सिंगापूर नुक्कड कडून आलेली ही दुसरी कथा...
ह्या कथेचे जग वेगळे आहे..चिंतनाचे आहे...भाषा समृद्ध आणि विचार त्याहूनही समृद्ध...खूप भावली.
अज्ञाताचा शोध - अरुण मनोहर
ज्ञातातून अज्ञाताच्या शोधात निघालेला वाटसरू
विशाल पर्वतराजी, महानद्या,
गुलाबी शालू पांघरलेली वनराई,
विश्वाचे सगळे अप्रूप नजरेच्या टप्प्यात
पण तरी समाधान नाही
रात्रंदिवस छळणारे प्रश्न
को~हं ----मी कोण आहे?
किं इदं ---हे काय आहे?
कस्मात समस्तम ---- हे सगळे कां?
बाहेर सगळीकडे शोधले.
धर्मग्रंथ, वेदपुराणे, गुरु, मंत्र,
कुठेच उत्तर सापडेना
मग आतमध्ये शोधले.
जाणीवेच्या तळाशी दडलेल्या नेणीवेतून
अस्पष्ट ध्वनी आला..
अज्ञात असलेले, तु ज्ञाताच्याच प्रकाशात बसून शोधतोय,
तुझी ज्ञानेन्द्रीये ज्ञाताच्या प्रखर प्रकाशाने आंधळी झालीत
अज्ञाताचा शोध घ्यायचा असेल तर ज्ञातापासून दूर दूर जा.
अज्ञातवासात जा... तिथे शोध. कदाचित उत्तरे मिळतील..
को~हं ----मी कोण आहे?
किं इदं ---हे काय आहे?
कस्मात समस्तम ----हे सगळे कां?
त्याला कळेना,
अज्ञातात जाऊ म्हणजे कोठे जाऊ?
दशदिशा तर ज्ञात प्रदेशातच पोहोचविणार..
अज्ञात प्रदेश एकच...
मृत्यूचा प्रदेश...
तिथे उत्तर सापडेल?
उत्तर सापडले, तरी ते उत्तर ज्ञात प्रदेशात कसे पोहोचविणार?
मृत्यूचा प्रदेश तर एक मार्गी!
तेथे जाऊ शकता, परत येण्यास मार्ग नाही!
खूप काळ बेचैनीत काढल्यावर त्याने निर्णय घेतला.
उत्तराच्या तृष्णेने तडफडून मरण्यापेक्षा,
उत्तराच्या शोधात प्राण अर्पण केलेले केव्हाही चांगले.
कदाचित अज्ञात असलेले ज्ञात झाले की
ज्ञात प्रदेशात परतण्याचा मार्ग देखील दिसेल!
त्याने स्वत:ला खोल जमिनीत पुरून घेतले.
केवळ दोन दिवस पुरेल एवढा प्राणवायू
काजळाला लाजवेल असा मिट्ट काळोख
ध्यानस्थ होऊन तो अज्ञाताचा वेध घेऊ लागला...
घटका, पळे सरासरा अंतर्धान पावली...
नजरेसमोरील दृष्ये अस्पष्ट होत होत नाहीशी झाली..
प्रश्न देखील इतके अंतरंगात भिनले,
तो स्वत:च जणू प्रश्नमय बनला.
एक कुठल्याशा क्षणी ......
मिट्ट काळोखाची जागा तीव्र प्रकाशाने घेतली..
त्या तीव्र प्रकाशात अज्ञाताला जागाच नव्हती.
सारे प्रश्न संपले...
त्यामुळे उत्तरे असण्याचा प्रश्नच नव्हता.
किंबहुना
तो स्वत:च जणू प्रश्न आणि त्यांची उत्तरे बनला.
विश्वरहस्य, सारी उत्तरे त्याला ज्ञात होती.
ज्यासाठी जीव पणाला लावला होता,
त्या उत्तरांचेही आता त्याला अप्रुप उरले नव्हते...
उत्तरे घेऊन कोठेतरी बाहेर जाता येत असेलच तर वापरता येईल म्हणून
बरोबर घेतलेले तीक्ष्ण खुरपे त्याच्या बाजूलाच पडले होते....
तीव्र प्रकाशाचे कण होऊन !