लेखक शिकत असतो...भाग्यश्री आज एक टप्पा पार करून...वरच्या टप्प्यावर पोचली आहे ह्याची जाणीव.
शून्य – भाग्यश्री भोसेकर बिडकर
"मॅडम काय ऑर्डर आहे?"
"एक बनमस्का आणि एक कटिंग" पुन्हा एकदा माहीत असलेलं उत्तर वेटरला मिळालं आणि तो ऑर्डरच्या तयारीला लागला
थोडीशी विरलेली जीन्स, त्यावर चिकनकारी कलाकुसर केलेली कॉटनची कुर्ती, सोबत झोळीवजा लांब पर्स, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, मिश्किल डोळे आणि ओठांच्या कडांवर हसू असं एकूणच तिचं बाह्यस्वरूप. तिनं पर्समधून सिगारेट काढली, ती पेटवली आणि धुराची वलयं सोडत शांतपणे दिलेली ऑर्डर येण्याची ती वाट पाहू लागली. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं तिने पर्समध्ये काहीतरी चाचपडायला सुरुवात केली..तिला डायरी सापडली, ती त्यात लिहू लागली
दिनांक- ११ नोव्हेम्बर २०१७
वेळ- ६.३० (सायंकाळ)
१. आज सकाळी व्यायाम झाल्यावर श्वेताने मला कॉफी आणि नाश्ता दिला
२. मग मी थोडा वेळ टीव्ही पाहिला
३. मग डायरीतला नवीन इस्त्रीवाल्याचा नंबर श्वेताला मी शोधायला सांगितला आणि कपडे इस्त्रीला द्यायला सांगितले. काय बरं नाव त्या इस्त्रीवाल्याचं गणेश..नाही विजय..नाही अजय वाटतं..असो
४. मी तयार झाले मग मुराकामीचं 'काफ्का ऑन द शोअर' घेऊन बसले...की 'वाईल्ड शिप चेस' होतं.. आता नीटसं आठवत नाही असो पण ह्या माणसाने सध्या वेड लावलंय
५. मग दुपारी बाईंनी जेवण तयार असल्याचं सांगितलं. मी जेवले. आज माझ्यावर पाककृतीचा नवीन (निदान माझ्यासाठी तरी नवीन ) प्रयोग होता. हरभऱ्याच्या पानांची भाजी म्हणे
६. मग थोडा वेळ वामकुक्षी आणि त्यानंतर डॉ. देसाईंच्या क्लिनिककडे प्रयाण
७. आजचं सेशन छान पार पडलं
"मॅडम तुमची ऑर्डर" वेटरने चहा आणि बनमस्का टेबलवर ठेवला आणि तिची लिखाणाची तंद्री भंगली. सिगारेटही अर्धी संपली होती तेव्हा उरलेली सिगारेट ऍश ट्रे मध्ये विझवून तिने चहाचा आस्वाद घ्यायला सुरूवात केली. चहाचा घोट घशाखाली उतरला तसा नवीन विचार मालिकेने जन्म घेतला
सुभाषला खूप आवडायचा इथला चहा आणि मला मात्र कॉफी तीही हॅजलनटच... इथेच तर शेवटचं चहा कॉफी सेशन पार पडलं. सुभाषने माझा हात हातात घेतला होता आणि म्हंटला होता
"मिनू आता सगळं स्पष्ट दिसतंय गं समोर. जे काही दिसतं आहे ते तुझ्या डोळ्यांइतकच खोल, गहिरं आहे आणि गुढसुद्धा" आणि माझ्या हाताला कंप जाणवू लागला होता, डोळ्यात आसवं जमा होऊ लागली ती खळळकन निखळून पडणार इतक्यात सुभाष म्हंटला
"जगण्याचा उत्सव कर...जसा मी केला आजपर्यंत..शून्यातून विश्व उभं राहतं आणि इथे तर तुझ्याजवळ सगळं काही आहे " आणि नेहमीचं हुकुमी हसला सुभाष.
"तू माझं सगळं काही आहेस..तू असशील ना कायमच सोबत माझ्या?" मी विचारलं त्यानंतर सुभाषच्या उत्तर नसलेल्या डोळ्यांच्या खोल डोहात मला बुडायची इच्छा झाली नाही.
तिनं पाहिलं आता इराण्याच्या हॉटेलबाहेर एक माणूस त्याच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जात होतं..विचारांचं नवीन कृष्णविवर.. सुभाषची ही आवड अनिकेतने कशी बरोबर उचलली होती...काय हट्ट करून ते अलसेशियन कुत्र आणलं होतं..काय लाड करायचा अनिकेत त्याचे..आणि ते कुत्रंही अनिकेतला किती घोळात घ्यायचं..तीन वर्षांपूर्वी सुभाष गेला नि मागच्या वर्षी अनिकेतही..अनिकेतच्या फोटोसमोरच त्याच्या कुत्र्यानेही प्राण सोडला... मी मात्र एकटी..तिने पुन्हा सिगारेट पेटवली..
चहा आणि बनमस्का संपला होता. वेटर रिकामा कप नि प्लेट घेऊन गेला पण ती शून्यात बुडाली होती.बराच वेळ उलटला.
"वेटर एक चहा आणि बनमस्का" तिने पाचव्यादा ऑर्डर दिली आणि तिने पुन्हा लिहायला घेतलं
दिनांक- ११ नोव्हेम्बर २०१७
वेळ- ६.३० (सायंकाळ)
१. आज सकाळी व्यायाम झाल्यावर श्वेताने मला कॉफी आणि नाश्ता दिला................................... …...........................