स्वाती चांदोरकर ह्यांची ही कथा...जगाचा न्यायचं असा उफराटा असावा का?
विक्रम
रबर पेन्सिल – स्वाती चांदोरकर
तिच्या सावत्र आईने तिला अनाथाश्रमात घातलं आणि ती निघून गेली. एकाएकी आलेलं हे पोरकेपण तिला उमाळे देत राहिला. पण ती शहाणी, तिने जाणलं की आता आपल्याला कुणीही नाही. आपण एकट्या आहोत.
मग ती आश्रमाचे नियम पाळू लागली. आश्रमाने शिक्षण दिलं, जितकं दिलं तितकं शिकली. ती मोठी झाली. आश्रमाची लाडकी झाली. कष्ट हेच तिचं जीवन होतं आणि तिने कष्टाला देव मानलं.
नशीब बदलत जातं. तिचंही बदललं. तिच्यासाठी एक स्थळ आलं. श्रीमंत नव्हतं, चाळीतला, एका खोलीतला संसार होता , पण तो तिचा स्वतःचा होता. ती आता अनाथ नव्हती. तिला नाव होतं, गळ्यात ओळख देणारा काळा मणी होता. कष्ट इथेही होते पण ते स्वतःच्या घरासाठी होते.
तिला दिवस गेले. एक गोजिरवाणा जीव कुशीत वाढू लागला. रांगू लागला, चालू लागला, आई हि हाक तिला आभाळ ठेंगणं करून गेली.
तो मोठा होत होता. शाळा सुरु झाली होती. त्याच्या वाढत्या गरजांना ती दोघं कमी पडू लागली. मग अजून कष्ट सुरु झाले. एकुलता एक जीव, त्याला नाही म्हणायचं नाही असा सर्वतोपरी प्रयत्न. पण त्या खोलीबाहेरचं जग फार मोठं होतं, आणि तिचे हात फार लहान होते, तोकडे होते. ती हार मानत नव्हती. पण पुरी पडत नव्हती.
नवीन पेन्सिल हवी, पाटी हवी, दप्तर हवं, रबर हवा....
त्याचा सकाळपासून एकच धोशा सुरु होता.
दारात सावली पडली. कोण? म्हणून ती बघू लागली आणि दचकली. सावत्र आई दारात उभी होती. ही इथे कशी आली? हिला पत्ता कुणी दिला? का आली आहे? विचारपूस करून सावत्र आई निघून गेली आणि तिला तिचं पोरकेपण आठवलं. ती कधी नाही ती रडू लागली. तो कावरा बावरा झाला.
“आई, मला नको काही. रबर नको, पेन्सिल नको.
ती म्हणाली, “आणू तुला पुढल्या महिन्यात..”
“कोण आलं होतं?” त्याने विचारल
“बाई होती”
“माझी आज्जी होती ना?”
“बोलायचं नाही तिच्याशी आजीबात. कधी आली तर घरात थांबायचं नाही. ती वाईट बाई आहे. तुला पळवून नेईल. समजलं?”
“हो.” आणि ती सावत्र आई पुन्हा आली. तिला बघून तो पळून गेला.
“तू येत जाऊ नकोस इथे.”
“खूप पैसे आहेत आता माझ्याकडे. तुझे बाबा वारले, आणि मी एकटी पडले. मला मुल नाही झालं. तूच माझी मुलगी आहेस. मी वाईट वागले तुझ्याशी. माफ कर.”
“जमणार नाही. तू जा “
सावत्र आई बाहेर पडली, निघून गेली. तशी तिला बरं वाटलं. त्याने तिचं ऐकलं, तो घरात थांबला नाही, तिला समाधान झालं.
“आई, आज्जी गेली”
“माहित आहे.”
“आज्जीने बघ मला काय दिलं...रबर, पेन्सिल.. आज्जी चांगली आहे. तू तिला वाईट का म्हणतेस? आता ती आली की मी नाही बाहेर जाणार. घरातच रहाणार. ..मग अजून रबर, पेन्सिल मिळेल. नवीन...
ती चकित झाली, ती हरली, आत्तापर्यंतच्या तिच्या कष्टांना तिच्या सावत्र आईने फक्त रबर आणि पेन्सिलीने खरेदी केलेलं होतं.