कधी कधी फक्त विरोध करून भागत नाही...तर कणखरपणे भूमिका घेऊन काही त्याग सुद्धा करावाच लागतो...
विक्रम
समानता - प्रा. स्वाती धर्माधिकारी
"मग येणार ना लेक्चरसाठी?"
"अं...हो ...हो ...एक मिनिट, काय हो तुमच्या कॉलेजचे प्राचार्य कोण आहेत "? माहित असूनही खात्री करण्यासाठी मुग्धाने फोनवर बोलणाऱ्या प्राध्यापक बाईन्ना विचारला प्रश्न
'जोशी"!
"अच्छा ...ते पण असणारेत का "? …
"अहो असणारेत का काय म्हणताय, त्यांनीच तर तुमचं नाव सुचवलंय, मागच्या दोन तीन वर्षां पासून त्यांना तुम्हाला बोलवायचं होतं, पण काहीतरी कारणांनी फिसकटत गेलं"
"हं ठीक, मी तयार असेन साडेदहाला .."
"हो म्याडम आमची गाडी येईल घ्यायला तुम्हाला" .
नंतरचा आठवडा धामधुमीत ...उद्यावर येऊन ठेपलं भाषण , रात्रभर जागून "बेटी बचाव बेटी पढाव" वगैरे संदर्भात सुशिक्षितांची भूमिका यावर प्रेझेन्टेशन केलं तयार! इंजिनियरिंग कॉलेज मध्ये हा विषय मांडणं म्हणजे कसरतच! सरकारच्या घोषणा बरहुकूम कार्यक्रमांची नावं कशी बदलतात ना? तिला मौज वाटली, मागच्या काही वर्षांपूर्वी दुसरीच घोषणा .....आता या वर्षी काय तर तिसरीच घोषणा "pledge for parity" !!!
कॉलेजच्या गाडीतून जातांना मागे जाणाऱ्या झाडांसोबत मन ही मागे मागे गेलं .....
"का? काय कमी आहे मुलात? का नको म्हणतेय तू सांग ना पण? अगं, चांगला इंजिनिअर आहे ...वडील देखील चांगल्याच पोस्टवर होते ...घरदार आहे, शिवाय काही जबाबदारी नाही , ..."
आईचे प्रश्न संपत नव्हते, बाबा खट्टू झाले होते ,
'एकाच शहरात राहील, डोळ्यासमोर! खानदान चांगलं ...नावाजलेले वडील ..पोराचं रंग रूप सारंच उजवं ...तरीही... ही का नाही म्हणतेय कळेना! ती ही ठाम राहिली मतावर ...नकार दिला चक्क .... ते दुमजली घर, समोरचं बदामाचं झाड असलेलं मस्त थंडगार सावलीवालं अंगण तिचं झालं असतं . पण ...त्यांनी खूप प्रयत्न केले तिच्या करता. वीस मिनिटात गाडी कॉलेजच्या भल्या मोठ्या आवारात शिरली. तिला रिसीव्ह करायला तो स्वतः आलेला एक दुखरी ओळख फक्त डोळ्यांत बाकी तोच स्मार्ट ..रुबाबदार पेहराव .. केबिन मध्ये चहापाण्याची खातीरदारी होत असतांना तिने, त्यानी डायरेक्टर म्हणून मिळवलेली सर्व कौतुकं थंड डोळ्यांनी टिपली .
तिच्या गुलाबी रंगाच्या साडीची एक छटा तिच्या गालांवर उमटलीय असा त्याला उगाच भास झाला ....ती चमकली त्या नजरेनी, 'अजूनही .. ' ? "सुश्रुने मुद्दाम दुसरा विषय काढलाच …
".उं ...हो मला वाटतं मी आलो होतो एकदा तुमच्याकडे जयच्या वाढदिवसाला सुश्रुत आलेला ...त्याला उशीर झाला म्हणून न्यायला आलो होतो " …
तिला आजही हसू आलं ...उशीर!! .....हो रात्रीचे साडेआठ असावेत ...मनात आलं, केव्हढी काळजी होती तेंव्हा त्याच्या मनात जणू काही जंगलातच होता .....! .हे मनातच,...बाकी अस्वस्थ शांतता ....तयारी झाल्याचा निरोप आला आणि दोघंही सभागृहाकडे निघाले ...तिच्या अस्खलित सटीक भाषणानंतर प्रश्न उत्तरं देखील झाली .... सर्वांना उत्तरं पटली हे विशेष !
अध्यक्षीय भाषणात बोलतांना डायरेक्टरसाहेब म्हणालेच की
"आम्ही देखील आमच्या घरी समानता पाळतोच ...पत्नीला मी म्हटलंय की सगळं स्वातंत्र्य देतोय आम्ही तुला ...घर सांभाळून ...खुशाल काहीही कर ....पण आम्हांला स्वैपाक नको करायला लावूस .काय आहे न, आपापले रोल्स सांभाळून असावं नाही "?
त्यानी तिच्याकडे अनुमोदनाच्या अपेक्षेनी बघितलं ....ती ऐकूनही निर्विकारच राहिली ...त्याच्याच एका विद्यार्थिनीनी धीटपणे हात वर करून अध्यक्षांच्या पदाची माफी मागून म्हंटलं ......
."सर, माफ करा .स्वातंत्र्य कुणी कुणाला देत असेल तर ते खरंच स्वातंत्र्य असेल? आणि स्वयंपाक केवळ स्त्रीची जबाबदारी आहे का?आम्ही इंजिनिअर झाल्यावरही हेच करणे तुम्हांला अभिप्रेत असेल? .तसं असेल तर मला प्लीज टीसी द्या...हे कॉलेज सोडायचे आहे मला?"
आयोजकांची तारांबळ उडाली, त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर संतापाचा लाल रंग अधिकच जर्द वाटत होता .......
तिने..शांतपणे टेबलवरची बिसलरी उघडली .....थंड पाण्याचा घोट तिला ..आत आत श्रांत करत गेला!