कहर आहे ही कथा ....जान्हवी किती ताकदीचे लिहावे....!!
ओघळ – जान्हवी पाटील
सात नंबरच्या फ्लॅटफॉर्मच्या पहिल्या खांबाजवळ गेले तीन तास कुणी उचलेल या आशेवर पडलेल्या पांढऱ्या कपड्याआड हवेने वर गेलेल्या कोपऱ्यातुन एव्हाना घोंघावणार्या आगाऊ माशा आणि मुंग्याची सरकती शिस्तबद्ध रांग निमुटपणे चालू लागली होती.
बाजुला फाटक्या जुनेऱ्यात बसलेल्या डोक्यावर हात मारुन 'ए दादा बघ रं..' हाका मारणारी सुरकुतलेली म्हातारीअन तिच्या शेजारी कोरडंठाक डोळ्यानं 'त्याच्या'कडं बघत बसलेल्या 'ति'च्याकडं पाहत पैसे टाकले कुणी कुणी.. म्हातारे त्याला घरी घेऊन जा म्हणत..
उजवीकडुन स्टेशनबाहेर पडणारा रस्ता, डावीकडून तिकीट खिडकीकडे वळणारा कोपऱ्यातुन येणाऱ्या जाणाऱ्यांच्या "त्याला" पाहून पुढे जाणाऱ्या काही बावरलेल्या, काही बावचळलेल्या, काही 'कोण रे' वाल्या उत्सुक आणि काही मुर्दाड.. नव्या नव्या नजरा रेंगाळत राहिल्या 'ति'च्यावर..
अगं ए म्हातारे! घरी ने की बॉडी आता. चार पाच स्टेशनच लांब आहे ना ठिकाण तुमचं? अजुन किती तास इथंच ठेवायची बॉडी इथं.. एक पोलिसवाला येऊन करवदला..
'दादा घरा कसा न्हेऊ ह्याला.. माझ्यानं उचलायचा न्हाय यो. ये पैसं ठिव तु.. पदरची गाठ सोडत अन समोरच्या नोटा गोळा करत म्हातारी पोलिसापुढं हात जोडून उभी राहीली.
'माह्या पोराला उचिलशील का? ट्रेनमंदी बशिव आमास्नी..'
'भेटंल बघ कुणीतरी' पुटपुटत पोलिसवाल्याला ड्युटी आठवली आणि निघून गेला..
'कुणी हात लावंना झालंय बापा.. माह्या पोराला उचलाल का रं कुणी..'
म्हातारीच्या केविलवाण्या सुरकुत्यांवरुन प्रश्न ओघळत राहिला