सप्ताहाची सुरुवात अशा कथेने व्हावी...संपूर्ण सप्ताह उत्तम जातो!
काच-संजन मोरे
अनवाणी पाय असतात सोबतीला. चप्पल नसतेच. असते पायताण किंवा वहाण मोठ्यांसाठी. चिगूर पोरं बिनचपलाचीच मोठी होतात.
टाचेत घुसते बाटलीची फुटकी काच, किंवा काचेची फुटकी बाटली.
काढून उपसून फेकताना, कळ काळजापर्यंत, काळजातल्या आई पर्यंत जाते, तेंव्हा कुठे सुरू होते टाचेतल्या रक्ताची भळभळ. निबारढक टाचेत रक्तवाहिन्या नसताना-सुद्धा कुठून येत असेल हा रक्ताचा भळभळता पान्हा.
किंवा पान्ह्याचा कान्हा. हरएक लेकरू आईसाठी कान्हाच की ? कान्हा वळखंत असेल का देवकीला, की यशोदेचाच कान्हा फक्त ? मग देवकीच्या पान्ह्याचं काय ? की तोच रक्त बनून ….? रक्ताची ही भळभळ …
टाच उंचावत, एका पायावर नाचत, उड्या मारत इकडे तिकडे पान्हावलेल्या डोळ्यांनी शोधावी लागते आई. या उड्या उडीत रक्ताचे ठीपके रूपायासारखे गडद सांडत जातात. स्वप्नात वेचलेल्या रूपायांसारखे मुबलक.
गणवेशाच्या चड्डीच्या फाटक्या खिशा नसतेच ती. शर्टाच्या खिशात पेन्सीलीचा तुकडा अन एक खोड रबर, खोडकर. दफ्तराच्या पिशवीत पाटी पुसायचा स्पंज, रडक्या, गळक्या पेनाचे डोळे पुसायचे निळे मिट्ट, रक्ताच्या डागासाठी नसलेले फडके. आई नसते कशातच……..
काच टाचेत घुसते, पंजा फाटवते, तळव्याला फक्त टोचते. हे काचशास्त्र !
“कवळं रगात, माती भर …” कुठूनतरी आई सादावते.
मातीत आई असते. घोळून घोळून हाताच्या तळव्यात मऊमऊ माती उरली की रक्ताच्या उफाळ्यात भरायची, बांध घालायचा. बंदीस्ती करायची. उंबऱ्यातनं लेकरू मागं फिरावं तसं रक्त मग मागं फिरतं, परत चुकारवानी उंबऱ्यातून डोकं बाहेर काढतं.
आईचा शोध चालू असतो, लेकराचे डोळे तपासत असतात रस्त्याच्या दोन्ही कडा, एखादं चिंधूक, आंधूक, रक्त थांबवणारं !
टाचेतून माती भळभळते. पण घरंही जवळ येत असतात. दिवसा आईला घर नसतंच, आईचे पाय वावरात तुरीच्या टोकदार धसकटात नाचत असतात, अनवाणी. आईला तरी कुठे असते चप्पल ? तीही शोधत असते आई, भळभळत्या तळव्यावर चिरगूट बांधत. तळव्यात धसकटं घुसतात हे त्या धसकटाचं शास्त्र! किंवा त्या शास्त्राचं हे धसकाट ….
“ये पोरा...हिकडं यी ….
बघू काय लागलंय ?......
बाय्यो...किती रगात गेलंय ….
ही माती कशाला टाकलीय ?
धनुर्वात होवून मरशील की ….
थांब मी राकेल सोडती …
मंग धडपं बांधती ….. रस्त्यावरच्या घरातली आई.
आई धडपं होवून बिलगती.संध्याकाळी घरातली आई धडप्यावरून अलगद हात फिरवती.
“ आये...त्या माऊलीला लेकरू का गं दिलं नसंन देवानं ? “
आजही तोच प्रश्न भेडसावत असतो त्याला. आठवणींच्या काचा तुडवताना …….