जशी चिकण मातीत मळणारे हात नाहीसे झाले तसा संस्कृतीचा लोप सुद्धा झाला
चिकण माती – अक्षय वाटवे
'तांबेट काका, ओ तांबेट काका, पाच रुपयांची चिकण माती द्या' पायातल्या स्लीपरला लागलेली माती पायरीच्या कोपऱ्याला खरवडत एका शाळकरी मुलाने लाघवी आवाजात चित्रशाळेतल्या तांबेट काकांकडे मातीची मागणी केली.
अतिशय वेगाने शहराचं रूप घेऊ पाहणाऱ्या त्या गावात वडिलोपार्जित मुर्तीकलेचा वारसा आणि व्यवसाय जोपासणारे हे गृहस्थ. तांबेट काका, त्यांचा खरा व्यवसाय तांबेट कामाचा, म्हणजे तांब्या पितळेच्या भांड्याना कल्हई लाव, दुरुस्ती कर, घागर, कळश्या, हंडे, बंब आणि तांब्या पितळेच्या इतर घरगुती वापराच्या सामानाची डागडुजी कर असा त्यांचा पिढीजात उद्योग.
कित्येक वर्षांपूर्वी त्यांचा पणजोबा या गावात येऊन स्थाईक झाला आणि तांबेट कुटुंब गावगाड्याचा एक अविभाज्य भाग बनले. पण काळानुरूप परिस्थिती बदलली आणि तांब्या पितळेची जागा जर्मन, अल्युमिनिअम मग पुढे जाऊन चकचकीत टेनलेस्टील आणि आता तर प्लास्टिकने घेतली होती. त्यामुळे यांचा धंदा बराचसा बसला होता.
तांबेट काकांच्या भावकी पैकी बहुतेकांनी धंद्याला कधीच रामराम ठोकला होता. पण आता उतारवयात दुसरं करणार काय असं म्हणत तांबेट काकांनी जमेल तसा उद्योग सुरु ठेवला होता. त्यांच्या हातात कला होती त्यामुळे उपासमार होत नसे, पूर्वी सारखा धंदा नव्हता हे खरं असलं तरी काही ठराविक वार्षिक काम लागलेली असायची ती मिळायची. मात्र त्यांचीही संख्या हळूहळू रोडावत चालली होती. जेवढे दिवस ढकलतील तेवढे दिवस ढकलायचे या गणिताने तांबेट काका दिवस मोजत होते.
त्यातल्या त्यात आषाढ सुरु झाला, की तांबेट काकांना उत्साह यायचा कारण त्यांच्या चित्रशाळेत लगबग सुरु व्हायची. गणपतीचे आणि मातीच्या सुबक मुर्त्यांचे कारखाने निघायचे. कित्येक वर्ष आधी त्यांच्या आजोबांनी गणपतीच्या मुर्त्या करायला सुरवात केली होती. नागपंचमीच्या नागोबा पासून ते नवरात्रीच्या सार्वजनिक उत्सवाच्या मूर्तीपर्यंत सगळ्या मुर्त्या या चित्रशाळेत घडत.
तांबेट काकांच्या वडिलांच्या काळात हा धंदा फार तेजीत आला. मुर्त्या बनवायचे साचेही निघाले होते त्यामुळे कामाला गती मिळाली होती आणि घरगुती सणांना सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप मिळाल्या मुळे मागणीही वाढली होती. जवळपास वर्षाचे दहा महिने काम चालायचं. हळूहळू स्पर्धा वाढली. बाजारपेठेची गणितं बदलली हल्ली मोठ्या प्रमाणात कारखान्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरीसच्या, आखीव रेखीव, देखण्या, भव्यदिव्य मूर्ती साकार होऊ लागल्या.
स्पर्धा, पैसा, वेग यांचं आणि तांबेट काकांचं गणित काही जमलं नाही. ते आपले हाती आणि काही प्रमाणात साच्यातल्या मुर्त्या बनवत राहिले. काही जुने चोखंदळ ग्राहक टिकून होते मात्र त्यांची पुढची पिढी कर्ती सवरती झाल्यावर त्यांच्या आवडीनिवडीही बदलल्या. नाही म्हणायला सिझन पुरतं काम असायचं आणि तसही तांबेट काकांची तरी पुढची पिढी कुठे या व्यवसायात येणार होती. आपल्यामुलाने हा व्यवसाय पुढे सुरु ठेवावा असं काकांना एकदा वाटलं होतं, पण ते तेवढच.
तांबेट काकांची बायको जाऊन दहा वर्ष होऊन गेली. मुलाने स्वाभाविक पणे लग्नानंतर स्वतंत्र चूल मांडली होती. लहानपणी तो वडिलांसोबत चित्रशाळेत बसायचा पण नंतर तेही कमी झालं त्याने स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. त्याचं बरं चाललं होतं. तांबेटकाकांचा बाड बिस्तरा आजकाल चित्रशाळेतच होता. कामाची जुनी आयुध काढून साफ करून ठेव, कुठे उरल्यासुरल्या मुर्त्यांची डागडुजी कर, असा काहीबाही उद्योग ते करत बसायचे.
नुकताच आषाढ सुरु झाला होता. तांबेट काकांच्या ओसरीत मातीचे गोळे येऊन पडले होते. आता नागोबचं काम सुरु झालं होतं. तांबेट काकांनी माती मळून, एकजीव करून, नागोबा तयार करायला घेतले होते. आज सकाळी नागोबा रंगवायला घ्याचा विचार करत तांबेट काका रंगाचं सामन साफसूफ करून फडताळात मांडून ठेवत असतना त्यांच्या कानावर हाक आली.
'तांबेट काका, ओ तांबेट काका, पाच रुपयांची चिकण माती द्या'
हा एक वार्षिक कार्यक्रम असायचा. शाळेत कार्यानुभवच्या तासाला शिक्षक मुलांना मातीच्या वस्तू बनवायला सांगायचे आणि मग मुलांचा गोतावळा तांबेट काकांच्या दारात हजर व्हायचा. पण गेल्या दोन तीन वर्षात कोणी आलं नव्हतं. चौकशी केल्यावर त्यांना समजलं की हल्ली शाळेशेजारच्या दुकानात पॅकबंद पिशवीत तयार माती मिळते. आकार द्यायला आणि रंगवायला एकदम सोप्पी, पुन्हा मळायची, माती तयार करायची भानगड नसल्यामुळे हातही फार घाण होत नाहीत. म्हणून मुलांचे पालक तीच घेऊन देतात.
हे ऐकून तांबेट काकांनी एक सुस्कारा सोडला होता. या वर्षी माती दारात येऊन पडल्यावर त्यांना मुलांची आठवण आली होती. पण कोणी येईल असं वाटलं नव्हतं त्यामुळे अचानक ही हाक ऐकल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं.
‘ओ, काका..’ पुन्हा एकदा कानावर हाक पडल्यावर तांबेट काका भानावर आले
‘कोण रे कोण हा भायेर ? इलंय हा’ असं म्हणत ते ओसरीच्या दिशेने वळले.
हाका मारणारा तो मुलगा आता तिथेच दुकानाच्या ओसरीवर टाकलेल्या मेणकापडावर बसकण मारून बसला होता. बसल्या बसल्या शेजारी असलेल्या चिकण मातीचे छोटे-छोटे गोळे करून त्यांच्याशी त्याचा खेळही सुरू झाला. एवढ्यात काळ्या जाड फ्रेमचा चष्मा लावलेले, मिचमीच्या डोळ्यांचे, पाठीला थोडा बाक आलेले, मातीने पिवळा झालेला गंजीफ्रॉक आणि खाकी हाफ पॅन्ट घातलेलं तांबेट काका हातात मातीचा गोळा घेऊन आले.
'खेका रे होई माती?' काहीश्या सानुनासिक स्वरात तांबेट काकांनी त्याला विचारलं.
'शाळेत चित्रा करून न्हेवची हत' हातातल्या मातीच्या छोट्या गोळ्याला आकार देता देता तो उत्तरला.
बोलता बोलता तांबेट काकांनी त्या मुलाच्या हातांच्या चाललेल्या हालचाली निरखल्या. बसल्या बसल्या त्या मुलाने एक छोटासा बैल आणि शेजारी माणूस असं चित्र बनवलं होतं. आकार ओबड-धोबड होते पण हाताला उपजत वळण होतं. तांबेट काकांच्या बारीक नजरेने ते बरोबर टिपलं होतं. नकळत त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलाची राजूची आठवण झाली. तोही शाळेत असताना अशीच छोटी-छोटी चित्र बनवायचा. मात्र क्षणातच तांबेट काका हे स्मृती रंजनातून बाहेर आले. 'होय काय बरा. ही घे माती.' असं म्हणत पलीकडे मळून ठेवलेल्या मातीचा एक मोठा गोळा काढून त्यांनी त्या मुला समोर धरला.
‘न्हेतलय कशी? पिशी हाडलंय?’ त्यांनी त्या मुलाला विचारलं.
मातीने बरबटलेल्या हातानी हाफ चड्डीच्या खिशातली पिशवी कशी काढायची याचा विचार करत तो तसाच उभा राहिला. खरंतर त्याला तो हातातला मातीचा माणूस सोडवत नव्हता. शेवटी नाईलाजाने त्याने तो माणूस शेजारी ठेवला आणि पावळीत भरून ठेवलेल्या ड्रम मधल्या पाण्यात हात बुचकळून काढले आणि चड्डीच्या खिशातली पिशवी उघडून तांबेट काकां समोर धरली. त्यांच्या हातातला तयार चिकण मातीचा लोण्यासारखा मऊ गोळा बघून तो हरखून गेला होता.
'कायता केलंय काय माका हाडून दाखय हा' असं म्हणत तांबेट काकांनी अलगत तो गोळा पिशवीत सोडला.
पिशवीतल्या गोळ्याकडे पहात असताना त्या मुलाची नजर मागच्या फडताळात असलेल्या रंगांच्या डब्यांवर पडली आणि त्याने सहज तांबेट काकांना विचारलं,
'माका फळा रंगवन दिशात?'
'मी काय रिक्यामी बसलंय का काय रे? आ? तरी बरा. अजून एक नागोबा रंगवन जावक नाय हा माझो.'
तांबेट काकांचा स्वर जरा चिडका झाला तसा तो हिरमुसला होऊन जायला वळला. तेवढ्यात तांबेट काकांच्या मनात काय आलं, तो मुलगा वळून निघणार एवढ्यातत्यांनी त्याला हटकलं,
'उद्या सकाळचो नागोबांका वॉश मारूक येशीत काय? मगे जाताना तुका फळा रंगवूक दाखयतय.'
या अनपेक्षित प्रश्नाने तो मुलगा गांगरून गेला खरा. पण मनातून त्याला खूप आनंद झाला कारण त्यालाही मातीत खेळायचं होतं. वेगवेगळी चित्र बनवून बघायची होती. घरी हे सगळं शक्य नव्हतं.
तो खरतर तेव्हाच होय म्हणणार होता. पण, 'आईक इचारतंय आणि येतंय' असं म्हणत त्याने घराच्या दिशेने धूम ठोकली.
कसल्याश्या उत्साहाने तांबेट काका आत गेले.
हा घरी आला आणि लगेच एका कोपऱ्यात बसून मातीची फळं तयार करायचा त्याचा उद्योग सुरू झाला. काही वेळातच शाळेत शिकवलेली फळं त्याने तयार केली आणि गपचूप उठून अभ्यासाला बसला. संध्याकाळी शिलाई मशीनवर शिवणकाम करत बसलेल्या आईच्या शेजारी येऊन उभा राहिला.
‘आई माझी फळं तयार करून झाली. गृहपाठ पूर्ण झाला. प्रयोग वही पण पूर्ण केलीय.’
‘मग आता काय भूक लागलीये? का देवळात जायचंय खेळायला? तिन्हीसांज झालीये हात पाय धु आणि देवाला नमस्कार कर, मग देते खायला.’आईने बोलता बोलता मशीन वरचं कापड फिरवून घेतलं.
‘मी उद्या सकाळी तांबेट काकांकडे जाऊ? त्यांना नागोबा रंगवायला मदत हवीये.’
आईने शिलाई मशीन बंद केली. तिने एकदा त्याच्याकडे बघितलं,
‘सकाळी जा पण संध्याकाळी बाबा यायच्या आधी परत ये. त्यांना कळलं फोडून काढतील ते. हे असले उद्योग आपण नसतात करायचे’
आईचा होकार मिळाल्या बरोबर स्वारी खुश झाली.
सकाळी दहा वाजल्या पासून दुपारी चार वाजे पर्यंत पाठ, मान, हाताला रग लागे पर्यंत तो नागोबांना वॉश देत होता. दुसरीकडे तांबेट काकांनी बाळकृष्णाच्या मुर्त्या साच्यातून काढायला सुरवात केली. त्यांच्या बारीक मिचमीच्या डोळ्यांचं एक लक्ष नागोबाच्या मूर्तीवर फिरणाऱ्या याच्या हातातल्या ब्रशवर होतं.
हा विलक्षण तन्मयतेने समोर असलेल्या मूर्तीवर सफेद रंगाने भरलेल्या ब्रशचे फटकारे मारत होता. बारीक चौकड्यांचा बुशशर्ट आणि काळी हाफ पॅन्ट पांढऱ्या रंगाच्या शिंतोड्यानी भरून गेली. त्याने वॉश दिलेल्या मुर्त्या मात्र एकसमान; कुठेही सफेद रंगाच्या थरांमध्ये फरक नाही की थेंबाचा ओघळ नाही.
त्याच काम बघून तांबेट काका खुश झाले.
'बरो हा हात तुजो' असं म्हणत कौतुकाने त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला.
असेच काही दिवस गेले. पंचमी-अष्टमी होऊन गेली. श्रावण संपत आला. चतुर्थीचे वेध लागले. हा रोज संध्याकाळी चित्रशाळेत यायचा. हळूहळू मूर्तीला रंगाचा पहिला हात देणं, साच्यात घातलेले गोळे सोडवणं अश्या कामात तरबेज होऊ लागला. वडील घरी यायच्या आधी हा घरात हजर असायचा.
तांबेट काकांना याच्या चिकाटीचं कौतुक वाटत होत. तेही रोज संध्याकाळी याची वाट बघायचे. अश्याच एका रविवारच्या सकाळी चित्रशाळेच्या ओसरीवरून याने हाक मारली.
तांबेट काका, माका गणपती करूक शिकयश्यात ?' त्याच्या ह्या प्रश्नाने तांबेट काका चमकले. मनातल्या मनात आनंदून गेले. कोणी तरी स्वतःहून त्यांच्या कडे ही कला शिकवण्याची मागणी केली होती. त्यांनी वळून कोनाड्यातल्या छोट्याश्या गणपतीच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार केला. आणि ते त्या छोट्या मुलाला म्हणाले.
‘हो बघ, हो गणपती मी केल्लेलंय. पहिलो गणपती.’ थरथरत्या हातांनी त्यांनी ती मूर्ती कोनाड्यातून बाहेर काढली. आणि त्या छोट्या मुलाच्या हातात दिली. तो ती मूर्ती पहातच राहिला. किती नाजूक आणि देखणी मूर्ती होती ती. ‘मी हीहि अशीच बनवेन.’ तो मुलगा स्वतःशीच पुटपुटला.
ही साच्यातून काढलेली नव्हे तर पूर्णपणे हाताने बनवलेली मूर्ती होती. छोटीशीच पण सुंदर. इतक्या वर्षांनंतर आता काही ठिकाणी रंग उडाला होता. पण मूर्तीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि वेगळंच तेज होतं. तांबेट काकांनी ती मूर्ती पुन्हा कोनाड्यात ठेवली. आणि ते खाली बसले. समोर एक लाकडी पाट घेतला. त्यावर लोण्यासारखा मऊ मातीचा गोळा ठेवला आणि हळूहळू तांबेट काकांचे अनुभवी हात एखाद्या उत्साही तरूणा प्रमाणे ओल्या मातीच्या त्या गोळ्याला आकार देऊ लागले. हाही शेजारी बसला. त्याने पलीकडचा पाट ओढून घेतला. त्यावर एक गोळा घेऊन तांबेट काकाचा गोळ्यावर फिरणारा हात बघत स्वतः समोरच्या गोळ्यावर आपला हात फिरवू लागला.
दिवस चढत गेला. तहान भूक हरपून एकीकडे एक जातिवंत कलाकार आकारहीन देवत्वाला मूर्तीत साकारण्यासाठी आपलं कसब पणाला लावत होता. तर दुसरीकडे समोरच्या मातीशी पूर्ण एकरूप होऊन तो छोटा मुलगा आपल्या मनातली गणपतीची प्रतिमा प्रत्यक्षात साकारत होता. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारा कलेचा हा अनोखा आविष्कार देखणा होता.