माझ्या डोळ्यातून एक आनंदाश्रू वाहिला...मृणाल जियो....
मुरलेलं लोणचं – मृणाल वझे
दुसरा मजला....
फक्त 3 च फ्लॅट ....एक माझा ....2 खरेकाकांचे!
एक नाना ताईंचा ....एक त्यांच्या सुनीलचा!
खूप छान आहे त्यांचे नाते ! कधी एकत्र कधी वेगळे! स्वतःचे स्वातंत्र्य जपणारे..... ! नाना ताई थकले आहेत, त्यामुळे आता मधलं दार कायमचंच उघडलं गेलय! माधवी नाना ताईंच..... कधी आई वडिल तर कधी सासुसासरे या नात्यानं करत असते. फार भांडी लागत नाहीत एकमेकाला! दोघांनाही कळून चुकलंय ते!
आता आवाज येतो तो फक्त नाना ताई मधल्या वादाचा! नाना ताई.... वय 85 आणि 82 !! त्यामुळे कायम अनेक वर्षात दिसलेल्या दुखऱ्या गोष्टीचाच उल्लेख....त्यात आता वय वाढत चालल्याने नानांची जेवणाची मारामार..... मग ताईंची आरडा ओरड....!काहीवेळा तो वाद पराकोटीचा! मग उपवास ... मनधरणी... सगळं ठरल्याप्रमाणे!!!
जरा आवाज चढतो... मग नानांना आलेली उबळ आणि ताईंचे त्यांच्या पाठीवरून हात फिरवून पाणी देणे... आता रोजचेच!! मला रोज बाहेर पडताना त्यांची खिडकी हमखास समोर यायची . हाक मारल्याशिवाय पाऊल पुढे पडत नसे. कधी नाना तर कधी ताईंचा तक्रारीचा सूर ऐकू यायचा.... एकमेकांबद्दलचा !
कालचा दिवस खास होता...
नानाताईंच्या लग्नाचा 60 वा वाढदिवस! सकाळी घाईघाईत खिडकीत डोकावले. दोघंही शेजारी शेजारी बसलेली! खुसू खुसू हसत होती. मला जरा नवलच वाटले, पण संध्याकाळी येते असे सांगून मी पटकन पायऱ्या उतरले. संध्याकाळी ताईनां आवडणारा गजरा... नानांची आवडती जिलबी आणि नानांना आवडणारं dark चॉकलेट घेऊनच त्यांच्या घरात शिरले.
सकाळसारखेच दोघे खूप आनंदी होते.
मी विचारलं,"आज काय प्रेझेंट एकमेकाला???"
किती गोड उत्तर मिळाले मला लगेच!
मी आणलेलं डार्क चॉकलेट त्यांनी उघडलं आणि हळूच एक तुकडा ताईपुढे धरला. डार्क चॉकलेटचे शत्रू असणाऱ्या ताईंनी हसतहसत तो तोंडात घातला.
नाना म्हणाले हे तिच्याकडून मला!!!!
ताई म्हणाली , "अग ,आज नाना व्यवस्थित जेवले. मी सांगितलं ते खाल्लं" आज ठरलंच होते आमचं तसं... एकमेकांसाठी!!!
काय मुरलेय ना लोणचं... असं पुटपुटत मी मान वळवून एक अश्रू वाहू दिला..