Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

प्रिय आजीसं - तृप्ती कुलकर्णी

$
0
0

मित्रानो मी प्रयोग करीत असतो...कारण आपले लेखक ते करीत असतात...मी स्वतंत्र काहीच करीत नाही...आज एक पत्र मी फिरस्ती मध्ये पोस्ट करीत आहे...

विक्रम

प्रिय आजीसं - तृप्ती कुलकर्णी

निळशार आकाश, गर्द हिरवी झाडी, छोटे छोटे आणि वळणावळणाचे रस्ते लाल माती आणि जोडीला निवांतपणा अशा वातावरणात आमची मस्त भटकंती चालू होती. आणि अशातच एका पाऊलवाटेवर तू आम्हाला दिसलीस. अगदी सहज आपली नजरानजर झाली आणि आपण एकमेकांकडे पाहून हसलो. नऊवार साडी, डोक्यावरून घेतलेला पदर, कमरेतून वाकलेली, चेहराभर दुधाच्यासाई सारख्या सुरकुत्या, छोटा अंबाडा, हातात दोन काचेच्या बांगड्या, गळ्यात कसला तरी धागा आणि अनवाणी अशी तू दिसलीस. चालता चालता दम लागला कि तू कमरेवर हात ठेवून चालायचीस. जवळपास ५-१० मी. तरी आपण चाललो सोबत. तुझ्या चेहऱ्यावरचे दमलेले भाव मी कधीच टिपले होते. मनातून तुझ्या बाबत विचार करत होते, आणि तेवढ्यात तू माझ्या समोर आलीस आणि मला म्हणालीस,

" ताई सामान आहे का काही? मी येते सोबत ते घेऊन, मला हमाली द्या."

मी फ़क़्त तुझ्याकडे पाहिलं मला खूप अपराध्या सारखं वाटलं. मी तुला म्हंटल,

"आजी अहो, तुम्ही हे हमाली काम काय करताय? तुम्हाला स्वतःला चालवत नाहीये" .

एक उदास हसू तुझ्या चेहऱ्यावर आलं,

"काय करू ताई भिक मागायला लाज वाटते म्हणून काम मागते आणि पोट भरते मला दुसर कोणी नाही नवरा गेला, तरणी लेकही गेली मी एकटीच राहते, आसरा मिळेल तिथे, जमेल ते काम करते. त्याने जन्म दिलाय तोच ताकद देईल. त्यासाठी हसतमुखाने जगायच."

मी तुला नुसते पैसे देवू केले तू नाकारले पण मी तुला मी तुमची नात आहे असं समजून घ्या म्हणाले मग बऱ्याच वेळाने तू पैसे घेतलेस, पोटभरून आशीर्वाद दिलास आणि गेलीस. पण याही वयात स्वकष्टान जगण्याची तुझी जिद्द मला खूप काही शिकवून गेली.

तसं तुझ आणि माझ काही नात नाही रक्ताचं पण शहरातली भिक मागणारी तरणी ताठी पहिली की तुझी आठवण येते. आणि जर मनासारखं झाल नाहीतर आत्महत्या करणारे पाहून त्यांची कीव येते. या गोष्टीला दोन वर्षे झाली पण अजूनही मी तुला विसरले नाही. तुझं आयुष्य कधी तुला ओझं झालं नाही म्हणून कदाचित तू जास्त वर्ष आनंदाने जगत असावीस. आणि इतरांना जगण्याचा आदर्श देत असावीस.

तू आता कुठे आहेस आणि आहेस कि नाही तेही काही माहीत नाही पण माझ्या मनात मात्र तू आहेस. आणि म्हणून तुला हे पत्र लिहील. माझ्या भावना खऱ्या आहेत त्यामुळे त्या नक्की तुला पोहचतील.

तुझी एक नात

तृप्ती


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>