नुक्कड म्हणजे काय? ह्याचे उत्तर आहे ही कथा....वर्षा चोबे...जियो!
कापडाची भिंत - वर्षा चोबे
दंवभरली पहाट उगवली अन् मी मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडले हीच एक वेळ माझी माझ्यासाठी. रोजच्याच वाटेवर ओळखीच्या खुणांमधे नवं काहीतरी शोधत माझी नजर जागृत,चौकस.मेनरोडवर जरासं दूर जाताच रस्त्याच्या कडेला एक भटकं कुटुंब गाठोड्यांवर कलंडून झोपी गेलेलं.सहजच कुतुहल चाळवलं. कोण असतील? रस्ता मात्र निश्चिंत अशा आस-यांची त्याला माहेरसयच!
दुसऱ्या दिवशी पासून सवयीनं माझी चौकस नजर येता-जाता त्यांच्या संसारावर फिरत होती.'हे विश्वचि माझे घर; या संकल्पनेनं काठ्या आणि मोठं प्लॅस्टीक यांच्या साह्याने तुंबलेल्या नालीच्या काठावर झुग्गी उभारुन कापडाच्या आरपार भिंतींच्या आत ते गुरगुटून झोपलेले. माझ्याच मनात सरपटणारं जनावर आणि इतरही दोन पायांची हिडीस जनावरं येऊन गेली.लगेच स्वतःला सावरुन मी पुढे गेले.एखाद्या अनोळखी गोष्टीशी सुध्दा असं कसं नातं जुळतं ना!
बरेच दिवस वेगवेगळ्या प्रहरी न्याहाळणं सुरु होतं परतताना जाग दिसायची.मळकी विटकी घागराचोली घातलेल्या दोन स्त्रिया. पैकी एक काटक उंच बांध्याची वृध्दा चेहऱ्यावर गोंदण पायात चांदीचं कडं पिंगट पांढ-या केसांचा छोटासा बुचडा, डोक्यावरुन ओढणी घेतलेली पहाडी आवाजाची ती जरा खमकीच वाटली. दुसरी काळी सावळी मध्यम बांध्याची.गोंदणा व्यतिरिक्त विनालंकृत साध्या वेणीतली ती गरीब गाय डोक्यावरची ओढणी सतत सांभाळणारी.दोन पुरूषांपैकी एक मळक्या धोतर अंगरख्यावर जीर्ण शीर्ण फाटकं कांबळं पांघरलेला पाठीतून वाकलेला वृध्द वारंवार खोकल्याच्या उबळीनं ग्रासलेला तरी बिडीचा धूर छातीत कोंडणारा, मनात येईल तेव्हा बसल्या बसून झाडू लावणारा.दुसरा तरुण संसाराचा भार तोलणारा खालून काठ कुरतडलेली पँट त्यावर रंग ओळखू न येणारी टिशर्ट घातलेला.चार पोरं, मोठी नऊ वर्षांची तिच्या खालील तीन भावंड. एवढंच कमी म्हणुन की काय,एका छोट्या बेवारस कुत्र्याच्या पिलाला पोरांनी आपल्यात सामावून घेतलेला.
ऋतू कातडीवर झेलणारी ती फाटक्या अधू-या कपड्यातली नात नातू मंडळी कधी शेकोटीभोवती दादीसोबत तर कधी खोक्यातल्या मातारानीला हात जोडताना दिसत.त्यांच्याशी संवाद साधावा अशी उर्मी येई..पण....! एक दिवस मनावरची ही पण; झुल उतरवून मी गेले गुबगुबीत टेडी,मंकी बरेच प्रकार मांडलेले तसेच झाडावरच्या दो-यांना टांगलेले होते. या गुबगुबीत सुंदर निर्जीव खेळण्यांमागची ती बारकी मळकी पोरं दगड माती घेऊ झुग्गीमागच्या नालीतील घाण उचकणा-या डुकरांना हुसकून लावत माती गोटे कच-याशी मनसोक्त खेळत होती मी कुशन्स घेतल्या आणि तिच्याशी थोडाफार संवाद साधला.मीणाचं कुटुंब म्हणजे राजस्थानातून पोट हाती घेऊन आलेले फिरस्ती लोक. काही भेटीतच माझी भीड चेपली कलत्या दुपारी मी पोरांसाठी खाऊ घेऊन जाऊ लागले.उघड्यावरच्या चुलीवर दिवस बुडण्याआधीचा तिचा भाजी भाकरी किंवा भाताचा रांधा सोबतच तिच्या संसाराचाही मोडजोड रांधा माझ्याजवळ उलगडू लागला.
मीणा ऐसी स्थिती में चार बच्चे? तिला माझा हिशेबी प्रश्न, क्या करते दिदी हमारी सास माणे खौलता दूध उणके सामणे किसीकी एक णा चलै है,और मरद को बार-बार कैसे णा बोल सकै है बताओ? इस वास्ते जैसी माताराणी की मर्जी; कापडाच्या आरपार भिंती पुढे आल्या. यापुढे ती हळूहळू उमजत गेली.
मीणाला न्हाणं आलं आणि झुग्गीतल्या रमेसशी खुल्या मांडवात लग्न झालं फक्त झुग्गी आणि कापडाच्या आरपार भिंतीचे संदर्भ बदलले बाकी फिरस्ती कायम.तळपायाच्या भोव-यागत नशीब जिथे नेईल तिथे जायचं.ना भविष्याची चिंता ना कुठलं रडगाणं ना कसली तक्रार देशातील कुठल्याच घटनांशी किंवा सरकारी योजना नियमांशी नोंदीशी दुरान्वयेही संबंध नाही.आला दिवस हातावर पोसायचा उपास-तापास ठरवून करायचे नाहीत इतकंच. झुग्गीतच जन्माला आलेली पोरं जी परिस्थितीशी झगडून जगू शकत होती ती जगली कमजोर होती ती मातारानीकडे परतली. साधा हिशोब. आओ दिदी, बहोत दिनो बाद आए माझ्याशी बोलताना मीणाचा डोक्यावरचा पल्लू खांद्यावर आला तशी दूर बसलेली सासू कडक नजरेनं बघत तरतर सुनेजवळ आली एक जोरदार शिवी हासडत तिच्या कानशीलावर पाची बोटं खडकवली अन् निघून गेली. तिनं पल्लू ठिक करत काही शब्द गिळले. त्यामागची पार्श्वभूमी तिने पुर्वी सांगितली होती,दुकानात एकटी बसली असताना पुरुषांच्या नजरा शरीरावरुन फिरतात मुद्दाम खालची खेळणी मागतील वाकून काढायला गेलं की डोकावणा-या छातीकडे टक लावून बघतील आपसात अश्लील बोलतील. उसदिन ऐसेही हुवा,तो सास और मरदने तू ही रांड है साली बोलके लकडी से भौत मारा पीटा,
उसदिनसे चोलीका बडा गला पिन लगाके छोटा की हुं तिच्या गाल आणि कानावर चांगलेच वळ उठले होते. पण तिच्या संवेदना? उघड्यावरच्या या जळीत सत्याने मनावर ओरखडा उमटवला. मीणानं पाण्याच्या हंड्यात तळात गेलेलं पाणी काढलं आणि एक घोट घेतला मीणा पिने का पानी कहांसे लाती हो? क्या बताए दिदी वो सामणेवाला दुकानदार साला भौत परेसान करता है बडी मुश्कीलसे मिठी मिठी बाते करके एक हंडी पानी भरने देता है फिर नहानाधोना? ती कसंनुसं हसली माह में एखादबार पानी मिल जाय तब रातमें छुपकेसे नहा लेते है..." अंधार ब-याचदा तिच्या मदतीला असा धावून येत असावा पहाटे कुठेतरी
आडोशात शौचास जातानाही... स्वच्छ शहर मोहीमेच्या छातीवर हा प्रश्न अनुत्तरीतच नाही का? मीणाशी झालेल्या मैत्रीने बराच पैल गाठला होता एकट्यात ती बरीच मोकळी होत असे.रोज उत्साहाने दुकानात बसणारी मीणा मलूल चेह-यानी बसलेली दिसली क्या हुवा मीणा? तबियत ठीक नही? तिनेसुस्कारा सोडला हां ऐसेही, बहोत पेट दरद देता है कई दिनसे सफेत पानीवाली तकलीफ है दिदी तो डॉक्टर के पास क्यों नही जाती? हुं, सबके पेट पालने है दिदी डाक्तर कहासे करेंगे ऐसेही झाडपत्ती ले लेते है बोलता बोलता
तिच्या ‘त्या’; चार दिवसातल्या आणि ब-याच न सांगता येणाऱ्या तक्रारी कळल्या. स्त्री आरोग्याची जनजागरण मोहीम अश्या अनेक मीणांच्या जाणीवांना कधी शिक्षित आणि समृध्द करणार ? अशिक्षित मीणा तिचा रोखीचा व्यवहार चोखपणे सांभाळत होती. त्यातलेच काही कलदार पदराशी बांधून बचतही करत होती.तिच्या कुटुंबासोबतच अशी कितीतरी कुटुंब पोटार्थी म्हणुन शहरात विखूरले होते.सा-यांचेच जगणे हातावर. अशात मी सहजसाध्य कॅशलेस व्यवहार करताना पदराशी कलदार जमवणा-या डिजीटलचा अर्थही न कळणा-या अशा अनेक मीणा नजरेसमोर तरळत राहतात.
एक दिवस पोरं अशी उकीरडा उचकत खेळताना मी तिला जवळच्या म्युनिसिपालीटीच्या शाळेचा सल्ला दिला,ती रस्त्यावर तंबाखू थुंकत म्हणाली हां दिदी हम तो सकूल का मुं भी नई देखे ,पहली बार कपडा ‘गीला’ होने लगा (पहली माहवारी) और शादी होगई. बच्चोंको पढाने वास्ते मै ये पासवाले सकूल लेके गई थी दो चार दिन बैठे किताबे भी मिला लेकीन ‘अभी आने की जरुरत नई’ बोलके सकूलवालोने वापस भेज दिए, ‘भौत कोसीस कीया लेकीन....!’ तिनं मिळालेली पुस्तकं माझ्या पुढ्यात टाकली त्यातली नेमकी ‘सुगी’; कविता कागदावरच फडफडत राहिली. हक्काच्या बालशिक्षणाची पताका इथे फडकणारच नाही का? हा प्रश्न झुग्गीभोवती घोंगावत राहिला. मी आणखी गुरफटत गेले आणि संवादाची विण घट्ट होत राहिली. ‘क्यूं मीणा कल बहोत जल्दी दुकान बंद कर दी थी?’ तिनं पदर तोंडात धरुन डोळे मिचकावले ‘अरे दिदी कल जल्दीसे माल कटा मस्त धंदा हुवा,सासससूर बच्चोके साथ गाववालोको मिलने चले गए,तो हमारे मरदने कहीसे दारु लाया था बस, खा पी के दोनो लुढक गए’ आल्या क्षणाला उद्याचं भविष्य नसतंच.तिच्या आयुष्यातला पडद्याच्या भिंतीतला हा मोकळेपणानं भोगलेला कितवा क्षण असेल? ती खोळीत मॅक्रम भरण्यात व्यस्त झाली मी निघाले.
मानवी मनाला अलिप्त राहता येतं? मी चारआठ दिवसांनी गावाहून परतल्यावर मॉर्निंगवॉकला गेले.अधीर उत्सुकतेनं नजर ओळखीच्या खुणा टिपायला भिरभिरली. झुग्गी उठली होती. हे स्विकारायला मन तयार नव्हतं.परतीचा ठावठीकाणा नसलेले ते कुणाचा अन् का म्हणुन निरोप घेतील! झुग्गीच्या आधाराला असलेल्या काठ्या तशाच रोवलेल्या. त्यावर जीर्णशीर्ण कांबळं टांगलेलं, चुलीचे गारेगार दगड आज मौन शांत,मातारानीच्या रिकाम्या खोक्यात फक्त उदबत्तीची राख विखूरलेली,वा-यासह जागा सोडलेले मॅक्रम दोरे फरच्या चिंध्या सर्वांना तिच्या सर्वांगपीडेचा घुसमटलेला वास....
नालीवरच्या दगडावर बिभत्स वळवळणा-या अळ्या आणि किड्यांनी वेढलेला तिचा सृजनाची ग्वाही देणारा दर महिन्याचा डागदार ‘गीला कपडा’ तिच्या अनारोग्याची साक्ष देत उघडा-वाघडा पडलेला...
वर्षा विद्याधर चोबे
चंद्रपूर 9403977266