करूयात संमती असेल तुमची तर!’ गुरुजी परत वर पायऱ्या चढून गेले, दर्भाचा कावळा करायला. तरी सुद्धा सारेच नातेवाईक आपापल्या परीने तिच्या मनातल्या अपुऱ्या इच्छांची उजळणी करून काहीबाही आश्वासनं देतच होते. न जाणो एखादा वेळ चटकन कावळा शिवायचाही!

माझं मन मात्र आतून खदखदत होतं. पर्समध्ये ठेवलेला तिच्या देहदानाचा फॉर्म मी सारखा चाचपडून बघत होते. माझ्या डोळ्यातून अखंड अभिषेक तिच्या आठवणींवर चालूच होता. आणि अचानक मला काय झालं कळलं नाही. माझ्या अंगातून एक उर्मीच सळसळून गेली. मी अचानक कोणाची भीडभाड न बाळगता सात्विक संतापानं पण त्वेषानं ओरडले,

‘थांबवा हो हे सारं, थांबवा... कृपा करून थांबवा... हे, हे सर्व क्रियाकर्म तिला अजिबात पसंत नव्हतं. मनातून कधीच....या सर्व कृत्याबद्दल खरं तर उबगच होता तिच्या मनात. तशी पुरोगामी विचारांची होती ती.. तिनं देहदानाचा फॉर्मही भरला होता नं, हा पहा माझ्या जवळ आहे तो. माझ्या देहदानासाठी तू हा फॉर्म माझ्या पतींजवळ सोपवशील असं वचन घेतलं होतं तिने माझ्या कडून. मी तिची इच्छा खर तर पुरी करायला हवी होती. पण नाही करू शकले. शतश: अपराधी आहे मी तिची. म्हणूनच मनापासून क्षमा मागत हा फॉर्म आता तिच्या पिंडाजवळ ठेवते. आता इतकच आहे माझ्या हाती.’

सारेच माझ्या बोलण्याने आवक झाले. मी पुढे झाले, तो फॉर्म तिच्या पिंडाजवळ ठेवला, क्षमा मागितली तिची आणि काय आश्चर्य ! पिंडाला कावळा शिवला.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>