हे एक चांगले रूपक उमेशने उभे केले आहे. तो सतत प्रयोग करीत असतो...नवी वाट शोधत असतो....
ऐलतीर पैलतीर - उमेश पटवर्धन
मी होतोच ऐलतीरावर. पैलतीरावरच्या लोकांना पाहत. बऱ्याचदा वाटायचं किती भाग्यवान आहेत पैलतीरावरचे सशक्त लोक. ऐलतीरावरून पैलतीर गाठलेले. कित्येक तर पैलतीरावरच जन्माला आलेले..
पैलतीरावरचे काही सशक्त, भाग्यवान लोक पैलतीरावरच्या दुबळ्या अभागी लोकांकडे कणवेने पहायचे. कधी कोरडेपणाने तर कधी डोळ्यात खोटे.. खरे अश्रू आणून.
मग मीही पैलतीरावर जाण्याचा निश्चय केला आणि प्रवाहात उडी घेतली. काय काय नव्हतं त्या प्रवाहात? वंशभेद, जातीभेद, स्पर्धा, नकार, उपेक्षा.. सर्व सर्व..
आज पैलतीरावर पोचल्यावर हायसं वाटतं आहे. आपण या जीवघेण्या प्रवाहात कसे टिकलो याचे आश्चर्य वाटत आहे. पण अखेर पैलतीरावर पोचलो याचे समाधान आहेच.
आता मी ऐलतीरावरच्या दुबळ्या आणि अशक्त लोकांना पाहतो.. मीही आता त्यांच्याकडे बघून कधी खरे, कधी खोटे अश्रू ढाळायला चालू केलं आहे..
- उमेश पटवर्धन