इतके सुस्पष्ट आणि चोख शब्दचित्र विरळा...केवळ उत्कृष्ट शब्द्चित्रासाठी ही कथा वाचायला हवी. सगळ्यांसाठी हा एक धडा आहे.
संसार - विनया पिंपळे
सांजवेळेचं सावळेपण आकाशाच्या सर्वांगावर पसरताना दुरून धूळ उडवत येणारे गाईगुरांचे कळप दिसू लागतात. दिवसभर वावरातल्या उन्हात राबून आलेल्या थकल्या भागल्या आयाबाया एका हातात सरलेल्या शिदोरीचं पालव धरून दुसऱ्या हातानं डोक्यावरची मोळी सावरत असतात. त्यातल्याच एखादीजवळ पालवाच्या गाठोड्यात तुरीच्या शेंगाची हिरवीगार दाटी कोंबलेली असते.आपल्या गाडीची वाट पाहत शाळेच्या ओट्यावर बसलेलो आपण तिच्या नजरेस पडलो तर स्वतःला थांबवत ती म्हणते-'शेंगा नेता का मास्तरीणबाई?…'
तिच्या साध्या सरळ निर्हेतुक प्रेमळ भेटीला आपण नाकारुच शकत नाही. आपण 'हो' म्हणायचा अवकाश की ती आपलं गाठोडं आपल्यासमोर मोकळं करणार हे ठरलेलं असतं. गाठोड्याच्या तोंडाची गाठ सोडताना डोक्यावरची मोळीही ती सहजतेने पेलत असते. एखाद्या ओझ्याची वर्षानुवर्ष सवय झाल्यावर त्याचे असणे जाणवूच नये इतक्या तिच्या शरीर संवेदना बोथट झालेल्या असाव्यात असं आपल्याला उगाचच वाटू लागतं. मनात येणाऱ्या असंख्य जाणिवांना थोपवत सहजपणे तिच्या पालवातल्या शेंगांची आपल्या हातात आलेली हिरवाई आपण पर्समध्ये कोंबावी आणि तितक्याच सहजतेने तिला विचारावं- "यंदा तूर बरी आहे वाटते वैनी?"… आपल्याकडून प्रश्नाच्या निमित्ताने वाढणाऱ्या संवादाची वाट बघत असलेलं तिचं मन हळूच तिच्या मनात साचलेल्या कितीतरी गाठोड्याच्या गाठी सोडू लागतं. ती स्वतः मोकळी होऊ लागते...
"काय सांगू माय! औंदा पावसानं लै घोर केला...वाट पाहू पाहू डोये फुटले पन पानी काई जसं पायजे तसं आलं नाई...सोयाबीन काढाच्या वक्ती मातर थांबता थांबेना. समदं सोयाबीन मातीत घातलं. आता कर्ज कसं फेडाव?… पावसानं तूर जरा सुदी हाये...पन काय खरं हाये तरी..? हरनं, माकडं, ढोरं लै नुसकान करतेत. येच्यातूनय पीक वाचलं तं भाव भेटला पायजे..." - असं म्हणून ती मन रितं करते आणि वेगवेगळ्या काळज्यांनी भरलेल्या तिच्या जगाचे दर्शन आपल्याला घडू लागते-
"औंदा बालीच्या लग्नाचा इचार सुरू हाये. लै पावने येऊ लागले..." असं सांगताना लग्नाचं वय झालेल्या पोरीचा चेहरा डोळ्यासमोर येऊन काळजीने भरलेला तिचा आवाज आपल्याशी पुढे बोलू लागतो- "नवकरीवाला नवरदेव पाहाची काई हैस्यत नाई आमची. पोरगी लै सुधी हाये पन लोकाले पैशे पायजे. अवं दोन एकरावाल्याले साठ हजार हुंडा पायजे. लैच लै तीसचाळीस हजार देता यीन आमाले. बालीच्या बाबाले म्या मनलं बजेटात बसला एखादा नवरदेव तरच बालीचं लगन उरकून देऊ .. लै दिस पोरगी घरात ठेऊन काय करता. ज्याची त्याच्या घरी गेलेली बरी...पन नाईच जमलं तं थांबू एखादं वरीस."
तिचं सगळं ऐकून घेताना 'बजेटातला नवरदेव' याठिकाणी आपल्याला अडकायला होतं खरं...पण पिढ्यानपिढ्या एका ठ