ही प्रतीक्षा जीवघेणी!
प्रतिक्षा-वर्षा देशमुख
रोजच्या सारखेच आजही ऊन खिडकीच्या त्या चार गजांतून आत शिरले. रोजच्या सारखीच कवडशांची रांगोळी जमिनीवर रेखली. ‘ती’ ही खिडकीपाशी येउन बसली – रोजच्या सारखीच आणि तिचं वाट पाहणं सुरु झालं – ते ही रोजचंच........ !!!!
सगळं आवरुन–सावरुन या खिडकीतून वाट बघायची, हा तिचा नेम जवळपास गेले महिनाभर चालू होता – कारण ‘ तो ‘ येणार होत !! किती आतुरतेने वाट बघत होती ती! दिवसांमागून दिवस उलटत होते..... पण त्याची प्रतिक्षा करणं काही संपत नव्हतं ....
खरं तर एव्हाना त्याने यायला हवे होते... तसा त्याने दोन–तीन वेळा निरोपही पाठवला होता की आज नक्की येतो म्हणून !! पण..... नाहीच आला .... स्वागताची सगळी तयारी वाया गेली.... सगळ्यांकडून त्याचं वर्णन ऐकले होतं तिने...... न भेटताच त्याच्या प्रेमात पडली होती. रोज स्वप्नं रंगवत होती.... अगदी आतूर झाली होती ... त्याच्या बलदंड मिठीत सामावून जायला. पण ..... आजही सूर्याचं एक आवर्तन पूर्ण झालं तरी तो आलाच नाही.... आता मात्र तिला काळजी वाटायला लागली .... “ हा विसरून तर गेला नाही ना ??”.... “का दुसरीकडेच कामात अडकला?? “...... “का दुसऱ्या कोणात गुंतला??? ”
एक ना दोन ..... असंख्य प्रश्न .
पण सरणाऱ्या रात्रीने तिला एक नवे स्वप्न दाखवले ... आज तो नक्की येणार !!!
रोजच्या सारखेच आजही ऊन खिडकीच्या त्या चार गजांतून आत शिरले. रोजच्या सारखीच आवरून-सावरून, नव्या उमेदीनं ती खिडकीपाशी.......... “आज तरी ये रे...... किती वाट पहायची......... हा दुरावा नाही सोसवत आता ...... थकले रे, रोज मनाची समजूत काढून-काढून...... हे मृत्यो ! ! ! !”
“ ....................!”